आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वप्नातील ग्रामीण भारत:‘सांसद आदर्श ग्राम’ योजनेत महाराष्ट्र राज्य सपशेल नापास, टॉप 5 मध्ये राज्यातले एकही गाव नाही

औरंगाबाद / महेश जोशी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील ग्रामीण भारत घडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या सांसद आदर्श ग्राम योजनेचा देशभरात फज्जा उडाला आहे.

पहिल्या टप्प्यात निवड झालेल्या गावांंमध्ये ५ वर्षांत केवळ ६३% प्रकल्प पूर्ण झाले. महाराष्ट्र तर योजनेत सपशेल नापास असून अवघे ३८% प्रकल्प पूर्ण होऊ शकले. केंद्राच्या उत्कृष्ट गावांच्या यादीत टॉप ५ मध्ये राज्यातले एकही नाही. सुमार कामगिरी करणाऱ्या १८ ग्रामपंचायतींपैकी ४ महाराष्ट्रातील आहेत, हेे विशेष.

पंतप्रधान मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१४ रोजी केलेल्या भाषणात “सांसद आदर्श ग्राम योजने’ची घोषणा केली होती. यात प्रत्येक खासदाराने २०१६ पर्यंत एक आणि २०१९ पर्यंत २ अशी ३ गावे दत्तक घेऊन ती आदर्श म्हणून विकसित करायची होती. ११ ऑक्टोबर २०१४ ला योजनेची सुरुवात झाली. यासाठी देशातील २२०७ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली. १६८३ पंचायतींनी ग्रामविकास योजना तयार करून ८१,७३९ योजनांचे प्रस्ताव सादर केले. यापैकी ५१,५२४ (६३.०३ %) कामे पूर्ण झाली तर ६५३४ सुरू झालेली आहेत.

राज्यातील ४ गावांची सुमार कामगिरी
परिणामकारकरीत्या याेजना राबवलेल्या १०७ गावांची यादी केंद्राच्या संकेतस्थळावर आहे. यात राज्यातल्या ८ गावांचा समावेश आहे. पैकी ४ गावे देशात सर्वात सुमार कामगिरी करणाऱ्या १८ गावांपैकी एक आहेत. यात नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील किरतांगली, बुलडाण्याच्या जळगाव जामोद येथील धानोरा, चंद्रपूरचे भद्रावतीचे वायगाव तुकूम व वाशीमच्या मालेगावमधील मैरळडोह ग्रामपंचायतीला अवघे १५ % मार्क व १०७ पैकी ८९ वा क्रमांक आहे. उर्वरित ४ गावांत नाशिकचे शिलापूर-६३.२९%, दिंडोरीतील अवनखेड-५७.६४%, नंदुरबारच्या शहादेतील कोंढावल - ४६.२५%, औरंगाबादचे हातमाळी-३०% यांचा समावेश आहे.

महाराष्ट्राची पीछेहाट
आदर्श ग्राम तयार करताना पेयजल, शौचालय, वीजपुरवठा, रस्ते, टेलिफोन कनेक्शन आणि अन्य सुविधा अशा ६ श्रेणींतील कामांवर भर देण्यात आला होता. राज्यात या ६ श्रेणींत १०९१ प्रकारची कामे प्रस्तावित होती. पैकी अवघी ३५८ (३२.८ %) पूर्ण झाली. ११६ प्रकल्पांचे काम सुरू आहे. ६१७ म्हणजेच ५६.५३ % प्रकल्पांना सुरुवातही झालेली नाही. अन्य सुविधांत अंगणवाडी, वृक्षारोपण, आरोग्य सुविधा, ज्येष्ठ नागरिक, सैनिक, शहिदांच्या कुटुंबीयांचा सन्मान आदींचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...