आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एफडीआयमध्ये महाराष्ट्र नंबर 1:गुजरात, कर्नाटक राज्यांना दोन वर्षांमध्ये मागे टाकले, परदेशी गुंतवणूक खेचण्यात देशात अव्वल

महेश जोशी | छत्रपती संभाजीनगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याच्या औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधा, अनुकूल वातावरण, कुशल मनुष्यबळाची उपलब्धता आणि पोषक धोरणांमुळे सर्वाधिक थेट परदेशी गुंतवणूक खेचून आणणारे महाराष्ट्र देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळातील दोन वर्षांत गुजरात आणि कर्नाटकने महाराष्ट्राला पिछाडीवर टाकले होते. शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेत येताच महाराष्ट्राने पहिले स्थान परत मिळवलेे. देशाच्या एकूण थेट परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्राचा सर्वाधिक २८.५ टक्के वाटा आहे, हे विशेष. महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवाल-२०२२-२३ मधून ही बाब समोर आली आहे.

महाराष्ट्र हे थेट परदेशी गुंतवणूकदारांच्या (एफडीआय) पहिल्या पसंतीचे राज्य राहिलेले आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांत राज्याने हे स्थान गमावले हाेते. २०२०-२१ मध्ये १,६२,८६० कोटी रुपयांच्या एफडीआयसह गुजरात तर २०२१-२२ मध्ये १,६३,७९५ कोटी रुपयांच्या एफडीआयसह कर्नाटक सर्वाधिक परदेशी गुंतवणूक आणणारे राज्य ठरले. दोन्ही वर्षांत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. राज्यात एफडीआय घटण्यात कोरोनाचे कारण सांगितले जाते. मात्र, या काळात गुजरात आणि कर्नाटकमधील गुंतवणूक कित्येक पटीने वाढली आहे.
पाच राज्यांत ६२ टक्के एफडीआय : २०२२-२३ मध्ये ६२,४२५ कोटी गुंतवणुकीसह महाराष्ट्र सर्वाधिक एफडीआय खेचून आणणारे देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरले. २०१० ते २०२२ दरम्यान देशात ३८,२२,३५९ कोटी रुपयांची थेट परदेशी गुंतवणूक आली. यात सर्वाधिक २८.५ टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे. तर महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू आणि तेलंगणा या पाच राज्यांत एकूण एफडीआयच्या ६२ टक्के वाटा आहे.

अजून वाढणार गंंुतवणूक : आर्थिक पाहणी अहवाल -२०२२-२३ मध्ये सप्टेंबर २०२२ पर्यंतचीच आकडेवारी आहे. यानंतर १६ ते २० जानेवारीदरम्यान दावोसमधील जागतिक आर्थिक परिषदेत पहिल्यांदाच राज्याचे मंंुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत १ लाख ३७ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले. ही आकडेवारी जोडल्यानंतर एफडीआयमध्ये अजून वाढ होणार आहे.

२०२१ मध्ये राज्यातील ५२,५२३ उद्योगांमध्ये ३,१९,१९७ कोटीच्या गंुतवणूकीतून १६.२९ लाख रोजगार निर्माण झाले होेते. २०२२ मध्ये ५७,०२४ उद्योगांमध्ये ३,७९५४५ कोटीच्या गुंतवणूकीतून १९.८९ लाख रोजगार निर्माण झाले. वर्षभरात रोजगारांची संख्या ३.६० लाखाने वाढली. सर्वाधिक उद्योग व रोजगार पुण्यात आहेत.

पाच राज्यांत ६२ टक्के एफडीआय
गुंतवणूक २०२०-२१ २०२१-२२ २०२२-२३ एप्रिल १०-सप्टें.२२ (कोटी)
महाराष्ट्र १,१९,७३४ १,१४,९६४ ६२,४२५ १०,८८,५०२ (२८.५%)
कर्नाटक ५६,८८४ १,६३,७९५ ४१,६७८ ५५,५१,०४४ ( १४.४%)
गुजरात १,६२,८३० २०,१६९ २६,८६६ ३,६९,९९० ( ९.७%)
तामिळनाडू १७,२०८ २२,३९६ १२,२७२ २,४२,३९६ (६.३%)
तेलंगण ८६१८ ११,९६४ ७५७८ ----
भारत ४,४२,५६९ ४,३७,१८८ २,१०,१५६ ३८,२२,३५९

बातम्या आणखी आहेत...