आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेलो इंडिया युथ गेम्स:महाराष्ट्राचा युवा मल्ल वैभव पाटीलने जिंकले कुस्तीत सुवर्ण; महाराष्ट्राचा खो-खो संघ जाहीर

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचकुला (हरियाणा) येथे सुरु असलेल्या चौथ्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राने आपला दबदबा कायम ठेवला आहे. बुधवारी दुपारच्या सत्रात युवा मल्ल वैभव पाटीलने उत्कृष्ट कामगिरी करत महाराष्ट्राच्या खात्यात 25 वे सुवर्णपदक जमा केले. 55 किलो वजन गटाच्या फायनलमध्ये महाराष्ट्राच्या वैभवने हरियाणाचा मल्ल सुरेंदरला एकतर्फी लढतीत 8-0 ने पराभूत करत कामगिरी साधली. अत्यंत चपळ असलेल्या वैभवने हरियाणाच्या खेळाडूला गुण घेण्याची एकही संधी दिली नाही.

त्याचबरोबर, मुलींच्या कुस्ती स्पर्धेत 53 किलो वजन गटात कल्याणी गादेकर आणि 65 किलो वजन गटात पल्लवी पोटफोडेने उपांत्य फेरीत प्रवेश केला. या दोन महिला मल्लांनी महाराष्ट्रासाठी आणखी दोन पदके निश्चित केली आहेत.

खो-खो : विजेतेपदाचे दावेदार पण दबाव घेणार नाही : जान्हवी पेठे

खेलो इंडियामध्ये 9 जूनपासून खो-खो स्पर्धेला सुरुवात होत आहे. स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ जाहीर केले असून मुलांच्या संघाच्या कर्णधारपदी सोलापूरचा रामजी कश्यप आणि मुलींच्या संघाच्या कर्णधारपदी उस्मानाबादच्या जान्हवी पेठेची नियुक्ती करण्यात आली आहे. जान्हवीने म्हटले की,‘आमचा सराव चांगला झाला आहे. संघात खेळाडूंचा ताळमेळ देखील जुळून आला आहे. आम्ही एक संघ म्हणून खेळू. आमच्याकडे पदकाचे दावेदार म्हणून पाहिल्या जाते, मात्र आम्ही त्या गोष्टीचा दबाव घेणार नाही. महराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून देवून, हरियाणात ‘जय महाराष्ट्र’ चे नाव गाजवू.’

खो-खो संघ पुढील प्रमाणे

मुले - रोहन कोरे (कोल्हापूर), ऋषीकेश शिंदे (कोल्हापूर), अर्नव पाटणकर (कोल्हापूर), शुभम थोरात (पुणे), आदित्य कुदळे (अहमदनगर), रामजी कश्यप (कर्णधार, सोलापूर), चंदु चावरे (नाशिक), आकाश तोंगरे (ठाणे), किरण वसावे (उस्मानाबाद), नरेंद्र कातकडे (अहमदनगर), सुफियान शेख (ठाणे), कोमल महाजन (नागपूर). राखीव : ऋषिकेश खोमणे (पुणे), मतिन सय्यद (सांगली), रितेश काडगी (पुणे).

मुली - श्वेता वाघ (पुणे), दिपाली राठोड (पुणे), जान्हवी पेठे (कर्णधार, उस्मानाबाद), संपदा मोरे (उस्मानाबाद), अंकिता लोहार (सांगली), कौशल्या पवार (नाशिक), गौरी शिंदे (उस्मानाबाद), अश्विनी शिंदे (उस्मानाबाद), श्रेया पाटील (कोल्हापूर), प्रिती काळे (सोलापूर), वृषाली भोये (नाशिक), मयुरी पवार (औरंगाबाद), राखीव : रागिनी लोखंडे (अमरावती), साक्षी पाटील (सांगली), दिक्षा सोनसुळकर (ठाणे)

बातम्या आणखी आहेत...