आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेडच्या रुग्णालयात संवेदनशीलताच बधिर:रुग्णाच्या मृत्यूनंतरही 3 दिवस आयसीयूत जायचे जेवणाचे डबे

शरद काटकर | नांदेड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तीन दिवस रोज पाठवला जात होता काढा, अंडी अन् डबा

कोरोना रुग्णाचा मृत्यू लपवून नांदेडच्या गोदावरी रुग्णालयाने ९० हजार रुपये लाटल्याच्या प्रकरणात मन बधिर करणाऱ्या अनेक बाबी समोर येत आहेत. २१ एप्रिल रोजी शिक्षक अंकलेश पवार (४१) यांचा मृत्यू झालेला असताना नंतर तीन दिवस २४ एप्रिलपर्यंत रुग्णालयाच्या काउंटरवर दिलेला काढा, अंडी व जेवणाचा डबा रुग्णापर्यंत पोहोचवल्याचा बनाव केला जात होता, असा आरोप नातेवाइकांनी केला. एवढेच नव्हे, “तुमचा रुग्ण जेवत आहे, तो चांगला आहे. काळजी करू नका,’ असा दरवेळी धीर दिला जात होता.

२१ एप्रिलला अंकलेश यांना त्यांचे साडू देविदास जाधव भेटले हाेते. तेव्हा “ऑक्सिजन संपला तरी माझ्याकडे कोणी लक्ष देत नाही,’ असे अंकलेश हातवारे करून वारंवार सांगत असल्याचे त्यांच्या पत्नी शुभांगी यांनी सांगितले. अंकलेश हे नायगाव तालुक्यातील खासगी संस्थेवर शिक्षक होते, तर त्यांची पत्नी शुभांगी या वाजेगाव (ता. नांदेड) येथील एका संस्थेत शिक्षिका आहेत. १६ रोजी अंकलेश यांना ताप, खोकला असल्यामुळे हिंगोली गेट परिसरातील गोदावरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २० रोजी डॉक्टरांनी त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. रोजप्रमाणे काढा, अंडी घेऊन शुभांगी यांचा भाऊ रुग्णालयात गेल्यावर ते ‘आयसीयू’त असल्याचे समजले. २१ रोजी त्यांचे साडू देविदास जाधव ‘आयसीयू’त रात्री साडेसातच्या सुमारास भेटले. या वेळी त्यांना ते हातवारे करून माझ्याकडे कोणी लक्ष देत नाहीत, मला जेवणही देत नाहीत, असे सांगत होते. २२ तारखेनंतर मात्र कुणालाच आत सोडण्यात आले नाही. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी नातेवाइकांचे जबाब घेतले आहेत.

तीन दिवस कोणावर उपचार केले?
२१ रोजी मृत्यू झाल्यानंतर तीन दिवस कुणावर उपचार केले? आमचा तर माणूस गेला आहे. ही वेळ दुसऱ्यांवर येऊ नये. पैशाची लूटमार सुरू आहे. गोरगरीब पोटाला मारून उपचार करत आहेत. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे माझ्या मुलांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हिरावले गेले. त्यामुळे मी न्यायालयात दाद मागितली. या प्रकरणातील दोषींना अद्दल घडावी, अशी अपेक्षा शुभांगी यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...