आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष मुलाखत:पंकजा मुंडेंचे राजकारण मीच भगवानगडापासून वेगळे केले, महंत डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांनी मांडला लेखाजोखा

औरंगाबाद (शेखर मगर )एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सत्तेचा दुरुपयोग करत गडाला दहा लाखांचा दंड केला

ज्याप्रमाणे भगवानगडाची करोडो रुपयांचे मूल्य असलेला ट्रस्ट डॉ. वाय. एस. खेडकर यांनी लाटला अगदी त्याचप्रमाणे गोपीनाथ मुंडे यांनाही वडवणी येथील १७२ एकर जमीन कृषी महाविद्यालयासाठी हवी होती, पण मी ती दिली नाही. नंतर पंकजा मुंडे-पालवे यांना भाषणाच्या माध्यमातून गडाची मालकी हवी आहे; पण मी समाजाच्या हितासाठी खंबीरपणे विरोध केला. आत्तापर्यंत गडाचा वापर राजकीय पोळी भाजण्यासाठी केला गेला. यापुढे अशी चूक कदापि होऊ देणार नाही, असे मत भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांनी व्यक्त केले.

“दिव्य मराठी’ने मंगळवारी (१६ मार्च) भगवानगडावर महंतांची विशेष मुलाखत घेतली. महंतांनी या वेळी पंकजा यांच्यावर पुन्हा एकदा तोफ डागली. ते म्हणाले, “डॉ. खेडकर यांनी भगवानबाबांनी निर्माण केलेला भगवानगडाचा औरंगाबादेतील ट्रस्टच लाटला आहे. या ट्रस्टची औरंगाबाद शहरात अजबनगरची जमीन कोट्यवधी रुपये किमतीची आहे. एवढेच नव्हे, तर त्यांनी बाबांचे उत्तराधिकारी असलेले महंत भीमसिंग यांची संस्थेतून हकालपट्टीही केली होती. खेडकर यांचे शिक्षण बाबांनी केले, पण त्यांनी बाबांशी बेइमानी केली. श्री भगवान शिक्षण प्रसारक मंडळ डॉ. खेडकर यांची संस्था नसून गडाचीच संस्था आहे. या संस्थेच्या जमिनी कोट्यवधींच्या आहेत. मी या प्रकरणाला वाचा फोडली आहे.’

दरम्यान, या मुद्द्यावर पंकजा यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. महंत म्हणाले, सोशल मीडियावर माझी भाषणेही उपलब्ध आहेत. डॉ. खेडकर यांच्याविरोधात माझे विधान बिनधास्त प्रसिद्ध करा. आमचे दुधाने तोंड भाजले म्हणून आम्ही आता ताकसुद्धा फुंकून पीत आहोत. पंकजा यांना वाटतंय की वडील गोपीनाथ मुंडे यांनी गडाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करून वैभव प्राप्त करून दिले. प्रत्यक्षात असे काहीही नाही. अर्थात गोपीनाथ मुंडे यांनीच मला गडाच्या गादीवर बसवले हेसुद्धा खरे आहे. पण पंकजा यांना दसऱ्यानिमित्त भाषण करण्याचा मालकी हक्क हवा होता. त्यांना जनतेच्या मनातील मुख्यमंत्री अशी बिरुदावली मिळाली होती. प्रत्यक्षात त्यांची जनतेशी असलेली नाळ तुटत गेली होती.

मला नवल वाटले की, भाषणातून त्यांनी थेट भगवान गडालाच आव्हान दिले. त्यांनी गडाला डिवचले. पंकजा यांनी जनतेची कामे करणेही बंद केले होते. पंकजा यांना मी गडावरून राजकीय भाषण करू दिले नाही. म्हणून त्यांचा माझ्यावर राग आहे. त्यांच्या पराभवात माझा काहीही वाटा नाही.

देवेंद्र फडणवीस यांनी फूस दिली म्हणून मी त्यांना पराभूत करण्याचे समाजाला आवाहन केले, हे साफ खोटे आहे. पंकजांना गडावरून भाषणबंदी केली तर ४०० गावांमधून एकही जण मला जाब विचारायला आला नाही. उलट मी गडाला राजकारणापासून दूर ठेवल्यामुळे समाजाने माझे स्वागतच केले. पंकजाच नव्हे यापुढे कुणीही राजकारणी येथे येऊन भाषणबाजी करणार नाही. याची मी काळजी घेत आहे. समाजालाही ते आवडत आहे.’

सत्तेचा दुरुपयोग करत गडाला दहा लाखांचा दंड केला
गडावरून भाषणबंदी केल्यामुळे पंकजांनी सत्तेचा दुरुपयोग करत मला त्रास दिला. यशवंत ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत आम्हाला दहा लाखांचा निधी मिळाला होता. त्यात गडाने दहा लाखांचे योगदान दिले. यातून सभामंडप उभे राहिले. पंकजा यांच्याकडे ग्रामविकास मंत्रालय होते. मात्र इतर बांधकामात अडथळा निर्माण करणारा हा सभामंडप होता म्हणून आम्ही पाडला. पंकजा यांनी याचा वचपा काढत गडावर दहा लाखांचा दंड ठोठावला. तो आम्ही भरलादेखील. त्यांनी असे करायला नको होते, असेही डॉ. नामदेवशास्त्री यांनी नमूद केले.
डॉ.खेडकरांनी भगवानगड ट्रस्ट लाटल्याचा आरोप

बातम्या आणखी आहेत...