आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राचा तलवारबाजी संघ गुजरातला रवाना:संघात14 सदस्यांचा समावेश; रग्बी, कबड्डीप्रमाणेच विजयाची आशा

औरंगाबाद8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय ऑलिम्पिक संघटना व गुजरात ऑलिम्पिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आणि गुजरात राज्य शासनाच्या सहकार्याने देशाची प्रतिष्ठित 36 व्या नॅशनल गेम्सचे गुजरातमध्ये आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा अहमदाबाद, सुरत, गांधीनगर, वडोदरा, राजकोट, भावनगर आणि दिल्ली अशा सात ठिकाणी खेळवली जाणार आहे. या गेम्समधील तलवारबाजी खेळाची स्पर्धा 29 सप्टेंबर ते 12 ऑक्टोवर या कालावधीत अहमदाबाद येथे पार पडेल.

या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य तलवारबाजीचा संघ रवाना झाला. संघात तीन क्रीडा प्रकारात मिळून 14 खेळाडूंचा समावेश आहे. संघात औरंगाबादच्या अभय शिंदे व वैदेही लोहिया यांचा समावेश आहे.

महाराष्ट्राच्या संघाचे सराव शिबिर औरंगाबाद येथील सुतगिरणी चौकातील विभागीय क्रीडा संकुलात येथे पार पडले. संघासोबत प्रशिक्षक म्हणून स्वप्नील तांगडे, प्रा. संजय भूमकर (औरंगाबाद) व मोहम्मद शोएब(नागपूर) आणि संघ व्यवस्थापक म्हणून राजकुमार सोमवंशी (उस्मानाबाद), नयना नायर (ठाणे) हे जात आहेत. बुधवारी दुपारी महाराष्ट्राच्या संघातील खेळाडूंचा जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे, महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते डॉ. दिनेश वंजारे यांनी सत्कार केला.

संघाला पुढील स्पर्धेसाठी राज्य संघटनेचे अध्यक्ष माजी मंत्री सतेज पाटील, साईचे उपसंचालक नितीन जयस्वाल, क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, गोकुळ तांदळे, क्रीडा अधिकारी लता लोंढे, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष एस. पी. जवळकर, उपाध्यक्ष मंजूताई खंडेलवाल आदींनी शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्राचा संघ पुढीलप्रमाणे :

सायबर प्रकार - अभय शिंदे (औरंगाबाद), धनंजय जाधव (कोल्हापुर), श्रीशैल शिंदे (कोल्हापुर), ऋत्विक शिंदे (नाशिक). इप्पी प्रकार - अजिंक्य दूधारे (नाशिक), निखिल कोहाड (भंडारा), गिरीश जकार्ते (सांगली), प्रथम शिंदे (कोल्हापुर). फॉईल प्रकार - वैदेही लोहिया (औरंगाबाद), वैभवी इंगळे (मुंबई शहर), खुशी दुखंडे (मुंबई), ज्योती सुतार (सांगली). इप्पी वैयक्तिक - ज्ञानेश्वरी शिंदे (लातूर). फॉइल वैयक्तीक - अनिल महिपती (कोल्हापूर).

महाराष्ट्राचा झेंडा फडकावणार :

नॅशनल गेम्समध्ये 100 टक्के योगदान देणे हेच लक्ष्य असून निश्चितच महाराष्ट्राचा झेंडा फडकावणारा मानस आहे. आमचा संघ तगडा असून आम्ही पदकाचे दावेदार म्हणून मैदानात उतरु. शिबिरात सरावदेखील चांगला झाला आहे. तलवारबाजीत महाराष्ट्राचा संघ तालिके अव्वल राहिल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आंतरराष्ट्रीय खेळाडू अभय शिंदे व वैदेही लोहिया यांनी म्हटले.