आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Mahavikas Aghadi Government Takes Initiative To Put Pressure On Central Government By Uniting All Opposition State Governments To Reduce Central Jizya Tax On Petrol, Diesel And Gas | Marathi News

वृत्तपत्र निवेदन:पेट्रोल, डिझेल आणि गॅसवरील केंद्राचा जिझिया कर कमी करावा; यासाठी सर्व विरोधी पक्षाच्या राज्य सरकारांना एकत्र करत केंद्र सरकारवर दबाव; डॉ. उदय नारकर

औंरगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप आणि राज ठाकरे या अभद्र युतीचे मनसुबे उधळून लावा २०१९ मध्ये राज्याच्या गादीवर परत येता न आल्याने निराश झालेल्या भाजपने महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचे सतत प्रयत्न केले आहेत. हा त्या पक्षाच्या विरोधी सरकारे पाडण्याच्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा भाग आहे. स्वतंत्रपणे आपले मनसुबे सफल होत नाहीत, हे पाहून त्या पक्षाने मनसेचे राज ठाकरे यांना हाताशी धरून महाराष्ट्रातील सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा डाव टाकला. देशभरात हिजाब, हलालसारख्या हिंदू धर्मीयांचा कसलाही संबंध नसणाऱ्या प्रश्नांवरून रास्व संघ आणि भाजपने वातावरण विषारी केले.

मागोमाग रामनवमी, हनुमान जयंतीचे निमित्त साधून विनाकारण मुस्लिमांना चिथावण्याचे कार्यक्रम हाती घेतले. सामाजिक स्वास्थ्यावर मध्य प्रदेश, दिल्लीमध्ये बुलडोझर चालवत मुस्लिमांना धमकावण्याचे प्रयत्न केले. हे प्रयत्न थांबण्याची शक्यता नाही. महाराष्ट्रातील सामाजिक सौहार्दाचे वातावरण बिघडत नाही, याचा विषाद वाटून भाजप-मनसे यांनी मशिदीवरील लाऊडस्पीकरचा वाद चिघळवण्याचा प्रयत्न केला.

राज्याच्या राजकारणात आपल्याला काहीच स्थान मिळत नाही, याने वैफल्यग्रस्त झालेल्या राज ठाकरे यांनी हातात कोलीत घेत राज्यातील शांततेला सुरूंग लावण्याचा प्रयत्न केला. मशिदींसमोर हनुमान चालिसा जाहीरपणे वाचण्याचा वावदूकपणा करण्याची धमकी दिली. हे करताना आपण मराठी माणसाचे जीवन अस्थिर करत आहोत, याचेही त्यांना भान राहिले नाही. राज्यातील मुस्लिम समाजाने या चिथावणीला भीक घातली नाही की हिंदू समाजाने राज ठाकरे यांचे चोचले पुरवले नाहीत. मुस्लिमांनी सर्वोच्च न्यायालयाच्या बंधनांच्या चौकटीत प्रार्थनास्थळांवरील लाऊडस्पीकर्सचा वापर केला. त्यांनी हा सूज्ञपणा दाखवल्याने महाराष्ट्र सरकारचेही राज्यात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे काम सुकर झाले.

राज्यातील हिंदू जनतेनेही राज ठाकरे यांच्या चिथावणीला बळी न पडता संयुक्त महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेच्या वारश्याला तडा जाऊ दिला नाही. याबद्दल राज्यातील सर्वधर्मीय जनतेचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अभिनंदन करते. राज ठाकरे यांनी औरंगाबाद शहरात जाहीर सभा घेऊन येथील समाजजीवन उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु या शहरातील हिंदू-मुस्लिम जनतेने आपल्या एकोप्याला तडा जाऊ दिला नाही, याबद्दल आमचा पक्ष या दोन्ही धर्मियांचे मनापासून अभिनंदन करत त्यांचे आभार मानत आहे. अर्थात, एवढ्याने भाजप आणि राज ठाकरे यांना शहाणपण येण्याची शक्यता नाही. राज्य अस्थिर करण्यासाठी हिंदू – मुस्लिमांत तेढ निर्माण करण्याचे त्यांचे प्रयत्न जारीच राहतील. दुसरीकडे केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून राज्य सरकार अस्थिर करण्याचे भाजपचे प्रयत्न सुरूच राहणार आहेत. भाजपसाठी राज ठाकरे यांची उपद्रव शक्ती कामाला येणार आहेच.

राज्यातील जनतेने भाजप आणि राज ठाकरे यांच्या अभद्र युतीचे मनसुबे उधळून लावण्यासाठी सजग रहायला हवे. महाविकास आघाडी सरकारनेही जनतेला गृहित धरून आपल्या अडचणीत वाढ करून घेऊ नये. राज्यातील शेतकरी, कामगार, शेतमजूर आणि विशेषतः महिला यांचे प्रश्न तीव्र बनले आहेत. शेतकऱ्यांच्या विरोधामुळे राज्यातही शेतकरी विरोधी कायदे मागच्या दाराने आणण्याचा प्रयत्न या सरकारला सोडून द्यावा लागला. एसटी कामगारांचा प्रश्न संवेदनशीलतेने हाताळला नाही. मोदी सरकारने लादलेल्या कामगार कायदे मोडीत काढणाऱ्या श्रमसंहिता राज्यात लागू करण्यास हे सरकार उत्सुक आहे. अशा धोरणाने विनाकारणच भाजप-राज ठाकरे सारख्या विघातक शक्तींच्या हातात कोलीत दिल्यासारखे होईल. महाविकास आघाडीने जनतेच्या आरोग्य, शिक्षण, रोजगार यासारख्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून आपल्या पायावर धोंडा पाडून घेऊ नये. जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारचा रोष पत्करण्याचीही तयारी दाखवली पाहिजे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसवरील केंद्राचा जिझिया कर कमी करावा यासाठी सर्व विरोधी पक्षाच्या राज्य सरकारांना एकत्र करत केंद्र सरकारवर दबाव टाकण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी आम्ही करत आहोत: डॉ. उदय नारकर १४ मे २०२२ महाराष्ट्र राज्य सचिव भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) या वेळी माकपचे जेष्ठ नेते कॉ. पंडित मुंडे , जिल्हा सचिव भगवान भोजने, शहर सचिव श्रिकांत फोपसे, सचिवमंडळ सदस्य,डॉ. भाऊसाहेब झिरपे, जिल्हा कमिटी सदस्य कॉ. सचिन गंडले, कॉ. नितीन वाव्हळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यांच्या सोबत विद्यार्थी आघाडी चे लोकेश कांबळे, यूवक आघाडी चे सोपान भूंबे, रूपेष चव्हाण, कामगार आघाडी चे अजय भवलकर गोरखनाथ राठोड हे ही हजर होते.

बातम्या आणखी आहेत...