आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जी-20 ची तयारी:अर्जेंटिनाच्या राजदूतालाही हिंगोलीची हळद पाहता येईल अशी व्यवस्था करा, आयुक्त केंद्रेकरांची सूचना

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील २० प्रमुख देशांच्या जी-२० संघटनेची बैठक २०२३ मध्ये भारतात होत आहे. त्यात काही कार्यक्रम, बैठका औरंगाबादमध्ये होणार आहेत. यानिमित्ताने फेब्रुवारी, मे महिन्यात चीन, मेक्सिको, अर्जेंटिना, जर्मनी, सौदी अरेबिया आदी २० देशांचे राजदूत, सचिव दर्जाचे किमान ५०० परदेशी पाहुणे येणार आहेत. त्याच्या पूर्वतयारीसाठी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी सोमवारी (५ सप्टेंबर) पहिली आढावा बैठक घेतली. त्यात ते म्हणाले की, या पाहुण्यांसमोर आपल्याला मराठवाड्याचे मार्केटिंग करण्याची सर्वोत्तम संधी आहे. ‘पाहुण्यांना वेरूळ - अजिंठा दाखवून रवाना करायचे अशी आपली पद्धत आहे. ती आता बदला. अर्जेंटिनाच्या राजदूताला हिंगोलीची हळद पाहता येईल अशी व्यवस्था करा,’ अशी स्पष्ट सूचना त्यांनी केली.

आढावा बैठकीला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी, पोलिस आयुक्त डाॅ. निखिल गुप्ता, महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक डाॅ. मंगेश गोंदावले, सा.बां.चे मुख्य अभियंता दिलीप उकिर्डे यांच्यासह विविध विभागांचे ६० वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यात औरंगाबादेतील विकासकामे मनपा प्रशासकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करावी. तत्पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे येथे पाच-सहा वर्षांपूर्वी खेलो इंडिया कार्यक्रमाचे कसे नियोजन झाले याचा अभ्यास करावा, असेही केंद्रेकरांनी सांगितले. दरम्यान, महाराष्ट्रात मुंबई आणि औरंगाबाद येथे जी-२० कार्यक्रमाची निश्चिती झाल्यावर नाशिक विभागानेही यात सहभागी होण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू केला आहे.

फेब्रुवारी, मेमध्ये २० देशांचे ५०० सचिव, राजदूत औरंगाबादेत येणार
जी-२० चा औरंगाबाद दौरा यशस्वी करण्यासाठी केंद्रेकरांनी सात कलमी अजेंडा सांगितला तो असा

१ विकासकामांच्या निधीसाठी केंद्र सरकारकडे परिपूर्ण प्रस्ताव पाठवा.

२ ऑरिक सिटीसह परभणी, नांदेड, लातूर, जालना येथील कृषी प्रक्रिया उद्योग पाहुण्यांना बघता येतील अशी यंत्रणा तयार करा.

३ प्रत्येक पाहुण्याला मराठवाड्याची बलस्थाने त्याच्या भाषेत सांगणारी पुस्तिका पोहोचवा.

४ औरंगाबाद शहरात पाहुणे नेमके कुठे फिरू शकतील हे आताच ठरवा.

५ निवास व्यवस्था उत्तम दर्जाची ठेवा.

६ अजिंठा रस्ता ऑक्टोबरपूर्वी तयार करा.

७ मराठवाड्याची उत्तम प्रतिमा मनात घेऊन पाहुणे जातील यासाठी आवश्यक ते सर्व करा.

बातम्या आणखी आहेत...