आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावी निकाल:गुणवंतांचा पूर पण गुणवत्ता न कळल्याने विद्यार्थ्यांत संभ्रम; विद्यार्थ्यांना हवी होती परीक्षा, मेहनतीच्या गुणांचा आनंद निराळा

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
दुपारी 1 वाजेपासूनच शिक्षिका लॅपटॉप घेऊन मुलांचे निकाल पाहण्यासाठी सज्ज होत्या. मात्र, वेबसाइट सुरू झालीच नाही - Divya Marathi
दुपारी 1 वाजेपासूनच शिक्षिका लॅपटॉप घेऊन मुलांचे निकाल पाहण्यासाठी सज्ज होत्या. मात्र, वेबसाइट सुरू झालीच नाही

काेराेनामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. दुसऱ्या लाटेचा माेठा फटका बसल्याने यंदाच्या वर्षी दहावीच्या परीक्षा हाेऊ शकल्या नाहीत. पण विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाआधारे निकाल तयार करण्यात आला. यात औरंगाबाद व लातूर या दाेन्ही विभागांचा निकाल ९९.९६ टक्के इतका लागला आहे. औरंगाबाद, जालना जिल्ह्याच्या निकाल ९९.९७ टक्के लागला असून निकालात हे जिल्हे अव्वल असल्याची माहिती विभागीय शिक्षण मंडळाच्या प्रभारी अध्यक्ष सुगत्ता पुन्ने यांनी दिली. परंतु, परीक्षा न देता यश मिळाले असल्याने विद्यार्थी मात्र गुणवत्तेबाबत संभ्रमावस्थेत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार इयत्ता नववीचा अंतिम निकाल, दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापन तसेच दहावीचे अंतिम, तोंडी, प्रात्यक्षिकाआधारे विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले. त्याप्रमाणे मंडळाने विहित कार्यपद्धतीनुसार दहावीच्या परीक्षेचा निकाल घोषित केला. पुनर्परीक्षार्थींच्या विद्यार्थ्यांचा निकाल ८१.०४ टक्के इतका लागला. ८ हजार ८४९ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांपैकी ७ हजार १७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर नियमित विद्यार्थ्यांमध्ये प्रविष्ट झालेल्या १ लाख ७६ हजार २९० विद्यार्थ्यांपैकी १ लाख ७६ हजार २२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नियमित विद्यार्थ्यांमध्ये ६७, तर पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये १ हजार ६७७ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

परीक्षा तर हवीच -
शाळा बंद होती. ऑनलाइन क्लास सुरु होते. दहावीचे वर्ष असल्याने खूप मेहनतही केली. पण परीक्षा रद्द करण्यात आल्या. वेबसाइट हँग असल्याने निकाल उशीरा पाहता आला. मला ९८ टक्के गुण मिळाले आहे. हे गुण खूप चांगले असले तरी समाधान आणि मनस्वी आनंद देणारे वाटत नाही. परीक्षा होवून मिळालेल्या गुणांचा जास्त अभिमान वाटला असता. : निलू वैष्णव विद्यार्थीनी

गुणवत्ता आणि योग्यता कळण्यासाठी परीक्षा हवी -
मला ९४.८० टक्के गुण मिळाले आहेत. हे गुण फक्त वह्यांवर, स्वाध्यावर आहेत. मी वर्षभर तयारी केली आहे. किमान परीक्षा झाल्यावर माझी खरी गुणवत्ता तयारी कळाली असती. एव्हढेच नाही तर आम्हाला जी शाखा निवडायची आहे पुढे करिअर करायचे आहे. त्यासाठी आपण पात्र आहोत का हे ठरवता आले असते. त्यामुळे या निकालाचा आनंद आहे पण समाधान नाही. : ऋतुजा तुरे विद्यार्थीनी

परीक्षेतून मिळालेले कमी गुणही स्विकाले असते -
परीक्षा व्हायलाच हवी होती. याचे कारण परीक्षेमुळे स्पर्धा झाली असती. त्यातून कमी गुण जरी मिळाले असते तरी ते माझ्या मेहनतीचे असते. ते मी स्विकारलेही असते. परंतु आता मला ९५ टक्के गुण मिळाले आहेत. पण परीक्षेद्वारे आणखी गुण मिळू शकले असते असा विश्वास वाटतो. : काव्य बरडीया विद्यार्थी

गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय -
आधीच परीक्षा न घेता लागलेला हा निकाल तसा गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा आहे. सकाळपासून आपला निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी तात्कळले. पण सायंकाळी उशीरापर्यंत वेबसाईटवर आलेल्या अडचणीमुळे वारंवार पालक-विद्यार्थी शाळेत येवून विचारत होते.पण वेबसाइट हँग असल्याने निकाल पाहण्यात अडचणी आल्या केवळ एक ते दोन विद्यार्थी निकाल पाहू शकलेेत. हा निकाल म्हणजे नुसताच फुगवटा आहे. विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करायचे नाही अशा सूचनाही होत्या. चार पाच टक्के विद्यार्थी जे अनुत्तीर्ण दिसतात त्यांचे मूल्यांकन बोर्डाला न कळाल्याने आहे. : विजय पाटोदी पी.यु.जैन शाळा मुख्याध्यापक

करिअरबद्दल निर्णय घेणे कठीण
कोरोनामुळे एक दिवसही शाळेत गेलो नाही. कुठलेही प्रात्यक्षिक नाही. परीक्षा न देता गुण मिळाले. त्यामुळे या निकालाचा म्हणावा तसा उत्साह वाटत नाही. पुढे काय करावे, याचा गोंधळ निर्माण होत आहे. तरी, गणित, विज्ञान या विषयाचा माझा चांगला अभ्यास आहे. - साईप्रकाश दीपकसिंह ठाकूर, नांदेड.

पालकांशी चर्चा करूनच निर्णय
आठवीपासूनच अभियांत्रिकी, वैद्यकीयचे शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.तयारीही सुरू होती. मात्र मागील दीड वर्षांत अभ्यासात व्यत्यय आला. दहावीला ८१ टक्के गुण मिळाले खरे पण करिअरबद्दल अनेक प्रश्न आहेत. पालकांशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ. - ऋतूजा संजय दराडे, विद्यार्थिनी हिंगोली.

कोणत्या शाखेत जावे हेच कळेना
गुणवत्ताच कळली नसल्याने कला, वाणिज्य, विज्ञान कोणत्या शाखेत जाऊ, असा संभ्रम मुलांमध्ये निर्माण झाला आहे. यात शहरी भागात खासगी शिकवणीमुळे पालकांना कल समजतो. खरी समस्या ग्रामीण भागात आहे. पालकांना अपेक्षा असतात विज्ञान शाखेकडे मुलाने जावे. पण, आपला पाल्य तिथपर्यंत पोहाेचला आहे का? जाे निकाल शाळांकडून बोर्डाला गेला आहे ताेच कायम केला. यंदाच्या दहावी व मागील वर्षीच्या नववीच्या मुलांच्या करिअरवर परिणाम होईल. - पद्माकर कुलकर्णी, सदस्य, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ (बालभारती), नांदेड.

संधीचे सोने करत कौशल्यवृद्धी, ज्ञानप्राप्तीसाठी प्रयत्न करा : प्रा. सुनील श्रीवास्तव, शिक्षण तज्ज्ञ.
- कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांच्या हाती काहीच नव्हते. शासन आणि पालकांनी त्यांच्याबाबत जे निर्णय घेतले त्यावर अंमल करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता.
- पहिल्या, दुसऱ्या लाटेत परीक्षा रद्द झाल्या म्हणून पुढे हिच परंपरा कायम राहिल, या भ्रमात न राहता विद्यार्थ्यांनी याकडे संधी म्हणून पाहिले पाहिजे व दुप्पट जोमाने नवनवीन कौशल्य व ज्ञान घेण्यासाठी तयार राहायला हवे.
- आजवर दहावी व बारावीला अधिक महत्त्व दिलं गेलं. पण आता अकरावीलाही तितकचं महत्त्व देणे गरजेचे आहे. नवीन शिक्षण धोरणात येत्या काही काळात हे बदल अपेक्षित आहेत.
- अंत:र्मन शोधून आपली आवड जोपासत प्रत्येक विद्यार्थ्याने करिअरचा मार्ग शोधणे अत्यंत आवश्यक आहे.
- शाळा किंवा महाविद्यालयातून शिक्षण मिळत असले तरी बऱ्याचशा गोष्टी विद्यार्थी अनुभवातून शिकत असतात. त्यामुळे जास्तीत जास्त अनुभव कुठे मिळतेय याची माहिती त्यांनी घ्यावी.
- विद्यार्थी संभ्रमावस्थेत असतील तर पालकांनी त्यांना भविष्यासाठी साथ देत प्रेरीत केले पाहिजे.

गुणवत्तेत लातूर पुढेच
दहावीला शंभर टक्के गुण घेणाऱ्यांमध्ये राज्यात मराठवाडा अव्वल आहे. शंभर टक्के गुण मिळवणाऱ्या सर्वाधिक विद्यार्थ्यांमध्ये लातूरने यंदाही गुणवत्तेचा दबदबा कायम ठेवला आहे. लातूरचे विभागातील सर्वाधिक २७८ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत. औरंगाबाद विभागात २६१ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत. राज्यात एकूण ९५७ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत

माहिती न दिल्याने विद्यार्थी अनुत्तीर्ण
माध्यमिक शाळांमार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय केलेले गुणदान व मंडळाच्या धोरणानुसार देय असलेल्या अन्य सवलतींच्या गुणांचा लाभ प्रचलित पद्धतीनुसार देऊन तसेच मंडळाचे उत्तीर्णतेचे सर्व निकष विचारात घेऊन दहावीचा निकाल लावण्यात येणार होता. यासाठी नववीचे गुणही महत्त्वाचे होते. अनेकांनी गुणपत्रिका, मूल्यांकनाची माहिती उपलब्ध करून न दिल्याने अशा विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण हा शेरा बसल्याचे सुगत्ता पुन्ने यांनी सांगितले. औरंगाबाद विभागात तब्बल १ हजार ७४४ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांच्या पुनर्परीक्षेसंदर्भात निर्णय अद्याप झालेला नसल्याचे पुन्ने यांनी सांगितले.

लातूर विभागात मुलीच अव्वल
शाळास्तरावर झालेल्या अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर झालेल्या निकालात लातूर विभागातून १ लाख ५ हजार ३९० यापैकी १ लाख ५ हजार ३५७ विद्यार्थी उत्तीर्ण असून ९९.९६ अशी निकालाची टक्केवारी आहे. विभागाच्या स्थापनेपासून आजपर्यंत सर्वाधिक निकाल असल्याचे सांगण्यात येते. निकालात मुलीच पुढे आहेत. लातूर विभागात ४८ हजार ९४६ मुलींपैकी ४८ हजार ७५६ मुली उत्तीर्ण झाल्या. निकालाची टक्केवारी ९९.६१ अशी आहे.

बातम्या आणखी आहेत...