आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौतुकास्पद:राष्ट्रीय कुस्ती चाचणी स्पर्धेत महाराष्ट्राचे वर्चस्व; 1 महिला, 4 पुरुष मल्लांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय कुस्ती महासंघातर्फे लखनऊ व सोनिपत हरियाणा येथे झालेल्या अनुक्रमे 15 वर्षाखालील आणि 20 वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती संघ निवड चाचणी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत महाराष्ट्राच्या युवकांनी वर्चस्व राखले आहे. यामध्ये 1 महिला, 4 पुरुष मल्लांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

महाराष्ट्राच्या श्रावणी लवटे, प्रणय चौधरी, तुषार पाटील, तनिष्क कदम, महेंद्र गायकवाड या 5 कुस्तीपटूंची मनामा (बहरिन) येथे 2 ते 10 जुलैदरम्यान होणाऱ्या आशियाई आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. देशाला कुस्तीमध्ये पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून देणारे खाशाबा जाधव यांच्यापासून आजपर्यंत महाराष्ट्राला कुस्तीची मोठी परंपरा लाभलेली आहे, लालामातीतून मॅटवर आलेले युवा मल्ल आता ती परंपरा पुढे चालवत आहे.

निवड झालेले खेळाडू :

  • मुलींच्या 15 वर्षाखालील 36 किलो वजन गटात श्रावणी लवटेने प्रथम क्रमांक मिळवत राष्ट्रीय संघात स्थान मिळवले. श्रावणी आयएस कुस्ती केंद्र दोनवडे, कोल्हापूर येथील खेळाडू आहे. तिला प्रशिक्षक संदीप पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
  • मुलांच्या ग्रीको रोमन प्रकारात गटात 52 किलो वजन गटात कोकण विभागाचा स्टार मल्ल प्रणय चौधरीने निवड चाचणीत बाजी मारली. तो मुळ ठाणे जिल्हाचा आहे. तो सध्या पुण्यातील रुस्तम ए हिंद कुस्ती अकादमीत येथे सराव करतो. त्याला महाराष्ट्र केसरी पहिलवान अमोल बुचडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
  • मुलांच्या ग्रीको रोमन प्रकारात 57 किलाे वजन गटात राज्याचा युवा आंतरराष्ट्रीय मल्ल तुषार पाटीलने पुन्हा एकदा भारतीय संघात स्थान मिळवले. तो मुळचा कोल्हापुरच्या लाला मातील मल्ल आहे. तुषार भारतीय क्रीडा प्राधिकरण कांदिवली मुंबई केंद्रातील नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये सराव करतो. त्याला एनआयएस प्रशिक्षक अमोल यादव व अजय सिंग यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
  • मुलांच्या फ्री स्टाइल प्रकारात 62 किलो वजन गटात तनिष्क कदमने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तनिष्क हा सह्याद्री कुस्ती संकुल पुणे येथे मल्ल आहे. त्याला माजी दिग्गज मल्ल विजय बराटे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

भविष्यातील महाराष्ट्र केसरीचा दावेदार सोलापूरचा महेंद्र गायकवाड :

बहरिन येथील स्पर्धेसाठी सोलापूरच्या 20 वर्षीय युवा मल्ल महेंद्र गायकवाडची निवड झाली आहे. तो 125 किलाे वजन गटात भारताचे प्रतिनिधीत्व करेल. वजनदार असला तरी अतिशय चपळ व वेगवान खेळी ही त्याची वैशिष्ट आहे. त्याच्याकडे भविष्यातील महाराष्ट्र केसरी गदेचा दावेदार म्हणून देखील पाहिल्या जाते. तो सध्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे येथे नियमित सराव करतो. तो अर्जुन पुरस्कार प्राप्त काका पवार यांचा पट्ट्या आहे. सर्वसाधारण कुटुंबातील हा पहिलवान आहे.

बातम्या आणखी आहेत...