आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझं गाव, माझी जबाबदारी:आमदरीचे गावकरी वेशीच्या आतच राहिल्याने कोरोना वेशीबाहेरच थांबला!

औरंगाबाद (दिलीप पाईकराव)2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोनशे लोकसंख्येच्या आमदरीत आजवर एकही बाधित नाही; आरोग्य सुविधा नसतानाही ग्रामस्थांनी जपले आरोग्य

देशात कोरोनाचा कहर सुरू आहे. मोठ्या शहरांपासून ते वाडी-वस्त्यांपर्यंत कोरोनाने हातपाय पसरले आहेत. मात्र उमरखेड तालुक्यातील आमदरी (जि. यवतमाळ) येथील गावकऱ्यांना कोरोना विषाणू स्पर्शही करू शकला नाही. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत एकही ग्रामस्थ बाधित झाला नसल्याने गावकरी ‘खुशाल’ आहेत. गावातील काही सुशिक्षित तरुणांनी गावात जनजागृती केल्यानंतर गावातील कोणीही व्यक्ती वेशीच्या बाहेर पडत नाही. खूपच आवश्यक काम असले तरच ते तालुक्याच्या ठिकाणी जातात. ग्रामस्थांच्या स्वयंशिस्तीमुळे कोरोना वेशीबाहेरच थबकला आहे.

उमरखेड तालुक्यात सध्या २१२ सक्रिय रुग्ण आहेत. आजवर २७ बाधितांचा मृत्यू झाला असून यात शहरातील १९ तर ग्रामीण भागातील ८ रुग्णांचा समावेश आहे. कुपटी ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या आमदरी या दोनशे लोकवस्तीच्या गावात कोरोनाला अद्यापही प्रवेश मिळाला नाही. ग्रामपंचायतीचे सरपंच सुदर्शन ठाकरे आणि आमदरीचे पोलिस पाटील रणजित बहादुरे राजेश मनवर यांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून ग्रामस्थांना सावध केले. ग्रामस्थांनीही कोरोना नियमांचे काटेकोर पालन केल्याने कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही गाव सुरक्षित राहिले. पण गावात अद्याप लस पोहोचली नाही. गावकरी लसीला घाबरत आहेत. गावात अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न उरकले जाते.

आरोग्य उपकेंद्र ५ किलोमीटरवर : डोंगराच्या कुशीतील आमदरी गाव कुपटी गट ग्रामपंचायतीत आहे. कुपटी आमदरीपासून ५ कि. मी. वर आहे. तेथेच आरोग्य उपकेंद्र आहे. गावात साधे किराणा दुकान किंवा पीठाची गिरणीही नाही. गावात कुणी आजारी पडले तर ५ किमीवरील उमरखेडच्या रुग्णालयात न्यावे लागते. वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याचे भान ठेवून ग्रामस्थ आपले आरोग्य जपतात.

कोरोनाला दूरच ठेवले
आमदरीतील २०० लोकसंख्येपैकी पन्नासवर लोक कामाच्या शोधात वेगवेगळ्या शहरांत गेले आहेत. बाहेरगावी राहण्यास गेलेल्या लोकांना गावी परतायचे असल्यास त्यांना १४ दिवस क्वॉरंटाइन राहण्याचा ग्रामपंचायतीने नियम घालून दिला आहे. अत्यावश्यक काम असेल तरच गावातील लोक शहरात जातात. तेथेही कोरोनाच्या नियमांचे पालन करतात. त्यामुळे ग्रामस्थांनी आजवर कोरोनाला दूरच ठेवले आहे.

चहुबाजूंच्या गावांत रुग्ण : आमदरी हे गाव डोंगाराच्या कुशीत वसलेले गाव आहे. या गावाच्या पंचक्रोशीत येणारे मरसूळ, बेलखेड, कुपटी, सुकळी आदी गावांत कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. मात्र आमदरी यास अपवाद आहे.

प्रतिकारशक्तीसाठी काढा
कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी ग्रामस्थ नियमितपणे काढा घेत असल्याचे पोलिस पाटील रणजित बहादुरे यांनी सांगितले. गुळवेल, अद्रक किंवा सुंठ, मिरे, कलमीच्या काढ्यासह कडुलिंबाच्या सालीचा अर्क घेऊन ग्रामस्थ आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवत आहेत. गावात कोणतीही आरोग्य सुविधा नसताना कोरोना आजवर कोणालाही स्पर्श करू शकला नाही, हे आमचे सुदैव आहे, असे येथील तरुण शुभम शिंगणकर म्हणाला.

बातम्या आणखी आहेत...