आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र दिन विशेष:​​​​​​​मरणालाही इथे जात सांगावी लागते! माउलींच्या आपेगावात आदर्श परिपाठ; अन्यत्र जातीनिहाय स्मशानघाट

पैठण (डाॅ. शेखर मगर / रोशनी शिंपी)6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • परंपरेला कसा छेद देणार..? सरकारी योजनेतूनच बांधले

पाचोडपासून १० किलोमीटर अंतरावरील हर्षी खुर्द गाव. तीन हजारांची लोकवस्ती. गावाच्या वेशीवरच आमदार निधीतून उभारलेली दलित समाजासाठीची सुसज्ज स्मशानभूमी दिसते. शेजारच्या शेतात काम करणाऱ्या कुसुमबाई कुलट म्हणाल्या, ‘आमच्या गावात फक्त बौद्ध समाजासाठी ही स्मशानभूमी आहे. बाकीचे सगळे आपापल्या शेतातच अंत्यविधी करतात. शेत नसलेले नदीच्या काठावर.’ भास्कर चांदणेंनी सांगितले की ‘गावात मातंगांचं स्मशान वेगळं अाहे अाणि बौद्धांचं वेगळं’. चांदणे मातंग समाजाबद्दल सांगत होते. हर्षी बुद्रुकचे सरपंच आबासाहेब झिने म्हणाले, ‘देशात लोकशाही असली तरी गावाची स्वत:ची एक व्यवस्था आहे, परंपरा अाहे. उर्वरित. पान ५

बाकीचे शेतात अंत्यविधी करतात, दलितांना मात्र गायरानावर जावं लागत होतं. पावसाळ्यात खूप हाल होत. गुडघ्यापर्यंत चिखल. मग मृतदेह नेणार कसा? सगळ्यांचे एकमेकांशी मैत्रीचे संबंध आहेत, पण अंत्यसंस्काराबाबत जातिव्यवस्था आहेच. - अर्जुन झिने, ग्रामस्थ

‘महाराष्ट्र दिन’ आज साजरा करताना ‘कोरोना’चे सावट आहे. गावागावात चिता पेटत आहेत. आणि, त्याच वेळी त्याहून दाहक वास्तव समोर येत आहे. ‘एक गाव, एक पाणवठा’चे कौतुक सांगणाऱ्या साठीच्या महाराष्ट्रात आजही ‘एक गाव, एक स्मशानघाट’ मात्र नाही. राज्यातल्या अनेक गावांत हेच चित्र आहे. ‘दिव्य मराठी’ टीम याचा मागोवा घेण्यासाठी पोहोचली ती संत एकनाथ - ज्ञानेश्वरांच्या पैठण तालुक्यात. आणि, जातीनिहाय स्मशानभूमींचे वास्तव समोर आले. त्यामागे कारण एकच सांगितले गेले - ‘परंपरा’. फुले- शाहू- आंबेडकरांच्या महाराष्ट्राची ही ‘परंपरा’ कधी झाली?

अापेगाव : ज्ञानदेव माउलींच्या आपेगावात आदर्श परिपाठ
आपेगावच्या पारावरही कोरोनाच्याच गप्पा रंगलेल्या. स्मशानभूमीचा विषय निघताच भागवत भारती म्हणाले, ‘इथे गोदाकाठावरच प्रत्येकाचा अंत्यसंस्कार होतो. मुस्लिम बांधवांचे कब्रस्तान आहे फक्त. बाकी सर्व जातीधर्मांची कुटुंबे गोदाकाठावरच अंत्यसंस्कार करतात ज्ञानेश्वर माउलींच्या या आपेगावात कोणताही जातीवाद नसल्याचा इथला प्रत्येकजण अभिमानाने सांगत होता. सगळे आनंदाने नांदतात, मृत्यूनंतरही एकाच घाटावरून अलविदा घेतात, असे सुनील काळे म्हणाले.

पाचोडा : जातिनिहाय स्मशाने, वाद नको हे कारण; पूर्वापार परंपरेचे समर्थन
पाचोडमध्ये तेली, ख्रिश्चन, मुस्लिम आणि हिंदू अशा वेगवेगळ्या स्मशानभूमी असल्याचे दिसून आले. हिंदू स्मशानभूमीत स्मशानजोगी म्हणून ललिता पत्रेवार राहतात. त्या म्हणाल्या, ‘हिंदू आणि तेली समाजाच्या दोन्ही स्मशानभूमींची देखभाल आम्हीच करतो. वर्षानुवर्षे या जातींचे लोक आपापल्या

स्मशानभूमीतील अंत्यविधी करीत आलेत. येथे बौद्धांसाठी पारंपरिक स्मशानभूमी आहे. लोकप्रतिनिधींनी तिथे विकासनिधीही खर्च केला आहे. आमच्या स्मशानात पायाभूत सुविधा आहेत. म्हणून आम्ही तिथे अंत्यविधी करतो, असे मत ग्रामपंचायत सदस्य दत्ता साहेबराव शेळके यांनी मांडले.

वडजी : पोटजातींचीच स्मशाने पण बदलाचीही सकारात्मक सुरुवात
हर्षी गावांपासून १४ कि.मी. अंतरावरील वडजी गाव. येथे स्वतंत्र स्मशानभूमी अाहे. दलित समाजासाठी गावाच्या जुन्या भागात तिसरी शेड आहे, पण तिथे कुणीही अंत्यविधी करत नाही. कारण तेथे जाण्यास रस्ता नाही. गावचे सरपंच भाऊसाहेब गोदरे यांनी हे चित्र बदलण्यास सुरुवात केली अाहे. ते म्हणाले, ‘पूर्वी आमच्या गावात जातीयवाद होता. आता अंत्यविधीसाठी कुणीच विरोध करत नाही. फक्त भांड समाजाचे आणि बौद्धांचे स्मशान वेगळे आहे. मी स्वत: गावाच्या सामायिक स्मशानात बौद्धांचे अंत्यविधी पार पाडले.

पाेटजातींच्याही स्वतंत्र स्मशानभूमी
‘इतर समाज तर सोडाच मराठा समाजाच्याच दोन वेगवेगळ्या स्मशानभूमी आहेत आमच्या गावात. भांड आणि गोधरे या दोन्ही मराठा समाजातील पोटजातींसाठी स्वतंत्र स्मशानभूमी आहेत. - विठ्ठल झिने, पोलिसपाटील

वाद नकाे म्हणून तेली समाजाचे स्मशान
गाव म्हटला की सर्वांना सांभाळून घ्यावे लागते. वर्षानुवर्षे चालत अालेली परंपरा पाळावी लागते. वादविवाद होऊ नयेत, म्हणून गावात आम्ही तेली समाजाने स्वतंत्र स्मशानभूमी बांधली अाहे. पण काही प्रश्न नाही. - सरिता धारकर, ग्रामपंचायत सदस्य

परंपरेला कसा छेद देणार..? सरकारी योजनेतूनच बांधले
जनसुविधा योजनेतून गावासाठी स्मशानभूमीची जागा मिळवली आहे. तिथे मला शेड उभारायचे आहे. येथे फक्त बौद्धांचा अंत्यविधी केला जातो. सवर्ण समाजातील लोक शेतात जातात. परंपरा तशी चालत आली आहे. - भक्तराज झिने, सदस्य, पंं.समिती

पाचोड, हर्षी, वडजी आणि आपेगाव या चार गावांमध्ये ‘दिव्य मराठी’ची टीम पोहोचली तेव्हा प्रत्येक गावाच्या पारावर कोरोनाच्याच गप्पा चालल्या होत्या. शहरातील लोक पाहून अनेकांनी चेहऱ्यावरचे मास्क सावरले. विषय अर्थातच कोरोना रुग्णसंख्येचा आणि वाढलेल्या मृत्यूंचा. सगळ्यांच्या डोळ्यासमोर बातम्यांमधील धगधगणाऱ्या चिता. इथल्या स्मशानवाटा मात्र सुदैवाने ओस पडलेल्या. दुर्दैव होतं ते जातीनिहाय स्मशानभूमींच्या कथा ऐकून.

बातम्या आणखी आहेत...