आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:कोविड सेंटरमधून मोबाईल पळवणारा चोरटा गजाआड, 3.81 लाखांचे मोबाईल जप्त

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हिंगोली शहर पोलिसांची कामगिरी

हिंगोली शहरातील कोविड सेंटरमधून मोबाईल पळविणाऱ्या एका चोरट्यास हिंगोली शहर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले असून त्याच्या कडून ३.८१ लाख रुपये किंमतीचे २० मोबाईल जप्त केले असून या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. ११) गुन्हा दाखल झाला आहे.

हिंगोली शहरातील कोविड केअर सेंटरमधून एका कोविड रुग्णाचा मोबाईल चोरीला गेला होता. त्यानंतर एका खाजगी रुग्णालयातूनही मोबाईल चोरीला गेला. या दोन्ही घटनांमुळे कोविड सेंटर व रुग्णालयातील मोबाईल चोरचे सक्रीय झाल्याचे स्पष्ट होऊ लागले होते. या प्रकरणात तातडीने तपास करून चोरट्याला अटक करण्याच्या सुचना पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी शहर पोलिसांना दिल्या होत्या.

त्यावरून पोलिस अधिक्षक कलासागर, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे, उपनिरीक्षक नितीन केनेकर, जमादार शेख शकील, सुधीर ढेंबरे, गजानन होळकर, दिलीप बांगर यांचे पथक स्थापन करण्यात आले. या पथकाने काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये सुतारवाडा येथील अरविंद वाढवे याने मोबाईल चोरल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी त्यास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने ३.८१ लाख रुपये किंमतीचे २० मोबाईल काढून दिले. पोलिसांनी सदर मोबाईल जप्त केले असून त्याच्या विरुध्द गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. त्याच्या अधिक चौकशीत आणखी मोबाईल हाती लागण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

आयएमईआय नंबर पाहून मोबाईल घेऊन जावेत-राकेश कलासागर, पोलिस अधिक्षक

पोलिसांनी जप्त केलेल्या सर्व मोबाईलचे आयएमईआय नंबर प्रसिध्द करण्यात आले आहेत. ज्या व्यक्तींचे मोबाईल चोरीला गेले त्यांनी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात मोबाईल खरेदीची पावती दाखवून आयएमईआय नंबर वरून मोबाईल घेऊन जावेत.

बातम्या आणखी आहेत...