आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील तिसरी घटना:ऑनलाइन गेममध्ये 9 हजार रुपये हरला, प्राध्यापकाचा 17 वर्षीय मुलगा घर सोडून गेला

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चुकलो, पण व्यक्ती म्हणून मी वाईट नाही... वडिलांच्या नावे पत्र

ऑनलाइन गेमच्या आहारी जाऊन नऊ हजार रुपये गमावले. आता हा प्रकार घरी कळल्यावर पालक रागावतील या भीतीने शहरातील एका प्राध्यापकाचा १७ वर्षीय मुलगा घर साेडून निघून गेला. जाण्यापूर्वी त्याने आई-वडिलांना उद्देशून पत्र लिहिले व त्यात चूक मान्य केली. ‘मी घाबरलेला असल्यामुळे तुमच्यापासून दूर जात आहे. पण तुम्ही घाबरू नका, तुम्ही दिलेले संस्कार मी कधीही विसरणार नाही, मी आयुष्यात नक्की एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करेन’, असे म्हणून पत्राचा शेवट केला. पुंडलिकनगर पोलिस त्याचा शाेध घेत आहेत. औरंगाबादच्या सिडकाे एन-४ परिसरात राहणारा १७ वर्षीय राज (नाव बदललेे आहे) बारावीचा विद्यार्थी आहे. त्याचे ६० वर्षीय वडील खासगी काेचिंग क्लास चालवतात. १० ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता राजने आई-वडील व विवाहित बहिणीसोबत गप्पा मारत जेवण केले.

याच वेळी राजच्या वडिलांना त्यांच्या बँक खात्यातून नऊ हजार रुपये कमी झाल्याचा मेसेज आला. त्यांनी राजला याबाबत विचारणा केली. तेव्हा राजने आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले. रात्री बारा वाजता सर्व जण झोपायला गेले. पण ११ ऑगस्ट राेजी सकाळी साडेसहा वाजता राजचे वडील वरच्या मजल्यावर गेले असता त्यांना राज खाेलीत दिसला नाही. त्यांनी मुलीला विचारणा केली असता तिलाही काही माहिती नव्हती. एकुलता एक मुलगा अचानक घरातून निघून गेल्याने राजचे आई-वडील चिंताक्रांत झाले. दुपारपर्यंत घरी येईल, या आशेवर त्यांनी वाट पाहिली. मात्र, तो आला नाही. मित्र, नातेवाइकांकडे शोध सुरू केला. मात्र, कुणाकडेही त्याचा शाेध लागला नाही.

अखेर गुरुवारी राजच्या पालकांनी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी यात राजच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला. उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. जास्त पैसे कमावण्याच्या आमिषाला पडला बळी : राज काही दिवसांपासून एक गेम खेळत होता. त्यात लेव्हलनुसार खेळताना पैसे भरावे लागतात व त्या बदल्यात चांगला परतावा मिळण्याचे आमिष दाखवले जात. त्या अॅपवर असलेल्या लोकांसोबत तुम्ही चॅटिंग (संवाद) करु शकता.

मागील काही दिवसांपासून राजला या गेमचा नाद लागला. वडिलांच्याच मोबाईलवर तो गेम खेळत होता. १० ऑगस्ट रोजी वडिलांनी पैसे कमी झाल्यासंदर्भात विचारणा केल्यानंतर राजने हा गेम आधीच डिलिट केल्याचे सांगितले. दरम्यान, सहायक पाेलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे, प्रभाकर सोनवणे यांनी गुरूवारी २० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासून तो गेलेल्या मार्गांचे निरीक्षण करणे सुरू केले. रात्री उशीरापर्यंत राज्यातील विविध शहरातील पोलिसांना याबाबत कळवण्यात आले होते.

ऑनलाईन गेमपासून सावधान, शहरातील तिसरी घटना
ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांचे मोबाईल हाताळणे वाढले आहे. इंटरनेटवर पैसे कमावण्याचे अनेक गेम, अॅप असल्याचे कळाल्यानंतर त्याचे मुलांना व्यसन जडते. त्यातून अॅप कंपन्या पैसे लुटतात. बहुतांश मोबाईलमध्ये पालकांचे ऑनलाईन पेमेंट अॅप असल्याने त्यातून मुले परस्पर पैसे वळवतात. पण पालकांना उशीरा कळते. यापूर्वीही पुंडलिकनगरमध्ये एक १५ वर्षीय मुलगा जवळपास ३० हजार रुपये हरल्यानंतर घरातून पळून गेला हाेता. तर एका पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाने लाखो रुपये गेममध्ये उडवले. त्यानंतर आता तशीच तिसरी घटना समोर येत आहे.

पत्रात राज म्हणतो, चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करेन
राजने पत्रात म्हटले, ‘मला माफ करा. माझ्याकडून चूक झाली. त्याचा सर्वांना त्रास झाला, हे मान्य करतो. म्हणून माफी मागतो, घाबरण्याचे काहीही कारण नाही. मी जेथे कुठे असेन, सुखरूप असेन. तुम्ही दिलेले संस्कार मी नेहमी पाळेन. माझ्याकडून चुका झाल्या. मला माझी चूक कळली आहे. घाबरलेल्या अवस्थेत असल्याने मी थोडेसे दूर जाण्याचे ठरवले आहे. मी ज्या अॅपमध्ये गुंतवणूक केली, त्यात मला लाॅस झाला आणि मी ते अॅप डिलीट केले.

मला लोकांनी ओळखले पाहिजे आणि माझेसुद्धा नाव चांगल्या हेतूने घेतले पाहिजे म्हणून मी ते अॅप वापरले. त्या अॅपमध्ये लाखो लोक मला ओळखतात. मी अभ्यासात कमी असेन, मला नाही कळत. पण मला तांत्रिक माहिती आहे. मी आजही संगणकाचे दुकान टाकून चालवू शकतो. तेसुद्धा नाही झाले तर मी आयुष्यात चांगला माणूस बनण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.’

बातम्या आणखी आहेत...