आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पंजाबमधील पठाणकाेटच्या माधवी मिन्हासने महाराष्ट्रातील दुर्गम गड-किल्ले सर करून विजयी पताका फडकावण्याची ‘मन्नत’ पूर्ण केली. आैरंगाबादेत राहून या हिरकणीने आपला हाच छंद जाेपासत मुलगी मन्नतलाही याबाबतचे धडे दिले. या मायलेकींनी महाराष्ट्रातील ४,६०० फूट उंचीच्या कळसूबाई, २३०० फूट उंचीचा कलावंतीण दुर्ग सर करण्याची माेहीम फत्ते केली. याच माेहिमेत आैरंगाबादच्या १२ वर्षीय माधवी बेलकरचाही पराक्रम लक्षवेधी ठरला. वयाच्या तिसऱ्याच वर्षांपासून गिर्याराेहणाला सुरुवात करणाऱ्या माधवी बेलकरनेही अनेक माेहिमा फत्ते केल्या आहेत.
मुलीच्या साेबतीने छंदाला चालना :
माधवी मिन्हास २००८ मध्ये विवाहानंतर आैरंगाबाद येथे वास्तव्यास आली. तिने शारीरिक शिक्षणाच्या माध्यमातून गिर्याराेहणाच्या माेहिमेेला सुरुवात केली. यातून रतनगड, हरिश्चंद्रगड, कलावंतीण, कळसूबाईसारखे अनेक गड सर केले. लेक मन्नतलाही गिर्यारोहणाची गोडी लागली. माधवींनी २०१८ मध्ये ४ वर्षीय मन्नतला साेबत घेऊन कळसूबाई शिखर सर केले. आतापर्यंत दोघींनी ३ वेळा कळसूबाई सर करण्याचा पराक्रम गाजवला. माधवी मिन्हास यांनी छंद जाेपासताना खडतर गिर्याराेहणाचे बाळकडू दिले. आईने दिलेली प्रेरणा आणि पाठबळामुळे चिमुकलीनेही कठीण आणि आव्हानात्मक असे गड सर करण्यात यश मिळवले आहे. तिने वयाच्या पाचव्या वर्षी कलावंतीण दुर्ग आणि ४६०० फूट उंचीचा हरिश्चंद्रगड सर केला होता.
औरंगाबादची आणखी एक माधवी
आैरंगाबादेत २००८ मध्ये जन्मलेल्या माधवी बेलकर हिला वयाच्या तिसऱ्याच वर्षी गिर्याराेहणाची स्फूर्ती मिळाली. तिने काका अमित बेलकर यांच्या मदतीने मिशन गिर्याराेहणाला सुरुवात केली. तिने २०१२ मध्ये रतनगड, हरिश्चंद्रगड आणि कळसूबाई शिखर सर केले. आता १२ वर्षांची असलेल्या माधवीने काेकण कडासह अनेक खडतर दुर्ग यशस्वीपणे सर केले आहेत. आता बेस कॅम्प आणि एव्हरेस्ट सर करण्याच्या माेहिमेसाठी ती प्रचंड मेहनत घेत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.