आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंकजा मुंडेंचा इशारा:ओबीसींच्या विरोधातील षडयंत्र खपवून घेतले जाणार नाही; आगामी निवडणुकीपूर्वी आरक्षण पूर्ववत करण्याची केली मागणी

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • औरंगाबादेत पार पडला ओबीसींचा विभागीय जागर मेळावा

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. त्यामुळे या निवडणुकीत अन्याय झाला, आता तो आगामी निवडणुकीत होता कामा नये, यासाठी निवडणुकीपूर्वी हे आरक्षण पूर्ववत करावे अशी मागणी करत ओबीसींच्या विरोधातील कोणतेही षडयंत्र खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी औरंगाबादेत दिला.

भाजपच्या वतीने ओबीसी जागर अभियानांतर्गत श्रीहरी पॅव्हेलियन, दर्गा रोड येथे पार पडलेल्या विभागीय मेळाव्यात त्या बोलत होत्या. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, आ. संजय कुटे, आ. अतुल सावे, माजी मंत्री राम शिंदे, आ. हरिभाऊ बागडे, बापू घडामोडे, शहराध्यक्ष संजय केनेकर आदींसह मराठवाडयातील ओबीसी बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

राज्य सरकारने ओबीसी बांधवांवर मोठा अन्याय केला आहे. या अन्यायाचा संघर्ष बुथ स्तरापर्यंत घेऊन जा, संघर्षाची वज्रमुठ तयार ठेवा असे आवाहन पंकजा मुंडेनी यावेळी केले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, वंचित घटकांना न्याय देण्यासाठी त्यांना सत्तेत बसविणे हे लोकनेते मुंडे साहेबांच्या राजकारणाचे मुळ होते. एक पिता व नेता म्हणून त्यांचा मला नेहमीच अभिमान वाटत राहील. छत्रपती शिवराय, शाहू- फुले- आंबेडकरांच्या या पुरोगामी महाराष्ट्रात अजुनही जातीच्या भिंती संपुष्टात आल्या नाहीत. ओबीसींची परवड का होतेयं? जाती-पातीच्या नावावर गावा- गावांत शेतकऱ्यांवर, महिलांवर अन्याय, अत्याचार होतात याकडे राज्य सरकार लक्ष देणार आहे की नाही? असा सवाल त्यांनी केला.

आरक्षण टिकवून दाखवा, कौतुक करू -
आम्ही सत्तेत असताना ओबीसी आणि मराठा समाजाला आरक्षण दिले. पण महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे ते रद्द झाले. ओबीसींवर आरक्षणाची टांगती तलवार ठेवू नका.कोर्टात अध्यादेश टिकवून दाखवा, आम्ही तुमचे कौतुक करू अशा शब्दांत राज्य सरकारला सुनावले. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना आरक्षण मिळाले नाही, त्यामुळे त्यांचेवर मोठा अन्याय झाला. आता आगामी निवडणुकीत हा अन्याय आणि ओबीसींच्या विरोधातील कोणतीही कृती खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा देत ओबीसींच्या बांधवांच्या संघर्षाच्या या लढाईत न्याय मिळेपर्यंत लढत राहू असे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...