आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हवामान बदल:मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात आजपासून तीन दिवस पावसाचे आगमन

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वीलेखक: संतोष देशमुख
  • कॉपी लिंक
पैठणच्या जायकवाडी जलाशयात सध्या ९७.८ टक्के जलसाठा झाला आहे.
  • जेथे पोषक वातावरण तेथेच परतीचा पाऊस पडण्याची शक्यता

यंदा सुरुवातीपासून कमी-अधिक फरकाने मराठवाड्यात मान्सूनचा चांगला पाऊस पडला आहे. सप्टेंबरच्या गत चार दिवसांत अपेक्षित पावसाच्या तुलनेत १४ टक्केच पाऊस पडला आहे. मात्र, शनिवारपासून वातावरणात वेगाने बदल होऊन ७ सप्टेंबरपर्यंत मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. १२ ते १५ सप्टेंबरदरम्यान एक सायकल तयार होऊन पाऊस पडेल. परतीचा पाऊस २० ऑक्टोबरपर्यंत जेथे अनुकूल वातावरण तयार होईल तेथेच पडेल, असा अंदाज हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे.

गतवर्षी जून व जुलैमध्ये कमी पाऊस पडला होता. सर्वत्र दुष्काळाचे सावट असताना ३० ऑगस्टपासून पावसाचे जोरदार पुनरागमन झाले होते. ३ सप्टेंबर सकाळी ११ वाजेपर्यंत ६९.७९ मिमी पाऊस पडला होता. यामुळे दहा टक्के पावसाची तूट भरून निघाली होती. परतीचा विक्रमी पाऊस पडल्याने खरिपातील कपाशी, तर रब्बीला संजीवनी मिळून गहू, ज्वारी, हरभरा, करडई आदी पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी झाली होती. यंदा जून ते ऑगस्टदरम्यान मराठवाड्यातील ७६ तालुक्यांपैकी ४० तालुक्यांत सरासरीपेक्षा जास्त तर २९ तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत ४ सप्टेंबरपर्यंत ५३५.६ मिमी सरासरी पावसाच्या तुलनेत ५६६.४ मिमी म्हणजे १०५.८ टक्के प्रत्यक्ष पर्जन्यमान झाले आहे. सप्टेंबरच्या चार दिवसांत २२.१ सरासरी अपेक्षित पावसाच्या तुलनेत केवळ ३.१ मिमी म्हणजे १४ टक्केच पाऊस पडलाय. यामुळे उर्वरित मान्सूनचा काळ कसा असेल, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
५ सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, बीड, लातूर आणि उस्मानाबाद तर ६ सप्टेंबरला उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली परभणी या जिल्ह्यांत मेघ गर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता मुंबई कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे. ६ व ७ सप्टेंबर रोजी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी धो धो पाऊस पडेल. नंदुरबार, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात उघडीप राहील. कोकणात कमी पाऊस पडेल. तर २० ऑक्टोबरपर्यंत उत्तर महाराष्ट्र, विदर्भात चांगला पाऊस पडण्याची शक्यता डॉ. साबळे यांनी वर्तवली आहे.

अचानक पडणाऱ्या पावसाचा धोका
आता सर्वदूर पाऊस पडणार नाही. सकाळी ऊन दुपारी काही वेळेत जेथे पोषक वातावरण तयार होईल तेथेच धो धो पाऊस पडेल. म्हणजेच अचानक पडणाऱ्या या मुसळधार पावसामुळे खरिपातील काढणीस आलेल्या पिकांना धोका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी, वेळेत सोंगणी व सुरक्षित ठिकाणी शेतमाल ठेवावा तर रब्बी पेरणीसाठी व जलसंचय होण्यासाठी परतीचा मान्सून उपयुक्त ठरणार आहे.

मराठवाड्यातील जलस्थिती
जायकवाडी ९७.०८ टक्के, विष्णुपुरी १००, येलदरी १००, सिद्धेश्वर ९७.५९, पेनगंगा ९३.३३, माजलगाव ७६.७३, मानार ७९.८९ टक्के भरले आहे. तर मोठ्या ११ प्रकल्पांत ८७.६१ टक्के, मध्यम ७५ प्रकल्पांत ५९.८६, लघु प्रकल्प ४२.१७, गोदावरी नदीवरील १३ बंधाऱ्यांत ६७.१४, तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २५ बंधाऱ्यात २३.०५८ टक्के तर एकूण ८७६ प्रकल्पांत ८२०४.३२ दलघमीच्या तुलनेत ६०३०.०३ दलघमी म्हणजेच ७३.५० टक्के समाधानकारक जलसंचय झाला आहे. मध्यम ५ कोरडे, ९ जोत्यात, १३ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी, लघुचे ४२ कोरडे ठाक आहेत तर १९६ जोत्यात आणि ११४ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी जलसंचय झालेला आहे.

राजस्थान व ईशान्य भारताकडे प्रगती
ईशान्येकडे मान्सूनची आगेकूच होणे म्हणजेच परतीचा मान्सून होय. १ सप्टेंबरपासूनच त्याची सुरुवात होत असते. सध्या ईशान्य व मध्य भारतात हवेचा दाब कमी आहे. वातावरणात वेगाने बदल होत आहे. वाऱ्याची दिशा बदलत आहे. राजस्थानात पाऊस थांबेल व ईशान्य मान्सून जोरात सुरू होईल. १२ ते १५ दरम्यान उत्तर महाराष्ट्र, विदर्भात पाऊस होईल. तर २० ऑक्टोबरपर्यंत राज्यात पावसाची शक्यता असल्याचे डॉ. साबळे यांनी स्पष्ट केले.