आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काहिलीतून सुटका:मराठवाड्यात औरंगाबादसह पाच जिल्ह्यांत बरसला पाऊस, नांदेड-किनवट राष्ट्रीय महामार्गावरील पूल वाहून गेले

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यातील औरंगाबाद नांदेड, बीड, परभणी व हिंगाेलीत गुरुवारी पाऊस झाला. या पावसाने पिकांना जीवदान मिळणार आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नांदेड-किनवट राष्ट्रीय महामार्गावरील खैरगाव, चिखली फाटा, जलधरा येथील तीन पर्यायी पूल वाहून गेल्याने १५ तासांपासून वाहतूक ठप्प झाली होती.

औरंगाबादेत सायंकाळी सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत बरसत होता. परभणी जिल्ह्यात जिल्ह्यात १३.१ मिमी पावसाची नोंद झाली. गुरुवारी पहाटे जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. सकाळी सहापर्यंत पावसाची भुरभुर सुरू होती. हिंगाेली जिल्ह्यात मात्र बुधवारी रात्रीपासून झालेल्या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. मात्र जिल्ह्यात अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई शहरापासून अवघ्या १२ किमी अंतरावर असणाऱ्या पाटोदा (ममदापूर) गावात गुरुवारी दुपारी ४ वाजता झालेल्या मुसळधार पावसामुळे गावातील मुख्य मार्गावरील नाल्या तुडुंब भरून वाहिल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले हाेते.

परभणी : पहाटे भुरभुर, नंतर उघडीप, पिकांना फायदेशीर
जिल्ह्यात गुरुवारी पहाटे पावसाने हजेरी लावली. काही दिवसांपासून पावसाचा खंड पडला होता. गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. पावसामुळे थोड्या प्रमाणात का होईना पिकांना आधार मिळाला आहे. जिल्ह्यात खरिपाच्या ९० टक्के पेरण्या झाल्या आहेत. उर्वरित १० टक्केही पूर्ण होतील, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे यांनी सांगितले.

हिंगोली : पिकांना जीवदान, शेतकऱ्यांत समाधान
जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून झालेल्या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. मात्र जिल्ह्यात अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. ७ जुलै रोजी रात्रीपासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. त्यामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. जिल्ह्यात सध्याच्या स्थितीत ७५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या.

औरंगाबाद : पैठण, वैजापूर, फुलंब्रीत पावसाची हजेरी
जिल्ह्यात वैजापूरमध्ये सायंकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. पैठणमध्ये एक महिन्यानंतर जायकवाडी, कारखाना, कातपूरमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. लासूर स्टेशन परिसरात सायंकाळी सहा वाजता पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. फुलंब्री तालुक्यात गुरुवारी तळेगाव, निधोरा टाकळी परिसरातील गावावर पावसाने कृपा केली.

बातम्या आणखी आहेत...