आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाने पूरती वाट!:मराठवाडा, विदर्भ अन् खान्देशात पुराच्या पाण्यात 21 जण गेले वाहून

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आैरंगाबाद : घरे, दुकानांत पाणी, दिवसभरात १२७ मिमी पाऊस

मराठवाडा, खान्देश, विदर्भ आणि कोकणात रत्नागिरी जिल्ह्यास मंगळवारी पावसाने जोरदार दणका दिला. नांदेड, बीड, लातूर जिल्ह्यांना पावसाचा जबर तडाखा बसला असून नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. लातूर, बीड जिल्ह्यातील पाझर तलाव फुटले असून मराठवाड्यात विविध ठिकाणी ९ , विदर्भात ९ आणि खान्देशात २ जण पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत.

राज्याच्या इतर भागातही जोरदार पाऊस सुरू अाहे. कोकणात चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी मुसळधार पाऊस झाला. तर मंगळवारी दुपारपासून कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यांमध्ये तब्बल ६० मिमी पाऊस पडला आहे.

मराठवाड्यात स्थिती गंभीर
मराठवाड्यात पावसाची स्थिती गंभीर झाली आहे. गोदावरीसह सर्वच प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. लातूर, बीड जिल्ह्यातील पाझर तलाव फुटले असून विविध ठिकाणी १० जण वाहून गेले आहेत. नांदेड, हिंगाेली, परभणी, बीड, लातूर अादी जिल्ह्यांना पावसाने अक्षरश: झाेडपून काढले.

हिंगोली जिल्ह्यात दोघे वाहून गेले. एका अनोळखीचा मृतदेह आढळला. परभणी जिल्ह्यात एक जण वाहून गेला असून शहरात अनेकांच्या घरात पाणी शिरले. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. बीड जिल्ह्यातही धरणे ओव्हरफ्लो झाली असून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. धबधबा पाहायला गेलेला एक वाहून गेला तर एकाला वाचवले आहे. गेवराई तालुक्यात अतिवृष्टीमुळे मारफळा, भेंड खुर्द, भेंड बुद्रुक व जातेगाव येथील ४ प्रकल्प फुटले.

आैरंगाबाद : घरे, दुकानांत पाणी, दिवसभरात १२७ मिमी पाऊस
यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच औरंगाबादेत मंगळवारी सायंकाळी पावसाचे ढगफुटीसारखे राैद्ररूप दिसून आले. सायंकाळी मात्र ७.१० ते ८.१० या तासाभरात मेघगर्जनेसह ढगफुटीसारखा प्रचंड वेगाने पाऊस झाला. यात पहिल्या ३० मिनिटांत ताशी १६६.७५ मिमी वेगाने ५६.२ मिमी पाऊस पडला, तर रात्री ८.३० पर्यंत १२७.५ मिमीची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली आहे. यंदाच्या मोसमातील हा पहिला जाेरदार पाऊस हाेता. अतिवृष्टी झाल्याने १०० पेक्षा अधिक वसाहतींतील घरांत, पैठण गेटसह प्रमुख बाजारपेठांतील दुकानांत पाणी शिरले. अग्निशमन विभागाला ८० काॅल आले. त्यांचे पाच बंब व जवानही उशिरापर्यंत मदतकार्यात व्यग्र हाेते.सविस्तर.

मराठवाडा : नांदेड जिल्ह्यात माजी आमदार राठोड यांचे पुत्र व नातू कारसह गेले वाहून नांदेडमध्येही पूरस्थिती निर्माण झाली आहे. विष्णुपुरी प्रकल्पाचे १४ दरवाजे उघडण्यात आले आहेत. कौठा रस्त्याने मुखेडकडे येत असताना दुथडी भरून वाहणाऱ्या नाल्याच्या पुलावरून कारने (एमएच २० डीजे ६९२५) मुखेडकडे येत असताना माजी आमदार किशनराव राठोड यांचे पुत्र भगवान राठोड व त्यांचा मुलगा संदीप राठोड कारसह वाहून गेले. नाल्यावरून कार खाली पडली आणि बुडाली. यात पिता-पुत्र बेपत्ता असून त्यांचा सेवक उद्धव देवकते झाडावर बसल्याने बचावला आहे. दरम्यान, वाहून गेलेली कार नंतर सापडली, मात्र पिता-पुत्रांचा अद्याप शोध सुरू आहे.

का होतोय एवढा पाऊस ? छत्तीसगड परिसरावर चक्रीय चक्रवात स्थिती

  • सध्या देशात मान्सूनच्या तीन प्रणाली सक्रिय आहेत, त्यामुळे राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस होत आहे.
  • दक्षिण छत्तीसगड आणि आसपासच्या परिसरावर चक्रीय चक्रवात स्थिती आहे. परिणामी विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व विदर्भात जोरदार पाऊस होत आहे.
  • मान्सूनचा आस त्याच्या नेहमीच्या जागी असून पश्चिमेला बिकानेर ते पूर्वेला बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे मध्य भारतासह पश्चिम भारतातील गुजरात, महाराष्ट्रात जोरदार पावसास अनुकूल स्थिती आहे.
  • महाराष्ट्राच्या दक्षिणेस परस्परविरोधी वाऱ्यांचे प्रवाह (शेअर झोन) वाहताहेत.
  • बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्यास अनुकूल स्थिती असून ११ सप्टेंबरपर्यंत हे क्षेत्र तयार होईल.

हर्सुल तलाव ओव्हरफ्लो, रात्री एक वाजता सांडव्यातून पाणी, खामनदी पात्रात...।

मंगळावारी औरंगाबाद शहरात झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण शहराला झोडपून काढले आहे. या ढगफुटीसदृश पावसामुळे हर्सुल तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. तर रात्री एक वाजता सांडवयातून पाणी, खामनदी पात्रात वाहत होते.

बातम्या आणखी आहेत...