आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रॅप:ऑनलाइन गेम खेळताना लाखो रुपये गमावले, अखेर तणावात गेलेल्या तरुणाची हर्सूल तलावात उडी घेत आत्महत्या

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मेकॅनिकल डिप्लोमाचे शिक्षण घेतलेल्या गौरव चंद्रकांत पवार (23, रा. पवननगर, टीव्ही सेंटर) याने शुक्रवारी हर्सूल तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. ऑनलाइन गेममध्ये पैसे हरल्याने ताे तणावाखाली गेला. त्यातूनच त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

गौरव खासगी कंपनीत काम करत होता. त्याला दोन बहिणी असून दोघींचे लग्न झाले आहे. मागील काही दिवसांपासून तो सतत तणावात राहत असल्याने अनेकदा कुटुंबाने विचारणा केली. मात्र, कारण कळले नाही. शुक्रवारी सकाळी त्याने घरी जेवण केले. त्यानंतर आई-वडील बीडला निघताच दुपारी ताे हर्सूल तलावाकडे गेला. काही वेळ काठावर बसल्यानंतर त्याने तलावात उडी घेतली.

हा प्रकार सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आल्यानंतर हर्सूल पोलिसांना माहिती देण्यात आली. अग्निशमन विभागाचे अधिकाऱ्यांनी त्याचा मृतदेह शोधून बाहेर काढला. घटनेची नाेंद हर्सूल पोलिस ठाण्यात करण्यात अाली आहे.

लाखो रुपये गमावले

मेकॅनिकल विषयात डिप्लोमा केलेल्या गौरवला मोबाइलवर गेम खेळायची सवय होती. हे ऑनलाइन गेम एका विशिष्ट लेव्हलनंतर खेळणाऱ्यांकडून पैसे उकळण्यास सुरुवात करतात. गौरवने त्यात लाखाे रुपये गमावल्याची बाब कुटुंबाच्या माहितीतून समोर आली. त्याच्या मामाने त्याला मदत केली हाेती. मात्र, तो तणावातून बाहेर आलाच नाही.