आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापारेषण नाट्य स्पर्धा:'दीपज्योती' नाटकाला प्रथम पारितोषिक; विद्युत कर्मचाऱ्यांनी गाजवली स्पर्धा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वीज क्षेत्रातील कर्मचारी, अधिकारी हे तातडीच्या सेवा कक्षेत येत असल्याने कायम एका तणावात असतात. मात्र नाट्यस्पर्धेतून त्यांच्यातील हॅप्पी हार्मोन्स अर्थात आनंदाच्या संप्रेरकांची वृध्दी होते, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे कार्यकारी संचालक रोहिदास म्हस्के यांनी केले.

महापारेषण मधील विद्युत कर्मचाऱ्यांच्या कसदार अभिनयाने आंतरमंडलीय नाट्य स्पर्धा गाजली; 'दीपज्योती' नाटकाला निर्मितीचे प्रथम पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी पुढे बोलताना म्हस्के म्हणाले की, संपूर्ण भारत देशात महापारेषण ही विद्युत पारेषण करणारी सर्वात मोठी कंपनी म्हणून ओळखली जाते. तापडीया नाट्यगृहात आयोजित महापारेषण कंपनीच्या आंतरमंडलीय नाट्य स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रम नुकताच पार पडला.

विजेच्या निर्मिती स्थानापासून ते वितरण केंद्रापर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत अखंडित व सुरळीतपणे वीज पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी डिसेंबर 2013 पासून संपूर्ण देशाचे अतिउच्च दाबाचे वाहिण्याचे जाळे हे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने एकत्रित काम करत आहे. मराठवाड्यात अतिउच्च दाबाची 132 केव्हि चे 69, 220 केव्हिचे 30 असे एकूण 99 उपकेंद्र ,400 केव्हिचे 04 उपकेंद्र आहेत व 765 केव्हिचे 01 उपकेंद्र आहे. या सर्व उपकेंद्रांना जोडणाऱ्या 9995 सर्किट किलोमीटर वाहिन्यांचे सुव्यवस्थापन व संचालन करत असताना पावर ग्रिडच्या कर्मचाऱ्यांच्या साह्याने संपूर्ण महाराष्ट्रातील वाहिनीचे नेटवर्क व पर्यायाने देशातील अतिउच्च दाबाचे पावर ग्रीड चे नेटवर्क सुस्थितीत ठेवायचे व संचलन करायचे काम हे महापारेषण मधील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी अहोरात्र करत असतो.

महापारेषण कंपनी आपल्या पायाभूत सुविधा मध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून (जसे GIS, HTLS इत्यादी चा ) आपले नेटवर्क मजबूत करत असते. नवीन येणाऱ्या एम. आय.डी. सी., औरिक औरंगाबाद याकरिता नवीन उपकेंद्र आणि वाहिन्या उभारण्याचे काम वेळोवेळी हाती घेतले जाते. कार्यरत असलेल्या विद्युत वाहिन्या आणि उपकेंद्रे सुव्यवस्थित ठेवण्यासाठी विविध चाचण्या वेळोवेळी केल्या जातात.

कोरोना सारख्या महामारीच्या काळातही वीज कर्मचाऱ्यांनी आपले वीज पुरवठा करण्याचे काम चोखपणे पार पाडले. अशा या अत्यावश्यक सेवेत मोडल्या जाणाऱ्या क्षेत्रात काम करताना कर्मचाऱ्यांच्या मनावर येणारा ताण कमी व्हावा व दैनंदिन कामात थोडासा विरंगुळा मिळून कर्मचाऱ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा यासाठी महापारेषण कंपनी एक वर्ष नाट्य स्पर्धा व दुसऱ्या वर्षी क्रीडा स्पर्धा अशा पद्धतीने दर दोन वर्षाला नाट्य स्पर्धेचे व क्रीडा स्पर्धेचे आलटून पालटून आयोजन करत असते.

अध्यक्षस्थानी औरंगाबाद परीमंडलाचे प्रभारी मुख्य अभियंता रंगनाथ चव्हाण हे होते. तर मुख्य कार्यालय मानव संसाधन विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक सुधीर वानखेडे यांच्यासह अधीक्षक अभियंता संजय परदेशी, मिलींद बनसोडे, रंगनाथ शेळके, संजीव कांबळे व नाट्यपरीक्षक जयंत शेवतेकर, ॲड. सुजाता पाठक, किशोर शिरसाठ यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्पर्धेत अती उच्च दाब, संचालन व सुव्यवस्था मंडल औरंगाबाद यांच्यावतीने सादर करण्यात आलेल्या डॉ. चंद्रकांत रमेशचंद्र शिंदे लिखीत व अतिरीक्त कार्यकारी अभियंता रवींद्र धनवे दिग्दर्शीत "दीप ज्योती" या दोन अंकी नाटकाला एकूण 10 पारितोषीकांसह निर्मितीचे प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. स्पर्धेत अउदा प्रकल्प मंडल औरंगाबादतर्फे सादर झालेल्या अरविंद जगताप लिखीत "स्टॅच्यू ऑफ लिबर्टी" या नाटकाला निर्मितीमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. अउदा संवसु मंडल परळीतर्फे रविशंकर झिंगे लिखीत "भयरात्र" हे नाटक सादर करण्यात आले. कराड येथे 7 ते 10 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या आंतरपरीमंडलीय नाट्य स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या दीपज्योती नाटकाच्या संपूर्ण संघाला कार्यकारी संचालक रोहिदास म्हस्के यांच्याहस्ते विजयी चषक प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारे महापारेषणचे नागार्जुन अकुला व राज्यस्तरीय दोन अंकी नाट्यलेखन व एकांकिका स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविणारे शशिकांत इंगळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महापारेषणचे मानव संसाधन मुख्य महा व्यवस्थापक सुधीर वानखेडे यांनी संपूर्ण राज्यातील महापारेषणच्या निवडक नाट्यकलावंतांचा एक संघ तयार करुन त्यांना योग्य प्रशिक्षणासह विविध स्पर्धेत प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठविण्याबाबत योजना आखत असल्याची माहिती यावेळी दिली.

परीक्षकांच्या वतीने जयंत शेवतेकर यांनी विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागासह मान्यवरांचे मार्गदर्शन नाट्यसंघांना मिळवून देवू असे सांगितले. अध्यक्षीय भाषणातून बोलतांना प्रभारी मुख्य अभियंता रंगनाथ चव्हाण यांनी नाटकातून व खेळांमधून कर्मचारी अधिकारी यांच्यामध्ये संघ भावना तयार होते, त्यामुळे कंपनीचे कामकाज सुरळीत होण्यास साहाय्य होते, परीणामी कोरोनाचे अडथळे येवूनही ही स्पर्धा रद्द न करता व्यवस्थापनाने 2020 ची स्पर्धा यावर्षी घेतली, असे सांगून स्पर्धेचे महत्व विषद केले. नाट्यसंघांच्यावतीने माधव चिल्के, अमोल अरणकल्ले व शशिकांत इंगळे यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधीक्षक अभियंता मिलींद बनसोडे यांनी केले. सूत्रसंचालन सीमा गाडेकर व रोहिणी घनबहाद्दूर यांनी केले. यशस्वीतेसाठी नाट्य व्यवस्थापन समितीचे कार्यकारी अभियंता संजय वाघ,विवेक कानडे,निवास कांबळे, अप्पर कार्यकारी अभियंता राठोड,देशमुख, वाळके ,व्यवस्थापक (मा. सं) चाटे,नवले आणि सहा. अभियंता अमोल अरणकल्ले व संयोजन समिती सदस्यांनी परीश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...