आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राउंड रिपोर्टमहा'शेतकरी आत्महत्या' राष्ट्र:शिंदे सरकारच्या काळात मराठवाड्यात रोज सरासरी 3 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

महेश जोशी/ नामदेव खेडकर | औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
आहेरवडगाव, सोनाजी चव्हाण यांची आत्महत्या - Divya Marathi
आहेरवडगाव, सोनाजी चव्हाण यांची आत्महत्या
  • ४९% उद्धव सरकारच्या, तर ५१% आत्महत्या एकनाथ शिंदे सरकारच्या काळात

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच गेल्या ३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी केलेला महाराष्ट्र "शेतकरी आत्महत्यामुक्त' करण्याचा संकल्प सपशेल फोल ठरला आहे. या वर्षाच्या ११ महिन्यांत मराठवाड्यात ९४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून पैकी ४६३ आत्महत्या (४९.३६ %) तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारच्या काळात, तर ४७६ (५०.६० %) शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात झाल्या.

म्हणजेच, उद्धव सरकारच्या ६ महिन्यांच्या कार्यकाळात सरासरी रोज २.५ तर शिंदे सरकारमध्ये सरासरी रोज ३ शेतकऱ्यांचा बळी गेला. या एकूण आत्महत्यांपैकी २७% एकट्या बीड जिल्ह्यात झाल्या असून त्यापाठोपाठ औरंगाबाद, नांदेड व जालना जिल्ह्याचा क्रमांक लागतो. विशेष म्हणजे या शेतकऱ्यांचे २२ % कुटुंबीय मदतीपासून वंचित आहेत.

आधी कोरडा अन् नंतर ओला दुष्काळ. यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. पत घसरत गेल्याने वेळेत कर्जफेड नाही. बँका नवीन कर्ज देत नसल्याने खासगी सावकाराकडे शेतकरी वळतो, व्याजामुळे भरडला जातो. अखेर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय समोर नसतो.

विभागात ९४० आत्महत्या:

राज्यात जानेवारी ते नोव्हेंबर २०२२ दरम्यान २१०० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. जानेवारी ते ३१ ऑक्टोबरदरम्यान ८४६ तर नोव्हेंबरमध्ये ९४ अशा एकूण ९४० आत्महत्या झाल्या. यापैकी फक्त ६५२ कुटुंबीयांना मदत पाेहोचली आहे.

मरणाची वाट पाहत आता इथंच पाय खोडत बसायचं, दुसरा पर्याय काय?

आहेरवडगावमध्ये डोंगराच्या पोटाला लागूनच काटे वस्ती आहे. या वस्तीवरचं शेवटचं घर परभू राहू चव्हाण (८५) यांचं. अंगात स्वेटर घालून परभू उन्हाला बसलेले. बाजूलाच पत्नी ठकूबाई (८२) कोंबड्यांना खुराड्यात घालण्यासाठी ‘खूड खूड’ असं ओरडत होत्या. परभू बोलू लागले, ‘मुलगा होता, तेव्हा जगण्याची फिकीर नव्हती. मला चालता येत नाही, कुठं जाता येत नाही. दीड एकर शेती आहे, पण नुसता मुरूमच. ती शेती पिकत नाही. हातपाय चालले तोपर्यंत बीडला जाऊन माळव्याचा धंदा केला. आता एका जागी बसून दिवस मोजतोय. माळकरी असल्यानं आयुष्यात कधी कोंबड्या पाळल्या नाहीत. पण, आता उपजीविकेसाठी कोंबड्या पाळाव्या लागल्या. परिस्थितीने नडलेल्या मुलाने फाशी घेऊन जीवन संपवले. मुलगा गेल्यानंतर सून, नातवंडांनी वाऱ्यावर सोडलं. त्यांचीही परिस्थिती चांगली नाही म्हणा. सून आणि नातू दोघेही आवंदा ऊसतोडणीसाठी कर्नाटकात गेले आहेत. म्हातारीला उठता-बसता येतं, म्हणून कोंबड्या पाळणे तरी शक्य झाले. मरणाची वाट पाहत इथंच पाय खोडत बसायचं. दुसरा पर्याय काय?’

पत्नीचा निर्धार : कष्टातून मुलांना शिकवेन, सासू-सासऱ्यांना सांभाळेन

आहेरवडगाव : मृत रवींद्र थोरात यांच्या पत्नीची जिद्द
आहेरवडगाव : मृत रवींद्र थोरात यांच्या पत्नीची जिद्द

आहेरवडगावमधीलच आरती रवींद्र थोरात (३३) यांच्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना भेटायला गेलो, तेव्हा सासू आणि दीर घरी होते. आरती स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित शिवण क्लाससाठी बीडला गेल्या होत्या. मग बीडमध्येच त्यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत ४ वर्षांचा मुलगा सार्थकही होता. आरती सांगू लागल्या, ‘संसार सुखात सुरू होता. पती शेती पाहायचे. थोडा आर्थिक ताण असायचा. पण, अचानक त्यांनी आत्महत्या केली अन् होत्याचे नव्हते झाले. सार्थकसह १० वर्षांची मुलगी पदरात टाकून ते गेले. मुलीला मामा सांभाळतो. मुलगा माझ्यासोबतच असतो. एक दिवस सामाजिक कार्यकर्त्या मनीषा जायभाये यांनी मोफत प्रशिक्षणाबाबत माहिती दिली. महिनाभरात प्रशिक्षण संपेल. मग गावीच शिवणकाम करेन, गावातील अन्य मुली, महिलांसाठीही शिवण क्लास घेईन.’आरती सांगतात, “आधी कधी घराबाहेर पडलेच नव्हते. पण, पतीच्या जाण्यानंतर मी हिंमत केली. ते असते तर अशी वणवण करायची गरज भासली नसती. आता कष्ट करून मुलांना शिकवणार, सासू-सासऱ्यांनाही नीटपणे सांभाळणार आहे.’

शेतीमुळेच बापाला जीव गमवावा लागलाय, मी दुसरा व्यवसाय करेन

रामपुरी : मृत अशोक पवार यांच्या मुलाची भावना
रामपुरी : मृत अशोक पवार यांच्या मुलाची भावना

गेवराई तालुक्यातील रामपुरी गाव. पवार कुटुंबीयांच्या घरात १३ वर्षांचा ओम अशोक पवार, विधवा आई, आजोबा अन् एक बहीण होते. संध्याकाळी ओम शेतात गेला होता. १० मिनिटांत तो आला तेव्हा पाय चिखलाने माखले होते. तो बोलू लागला, “शनिवार असल्याने शाळा लवकर सुटली. म्हणून दुपारीच उसाला पाणी द्यायला गेलो. वडील असते तर शेतात जायची गरज नव्हती. दोन एकर शेती एकटे पाहायचे. शेतात वेगवेगळे प्रयोग करायचे. या प्रयोगानेच तीन वर्षे शेती तोट्यात गेली अन् त्यांनी गळफास घेतला. माझ्यावर त्यांचा खूप जीव होता. मी मोठेपणी महाराज व्हावे यासाठी जालना जिल्ह्यातील एका वारकरी शिक्षण संस्थेत माझे अॅडमिशनही केले होते. गेवराईत मला तीन ड्रेस, चपला आणि खाऊ घेऊन दिला. मला गाडीवर जालन्याला घेऊन गेले. शाळेत सोडताना मी खूप रडलो होतो. मला तिथे करमले नाही, मग चौथ्या दिवशीच गावी परतलो. ते रागावले नाहीत. मला गावातल्या शाळेत टाकले. मोठा झाल्यावर मी शेती करणार नाही. शेतीमुळे माझ्या बापाला जीव गमवावा लागलाय. मी दुसरा व्यवसाय करेन.’

बातम्या आणखी आहेत...