आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठवाड्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दरदिवशी उच्चांक गाठत आहे. मृतांचा आकडाही धडकी भरवणारा आहे. गेल्या वर्षी पीक असताना जितके रुग्ण सापडत नव्हते त्याहून अधिक जणांना आता लागण होत असल्याने सर्वांची चिंता वाढली आहे. ही गंभीर स्थिती पाहता केंद्राचे पथक विभागातील विविध जिल्ह्यांत पाहणी करून उपाययोजना सुचवत आहे. कागदावर ट्रेसिंग १५ ते २० दाखवली जात असली तरी पॉझिटिव्ह आकडा इतका मोठा आहे की, वास्तवात पॉझिटिव्हच्या संपर्कातील रुग्णांना शोधण्यात यंत्रणेची दमछाक होताना दिसते. परिणामी प्रत्येक जिल्ह्यात ट्रेसिंगचे काम प्रभावीपणे होताना दिसत नाही. शिवाय होम आयसोलेशनचा पर्याय निवडलेले लोकही नियमांचे उल्लंघन करून बाहेर भटकत असल्याने विभागात कोरोनाचा स्फोट झाल्याचे पाहायला मिळत आहे.
८ एप्रिल रोजी बीड, औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी, लातूर आदी जिल्ह्यांत केंद्राच्या पथकाने कोविड सेंटरला भेटी देऊन रुग्ण वाढण्याचे कारण शोधले आणि काही उपाय सुचवले. यात प्रामुख्याने होम आयसोलेशनचे प्रमाण वाढले असून बहुतांशी लोक नियमांचे पालन करत नाहीत. शिवाय पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर पूर्वीप्रमाणे शासकीय यंत्रणेकडून पाठपुरावा केला जात नसल्याने सौम्य लक्षणे असणारे लोक चाचणी न करता समाजात फिरत असल्याने संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.
असे झाले मृत्यू
नांदेड शहरात २२ एप्रिल २०२० रोजी पहिला ६५ वर्षीय कोरोनाबाधित आढळला. शहरातील पीरबुऱ्हाणनगर येथील ६४ वर्षीय व्यक्तीचा ३ एप्रिल २०२० रोजी कोरोनाने पहिला मृत्यू झाला. त्यानंतर २४ ऑक्टोबर २०२० रोजी मृत्यूने ५०० चा टप्पा ओलांडला. लोहा तालुक्यातील ४५ वर्षीय महिलेचा यात समावेश होता. त्यानंतर ९ एप्रिल २०२१ रोजी मृत्यूने १०२३ चा टप्पा ओलांडला.
बीड, हिंगोलीमध्ये केला होता अॅपचा प्रयोग
यापूर्वी बीडमध्ये आरोग्य विभागाच्या वतीने होम आयसोलेट रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी अॅपचा उपयोग केला होता. आरोग्य सेतू अॅपबरोबरच बीड प्रशासनाचे अॅपही रुग्णाच्या मोबाइलमध्ये डाऊनलोड केले जात असे. यात रुग्णाचे लाइव्ह लोकेशन कंट्रोल रूमला समजत होते. रुग्ण घराबाहेर पडताच याचे नोटिफिकेशन आरोग्य विभागाला मिळायचे. आरोग्य विभागातून लगेच संबंधितांना फोन करून घरात बसण्यास सांगितले जायचे. हिंगोलीतही पॉझिटिव्ह रुग्णांना शोधण्यासाठी अशाच प्रकारे प्रयत्न केले जात होते. पण रुग्ण वाढले तसे आरोग्य व प्रशासन स्तरावरील ताण वाढला असून आता ही बाब शक्य होत नसल्याचे सूत्र म्हणाले.
नांदेडमध्ये कोरोनाच्या मृत्यूने ओलांडला हजाराचा टप्पा!
नांदेड : श्री गुरुगोविंदसिंघजी शासकीय रुग्णालयात रुग्ण मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.
नांदेड| राज्यासह जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. तब्बल दीड वर्षापासून कोरोनासोबचा हा लढा सुरूच आहे. शुक्रवारी कोरोना मृत्यूने एक हजाराचा टप्पा ओलांडला. नांदेडमध्ये शुक्रवारी १६५० जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत, तर २७ जणांचा मृत्यू झाला. आत्तापर्यंतचा पाॅझिटिव्ह रुग्णांचा आजचा सर्वाधिक आकडा आहे.
झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या आणि त्याबरोबरच मृत्यूचेही प्रमाण भीतिदायक झाले आहे. मागील वर्षी एका रुग्णाचा मृत्यू झाला तरी अंगावर काटे येत होते. आज दररोज मृत्यूंचा नवा उच्चांक तयार होत आहे.
जिल्हा प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत असले तरी नागरिकांमधून मात्र म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यातच आता पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५३ हजार ९९२ वर पोहोचली आहे. शासकीय व खासगी रुग्णालयेही रुग्णांनी फुल्ल झाली आहेत. अनेकांना बेड मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यातच आता कोरोनाबाधितांसाठी महत्त्वाचे असणाऱ्या रेमडेसिविर औषधाचा काळाबाजार केला जात आहे. रोजचा मृत्यूंचा आकडा एवढा आहे की स्मशानभूमीतही अंत्यविधीसाठी वेटिंगवर राहावे लागत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.