आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कवितेतली ‘ती’:मालन, तू बोलत का नाहीस?

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चौकात देहविक्रयासाठी उभ्या वेश्येला ‘माल’ म्हणणे, प्रेयसीला ‘तू चीज बडी है मस्त’ किंवा ‘देखने की चीज है हमारी दिलरूबा’ म्हणणे किंवा नवविवाहितेला ‘चंद्रा’ची उपमा देणे यात तसा काही फरक नाही. स्त्रियांच्या वस्तूकरणाची ही केवळ विविध रूपं आहेत.

साहित्यातील बहुतांश स्त्री प्रतिमा सामाजिक धारणांमधून चित्रित केलेल्या आहेत. या चौकटीबाहेरची प्रतिमा म्हणजे कुटुंबाच्या परिघाबाहेरील वेश्या, वारांगना, गणिका यांचं चित्रण ढसाळ, सुर्वे आणि इतर काहींच्या कवितांमधला अपवाद सोडला तर अतिशय नकारात्मक पद्धतीने पुढे आलं. बहुतांश कवितांमधील वेश्या ही बाजारबसवी, संसार उद्ध्वस्त करणारी, सामाजिक प्रतिष्ठेला कलंक अशीच साकारली गेली.

‘मा स्तर लिवा.. तुमचंच नाव लिवा.. मास्तर, जिमीन उतमातती.. व्हय उफानती, पन् नांगुर घातल्या बिना आन् बी पेरल्या बिना.. रोप वर उगतं का? जात नगा इच्यारू.. आवं, आमी कुना एकाची का बायली हावंत मास्तर? घरोट्यातल्या बाया नव्हंत आमी.. तेवढं कुठलं नशिबाला...’

नारायण सुर्व्यांच्या देवदासीच्या आयुष्याची व्यथा सांगणाऱ्या या ओळी परिघाबाहेरच्या वेश्या, देवदासी या स्त्रियांच्या जगण्याची लक्तरे मांडतात, तर ‘आम्ही कपुरी अंगाने.. आल्यागेल्याच्या तळव्याखाली जाऊन होरपळतो..’ अशा अभिव्यक्तीतून स्त्रियांपासून शोषितांपर्यंत देहमनाचे बहुस्तरीय होरपळणे अंगावर येते. नामदेव ढसाळांच्या ‘चिंध्यांची देवी’मधील कवितांमधून संवेदनाच गोठून जाव्यात असे वेश्यांच्या जगाचे चित्र समोर येते : ‘थोड्याशा रांडा थोडेसे भडवे.. दातवण जे वापरल्यानंतर थुंकून टाकायचे आणि गंगेत दात खंगाळायचे!’ गंगेत दात खंगाळण्याची सोय पुरुषी व्यवस्थेने स्वतःसाठी करून ठेवलीय. पुरुषांनी निर्माण केलेल्या व्यवहारी, कावेबाज आणि चालबाज व्यवस्थेचे रूप या कवितेने अधोरेखित केले आहे. देहविक्रय करून जगणाऱ्या वेश्यांचे जग हा ‘चिंध्यांची देवी’ या कवितेतील प्रबळ विभाग आहे. ढसाळांची कविता वेश्याजीवनाच्या आधारेच समाजजीवनाचेही अध:पतन रेखाटते. वस्तूकरणाचे तत्त्व केवळ बाजारातील क्रयवस्तूला लागू होत नाही, तर स्त्रियांचे वस्तूकरण भांडवली बाजारातील क्रयवस्तूपेक्षाही जुने आहे. बाजारातील चौकात देहविक्रयासाठी उभ्या असलेल्या वेश्येला ‘माल’ म्हणणे, प्रेयसीला ‘चीज’ म्हणणे (देखने की चीज है हमारी दिलरुबा / तू चीज बडी है मस्त मस्त) किंवा घरातील नवविवाहित सुनेला ‘चंद्र’,‘मोती’,‘चाँदनी’ म्हणणे यात तसा काही फरक नाही. स्त्रियांच्या वस्तूकरणाची ही केवळ विविध रूपं आहेत तरीदेखील चौकटीमधल्या आणि चौकटीबाहेरच्या स्त्रियांच्या जगण्यात प्रचंड तफावत असते. साधारणतः, स्त्री प्रतिमा ही कुटुंबातील नात्यांभोवती फिरते. त्याबाहेरच्या शिक्षिका, डॉक्टर, परिचारिका अशा प्रतिमासुद्धा चौकटीत बंदिस्त असतात. साहित्यातील स्त्री प्रतिमासुद्धा अशाच सामाजिक धारणांमधून चित्रित केलेल्या आहेत. या चौकटीबाहेरची प्रतिमा म्हणजे कुटुंबाच्या परिघाबाहेरील वेश्या, वारांगना, गणिका यांचं चित्रण ढसाळ, सुर्वे यांच्या आणि इतर काहींच्या कवितांमधला अपवाद सोडला तर अतिशय नकारात्मक पद्धतीने पुढे आलं. बहुतांशी कवितांमध्ये साकारली गेलेली वेश्या ही बाजारबसवी, संसार उद्ध्वस्त करणारी, किळसवाणी, वाईट, कुटुंब व सामाजिक प्रतिष्ठेला कलंक अशीच साकारली गेली.

साधारणतः कवितेतील स्त्री चित्रण नातेसंबंध, त्याग, सोशीकता, नैतिकतेविषयीचं वर्णन असं असतं. क्वचित ते प्रत्यक्ष स्त्री साहित्यिक, कवींकडून लिहिल्या गेलेलं असलं तर फार तर शोषणविषयक, तक्रारवजा, संतापी, विद्रोही असं असतं. परंतु वेश्यांच्या समस्या, त्यांचे विचार याविषयी मात्र कवितेत फारसं लिहिलं गेलेलं नाही. स्त्री कवींनीसुद्धा (एखादा अपवाद वगळता आणि हिंदी / इंग्रजी कविता वगळता) याविषयीच्या पारंपरिक धारणाच आपल्या लेखनातून मांडल्या. याचं कारण त्यांच्याविषयीची समाजातली नकारात्मक प्रतिमा. म्हणजे ‘गृहिणी’ विरुद्ध ‘वेश्या’ असा विरोधाभास कवितेतून आलेला आहे. ‘सतीघरी बत्ती आणि शिंदळीघरी हत्ती’, ‘चोरी अन् शिंदळकी सोडून बाईनं कशाची लाज बाळगू नये’ अशा म्हणींमधून वेश्यांविरुद्ध पातिव्रत्याविषयीची विशिष्ट धारणा बनवली गेली. बरं, ही गणिका, वेश्या, कुलटा कोण असते? तर पुरुषसत्ताक समाजानेच आपल्या सोयीसाठी निर्माण केलेली एक व्यवस्था असते. समाजातल्या कनिष्ठ वर्गातल्या अगतिक स्त्रियांना शरीरविक्रय करून पोट भरण्यास भाग पाडलेले असते. मात्र, या व्यवसायाला कसलीही प्रतिष्ठा राहणार नाही याचीही काळजी घेतली जाते.

विवाह आणि कुटुंब संस्थेत असलेल्या स्त्रियांप्रमाणे सामाजिक प्रतिष्ठा नसलेली वेश्या, एक किंवा जास्त पुरुषांकडून उपभोगली गेलेली ती वेश्या. तिला इतर स्त्रियांप्रमाणे संसार, लग्न करण्याचा अधिकार नाकारला गेला. त्याच वेळी वेश्येकडे जाणारा पुरुष मात्र प्रतिष्ठितच राहिला. हिंदी-मराठी चित्रपटांमधला वेश्येवर प्रेम करणारा नायक एकतर आर्थिक-सामाजिकदृष्ट्या बरबाद झालेला, व्यसनाधीन झालेला किंवा उपरती होऊन पुन्हा कुटुंबात परतलेला असा दिसला. दोघींचा स्वीकार करूनही चारित्र्यहीन, वेश्या, नाचणारी स्त्री तिचा मृत्यू दाखवून तिला कुटुंब लग्नसंस्थेतून हद्दपार करण्यात चित्रपट, नाटक, कथा, कविता, गीतं यशस्वी ठरले. कविताही याला अपवाद नाहीच. अलीकडेच कविता महाजन यांनी संपादित केलेला वेदिका कुमारस्वामी यांचा ‘गावनवरी’ हा कवितासंग्रह मात्र या काव्यजाणिवेला अपवाद ठरावा असा आहे. देवदासी म्हणून देवाला वाहिलेल्या वेदिका या कवयित्रीचं एक प्रकारचं आत्मकथनच या कवितांमधून साकार होतं. सध्या समीर गायकवाड, शमिभा या नवीन पिढीतील कवींनी या स्त्रियांचा आक्रोश, घुसमट, हतबलता मांडण्याचा प्रयत्न केला आहे. समीर गायकवाड यांच्या ‘झुबेदा’ या कवितेतील ओळी तर रेड लाइट एरियातील वेदनेचा भयाण-भेसूर चेहरा उजेडात आणतात... ‘तिच्याकडे येताना खिशातल्या पाकिटातील देवांच्या तसबिरींनाही.. ते आपल्यासवे घेऊन येतात.. नागवे होतात.. मग त्यांच्यातले दैत्य उफाळत राहतात.. चिंधाडलेल्या काटकुळ्या अंगावर.. आपलं बरबटलेलं शरीर घुसळत राहतात...’ सुभाष थोरात यांची ‘मालन, तू बोलत का नाहीस?’ ही कविता तर पुरुषी व्यवस्थेच्या बेगडी, दुटप्पी, पुरुषार्थाच्या मुजोर कावेबाजपणावर घणाघाती प्रहार करते... मालन, तू बोलत का नाहीस? या देशाविषयी.. या स्वातंत्र्याविषयी.. या धर्माविषयी.. आपापल्या बायका फ्रीज करून.. तुझ्या कुशीत धुमाकूळ घालणाऱ्या समस्त रंडीबाजांविषयी.. मालन, तू बोलत का नाहीस? हुंदक्यांचा अनावर गहिवर टाळून.. या देशाच्या स्वातंत्र्यावर.. मावापान चघळीत.. तू थुंकत का नाहीस..? मालन, तू बोलत का नाहीस?

सारिका उबाळे संपर्क : sarikaubale077@gmail.com

बातम्या आणखी आहेत...