आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापरिनिर्वाण दिन:शिका... संघटित व्हा... संघर्ष करा! हेच ‘तीन' शब्द बाबासाहेबांंच्या चौथ्या पिढीला आजही वाटतात महत्त्वाचे..

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‘माझा तुम्हाला अंतिम संदेश एकच आहे - शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपला लढा स्वातंत्र्यासाठी आहे, माणूस म्हणून जगण्यासाठी आहे'... डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हेच तीन शब्द त्यांच्या चौथ्या पिढीलाही आजच्या परिस्थितीत गरजेचे वाटतात. आजच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने ‘दिव्य मराठी'ने आजच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आंबेडकरांच्या चौथ्या पिढीशी साधलेला हा खास संवाद.

शिक्षणातील गुंतवणूक महत्त्वाची - साहिल आंबेडकर आनंदराज आंबेडकर यांचा मुलगा
बाबासाहेब माझे पणजोबा होते हे वाक्य उच्चारतानाही माझ्या अंगावर रोमांच येतात. त्यांनी जे शिक्षणाचे महत्त्व संगितले, ते प्रत्येकासाठी आजही गरजेचे वाटते. शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध, असे ते नेहमी म्हणत. शिक्षणाच्या मदतीनेच आपण प्रस्थापित व्यवस्थेत आपले स्थान निर्माण करू शकतो. बाबासाहेबांंच्या राज्यघटनेमुळेच आपल्या पिढीला शिक्षणाचा हक्क मिळाला. पण ते आजही अनेकांना मोफत मिळत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे पैसे आहेत, साधने आहेत त्यांची मुले उच्च व दर्जेदार शिक्षण घेऊ शकतात आणि ज्यांच्याकडे पैसेच नाहीत ते आजही शिक्षणाच्या प्रवाहात नाहीत. यामुळे समाजातली ही दरी आजही कायम आहे. सध्या ज्यांच्याकडे ऑनलाइन सुविधा आहेत त्यांचे शिक्षण ‘स्मार्ट' झाले आहे आणि खेड्यातील लाखो मुले-मुली ज्यांच्याकडे नेट दूर, वीजही नाही त्यांचे काय? हे चित्र बदलले पाहिजे.
सर्वांना शेवटपर्यंत उच्च शिक्षणही मोफत मिळाले पाहिजे, ही सरकारची जबाबदारी आहे. बाबासाहेबांना खरे अभिवादन तेच असेल असे मला वाटते. (साहिल आंबेडकरने बीटेक केले आहे आणि आता तो मास्टर्सची तयारी करतो आहे.)

संघर्ष अटळ आहे...: सुजात आंबेडकर प्रकाश आंबेडकर यांचा मुलगा
राजकारणात सक्रिय असलेला आंबेडकरांचा पणतू सुजात सध्या लंडनमध्ये ‘इलेक्शन, कॅम्पेन अँड डेमोक्रसी’ याचे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. वंचित समाजाच्या पुनरुत्थानासाठी सत्तेत सहभागी झाल्याशिवाय पर्याय नाही हे बाबासाहेबांचे सूत्र त्याला महत्त्वाचे वाटते. आणि प्रस्थापित व्यवस्थेच्या हातात असलेल्या सत्तेत शिरायचे म्हणजे संघर्ष अटळ असल्याचे तो मानतो. २००८ ची अमेरिकेची आणि २०१४ ची भारताची निवडणूक जात, वर्ग, वर्ण या सर्व समीकरणांपेक्षा वेगळ्या ठरल्या. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत वंचित आघाडीचा कॅम्पेनर म्हणून जबाबदारी सांभाळल्यावर सुजात निवडणुकीचे तंत्र आणि आधुनिक प्रचार पद्धती याचा अभ्यास करीत आहे.

संघटित झाल्याशिवाय पर्याय नाही : हृतिका आंबेडकर भीमराव आंबेडकरांची मुलगी, भीमराव आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू
बाबासाहेबांंचे विचार मानणारा मोठा वर्ग आहे. मात्र तो संघटित नसल्याने आपली प्रगती करू शकत नाही. बाबासाहेबांचे विचार आपल्या जगण्यात उतरवायचे असतील तर संघटनाशिवाय पर्याय नाही. आपण महिलांचे उदाहरण घेऊ, बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल आणून महिलांना चूल आणि मूल या जोखडातून बाहेर काढले. त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी दिली, अधिकार दिले. ओळख दिली. म्हणून आज आपल्या देशातील महिला एवढी प्रगती करू शकल्या, करत आहेत. खरं तर फेमिनिझमच्या आधी बाबासाहेबांनी आपल्याला समानता शिकवली, कायद्याने ती संधी दिली. पण, महिला संघटित राहत नाहीत म्हणून एकट्या पडतात, अन्याय-अत्याचाराच्या बळी ठरतात. हे चित्र बदलले तरच ते बाबासाहेबांसाठी खरे अभिवादन ठरेल.
बाबासाहेबांनी जे विचार मांडले, जे लिहिले ते पुढल्या पिढीपर्यंत पोहोचवणे आपले कर्तव्यच नाही तर जबाबदारी आहे. त्यासाठी आपण आता संघटित होण्याशिवाय पर्याय नाही.
(हृतिका आंबेडकर सध्या कायद्याचे शिक्षण घेत असून क्रिमिनॉलॉजी या क्षेत्रात तिला काम करायचे आहे.)

शब्दांकन : दीप्ती राऊत

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser