आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या काही दिवसांपासून 'मविआ' नेत्यांमध्ये सुरू झालेली कुरबुर, एकमेकांवरच्या टीका, आरोप-प्रत्यारोप पाहता, ही आघाडी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपर्यंत टिकेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे 'मविआ'तले नेते भाजपविरोधात लढण्यासाठी वज्रमूठ आवळण्याचा निर्धार करत आहेत. मात्र, दुसरीकडे ते एकमेकांवर चिखलफेक करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे पुढे काय, असा सवाल विचारला जात आहे.
वैचारिक पातळीवरची एकी कायम ठेवणे, किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी आणि परस्परांबद्दल बोलताना तोंडात साखर ठेवली की, ही आघाडी टिकेल. मात्र, खरेच असेल होईल का, जाणून घेऊन तज्ज्ञांच्या दृष्टिकोनातून...
'मविआ'त धुसफूस
गेले काही दिवस महाविकास आघाडीमधील नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. संजय राऊत यांनी शरद पवारांवर केलेली टीका असो की, त्याला पवारांनी दिलेले उत्तर असो की, शरद पवारांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केलेली टीका, तर छगन भुजबळ यांनी संजय राऊत यांना सुनावल्याचे प्रकरण असो. यात कुठे तरी आघाडीमध्ये वाद होताना दिसून येत आहे. यामुळे येत्या काळात महाविकास आघाडीचे नेमके काय होणार आणि ह्यांच्यातील बेबनाव 'मविआ'तील तिन्ही पक्षांना वेगळे करणार का, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
पृथ्वीराज चव्हाणांवर टीका
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र डागत असतात. यावर पत्रकार परिषदेत शरद पवारांनी त्यांना चांगलेत प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाणांचे त्यांच्या पक्षात काय स्थान आहे. ते A आहेत की B पहिल्यांदा चेक करावे. यात त्यांच्या पक्षातील सहकाऱ्यांना जर विचारले, तर त्यांची कॅटेगिरी काय तर ते जाहीरपणे नाही, पण खासगीत त्यांची कॅटेगिरी काय हे सांगू शकतील, असा खोचक टोला शरद पवारांनी पृथ्वीराज चव्हाण यांना लगावला आहे.
राऊतांना फटकारले
संजय राऊत यांच्या लिखाणाकडे दुर्लक्ष करतो. आम्ही काय केले, त्यांना माहिती नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी त्यांना फटकारले. पवार यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. शरद पवार म्हणाले की, आम्ही काय केले हे संजय राऊत यांना माहिती नाही, हा आमच्या घरातील प्रश्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक नेत्यांना संधी देऊन मंत्री केले आहे. आम्ही कुणाला संधी दिली आणि काय केले हे जाहीर करत नाही, तसेच कोणी आमच्यावर टीका केली तरी आम्ही दुर्लक्ष करतो, अशा शब्दांमध्ये शरद पवार यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता त्यांना फटकारले.
मतभेद बाजूला ठेवावे
'मविआ'तील या बेबनावामुळे खरेच ही आघाडी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या आधीच फुटणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. याबाबत ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे म्हणाले की, 'मविआ' संदर्भात मतभेद असल्याच्या बातम्या येत आहेत. राज्यात शिंदे गट आणि भाजपला लोकसभा-विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी जे वातावरण निर्मित होत आहे. त्यासाठी हे सर्व मतभेद बाजूला ठेवले पाहिजे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शीर्षस्थ नेते शरद पवार असो की, काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हान. यांनी पूर्वीचे मतभेद बाजूला सारायला हवेत. आपल्याला राष्ट्रीय पातळीवर एक आघाडी करायची आहे. जी राष्ट्रीय राजकारणाशी जोडली जाईल, हे ध्यानात घ्यावे लागेल.
इगो बाजूला सारावा
ज्येष्ठ पत्रकार खोरे पुढे बोलताना म्हणाले की, 'मविआ' टिकण्यासाठी नेत्यांनी आपले व्यक्तिगत मतभेद असो की, इगोचे विषय बाजूला ठेवले पाहिजेत. संजय राऊत यांच्या सारख्या संपादकाने लिहिताना मर्यादेचे पालन करायला हवे. लोक शांतपणे विचार करत आहेत. लोकांना 'मविआ'चा पर्याय चांगला वाटतोय. शरद पवारांनी राजीनामा दिल्यावर देशभरातून ज्या प्रतिक्रिया आल्या, त्यातून असे वाटते आहे की महाविकास आघाडीचा प्रयोग हवासा वाटतो आहे. आणि यात शरद पवार असावे, असे लोकांचे मत तयार झाले आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून तिन्ही पक्षातील नेत्यांनी आपण वैचारिक पातळीवर विभागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
गुणा-गोविंदाने चालेल का?
राजकीय विश्लेषक विजय चोरमारे म्हणाले की, आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तिन्ही पक्ष वेगळे आहेत. त्यांची राष्ट्रीय, राज्यस्तरीय आणि स्थानिक प्रश्नावर वेगळी भूमिका आहे. हे किमान समान कार्यक्रमावर भाजपला रोखण्यासाठी एकत्र आले आहेत. म्हणजे सर्वच गुणा-गोविंदाने चालेल असे नाही. जर एकाच पक्षात राहून विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांच्यात वाद असल्याचे दिसून येते. राष्ट्रवादीच्या दोन गटात वाद असू शकतो, शिवसेनच्या दोन नेत्यांमध्ये वाद असू शकतो, तर तिन्ही पक्षाच्या भूमिका असू शकतात.
आघाडी विस्कटणार नाही
विजय चोरमारे पुढे म्हणाले की, कर्नाटकात राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसविरोधात लढला. त्याविरोधात काही विधाने झाली होती. तर शरद पवारांनी त्यांच्या आत्म चरित्रामध्ये उद्धव ठाकरेंच्याविरोधात टिपण्णी केली होती. त्याला संजय राऊतांनी उत्तर दिले होते. एका पक्षात मतभेद होत असतात. ते एका आघाडीतही असू शकतात. याचा अर्थ असा नाही की, महाविकास आघाडी विस्कटत आहे. या सर्वांचे भाजपला रोखणे हेच ध्येय आहे. त्यामुळे ते एकत्र पुढे जातील. या गोष्टींचा 'मविआ'वर जास्त काही विपरित परिणाम होणार नाही. एखादी मोठी घटना घडली तर काही होई शकेल, मात्र, या घटनाचा काही प्रभाव पडणार नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.