आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:स्वप्न गगनाला गवसणीचे, ओढ मराठवाड्याच्या मातीची; महाराष्ट्रकन्या नांदेडच्या योगिता शहा यांचे ‘नासा’च्या मंगळ मोहिमेत योगदान

नांदेड (शरद काटकर )एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर तपासण्याचे काम

‘नासा’च्या मंगळ मोहिमेत योगदान असलेल्या योगिता शहा (पारेख) यांनी येथील आंध्र समिती हायस्कूलच्या विद्यार्थिनींना अवकाश संशोधन, अभियांत्रिकी, विज्ञान-तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्या मूळ नांदेडच्या असून त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण याच शाळेमध्ये झाले आहे. आंध्र समितीचे सहसचिव आय. जयराज यांच्याशी भ्रमणध्वनीवर झालेल्या संवादादरम्यान त्यांनी शाळेतील जुन्या आठवणींनाही उजाळा दिला.

योगिता शहा (पारेख) यांनी ‘नासा’मध्ये आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे. गगनाला गवसणी घालण्याचे स्वप्न बाळगून त्यासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या या महाराष्ट्र कन्येला आपल्या मराठी मातीची असलेली ओढ मात्र अतूट असल्याचे या संवादातून दिसून आले. योगिता यांनी येथील आंध्र समिती हायस्कूलच्या १९९१ च्या बॅचमधून दहावीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. चार वर्षांपासून त्या ‘नासा’च्या मंगळ मोहिमेसाठी काम करणाऱ्या टीममध्ये महत्त्वाचे योगदान देत आहेत.

नांदेडमधील आपली मैत्रीण अपर्णा गाजरे यांच्या माध्यमातून त्यांनी मुख्याध्यापक आर. जे. जाधव यांना संदेश पाठवून संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याप्रमाणे मंगळवारी भ्रमणध्वनीवरून आय. जयराज यांच्याशी चर्चा केली. आंध्र समिती शाळेच्या एका माजी विद्यार्थिनीने ‘नासा’च्या टीममध्ये जाऊन अमूल्य योगदान दिल्याचा आम्हाला आनंद आणि अभिमान वाटतो, अशी भावना संस्थेचे अध्यक्ष जी. नागय्या, सचिव संजय तुला, शाळेचे चेअरमन डॉ. लक्ष्मणाचारी व कार्यकारी समिती संचालकांनी व्यक्त केली आहे.

लहानपणापासून योगिता यांना अवकाश संशोधनात रुची होती. इंजिनिअर होण्याची प्रेरणा वडिलांकडून मिळाल्याचे त्यांनी सांगितले. सध्या ते ‘नासा’च्या जेट प्रोफेशन लॅबमध्ये कार्यरत आहेत. मंग‌ळाच्या यशस्वी मोहिमेचा भाग झाल्याचा आनंद व्यक्त करताना योगिता यांनी, आपल्या शालेय जीवनातील अनेक आठवणींना उजाळा दिला. आंध्र समितीचे तत्कालीन शिक्षक दीक्षित, अंजुम, जोशी, पंडित, मुंगीकर बाई यांच्याप्रति त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर तपासण्याचे काम
योगिता शहा ‘एवेयिक्स डोमेन लीड’ पदावर कार्यरत आहेत. या प्रकल्पामध्ये एवेयिक्स हा इलेक्ट्रिकल बॉक्स असून रोव्हरचे एक अंग आहे. यात आरसीए रोव्हर, टाइम अ‍ँड क्लॉक, पॉवर रोव्हर तीन महत्त्वाचे भाग असतात. ते व्यवस्थित काम करीत आहेत का, यासाठीचे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर तपासण्याचे काम योगिता यांची टीम करीत होती.

बातम्या आणखी आहेत...