आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक तलवारबाजी क्रीडा स्पर्धा:औरंगाबादच्या 2 खेळाडूंनी जिंकले सुवर्ण; खेळाला केली दमदार सुरुवात

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना व औरंगाबाद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने व महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेच्या सहकार्याने आयोजित तलवारबाजी स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी यजमान औरंगाबादच्या खेळाडूंनी दोन सुवर्णपदक जिंकून दमदार सुरुवात केली.

विभागीय क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या 92 मुले व 96 मुली खेळाडू, 32 संघ व्यवस्थापक व प्रशिक्षक, 34 पंच पदाधिकारी सहभागी झाले आहेत. स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विरोधी पक्ष नेते आमदार अंबादास दानवे यांच्यासह जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रभारी क्रीडा संचालक डॉ. दयानंद कांबळे, एमओएचे सदस्य तथा राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे, कार्याध्यक्ष प्रकाश काठोळे, मार्गदर्शक अशोक दुधारे, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष एस. पी. जवळकर, डॉ. दिनेश वंजारे, राजकुमार सोमवंशी, शेषनारायण लोंढे, स्पर्धा प्रमुख डॉ. भूषण जाधव, राजू शिंदे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीस सर्व संघांनी मार्च पास करून पाहुण्यांना मानवंदना दिली.

राष्ट्रीय पदक विजेता खेळाडू शकेर सय्यद याने शपथ दिली. याप्रसंगी विविध शाळेतील १२०० विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोकुळ तांदळे यांनी केले, तर आभार क्रीडा अधिकारी लता लोंढे यांनी मानले.

रोमांचक लढतीत शाकेरची बाजी

फाईल मुलांच्या वैयक्तिक स्पर्धेत सेमी फायनलमध्ये औरंगाबादच्या शाकीर सय्यदने सेमी फायनलमध्ये कोल्हापूरच्या अनिल महिपतीचा 15 -10 ने पराभव करत अंतिम फेरी प्रवेश केला. दुसऱ्या सेमी फायनलमध्ये औरंगाबादच्या तेजस पाटीलने मुंबईच्या अनिल राठोड चा 15 -7 गुणांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली.

फायनलमध्ये शाकीर सय्यदने तेजसचा 15-12 गुणांनी पराभव करत सुवर्णपदक जिंकले. तेजसने रौप्य मिळवले.

वैदहीची वैभवीवर मात :

फाईल मुलींच्या सेमी फायनलमध्ये औरंगाबादच्या वैदेही लोहियाने कोल्हापूरच्या अंकिता सोलंकीचा 15-6 गुणांनी पराभव करत अंतिम फेरी प्रवेश केला.

अंतिम फेरीमध्ये वैदेही लोहियाने मुंबईच्या वैभवी इंगळेला 15-6 गुणांनी पराभूत करत स्पर्धेमध्ये औरंगाबादसाठी दुसरे सुवर्णपदक जिंकून दिले. वैभवीने रौप्य मिळवले.

गिरीशला सुवर्णपदक

ईपी मुलांच्या वैयक्तिक प्रकारामध्ये अंतिम सामन्यात लातूरच्या गिरीश जकातेने कोल्हापूरच्या प्रथम कुमार शिंदे याचा 15- 12 गुणांनी पराभव करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

बातम्या आणखी आहेत...