आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औंढा नागनाथ पोलिस ठाण्यांतर्गत पद्मावती शिवारात शेतकरी रवी रुख्माजी वाठ या शेतकऱ्याच्या खुनाला वाचा फुटली असून विहिरीतील पाण्याच्या कारणावरून सख्खा भाऊ अन् दोन पुतण्यांनी खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांनी खुनाची कबुली दिली आहे.
औंढा नागनाथ येथील रवी वाठ यांचा डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खून झाल्याची घटना शुक्रवारी (ता. २०) सकाळी उघडकीस आली होती. मात्र नेमका खून कोणत्या कारणामुळे झाला हे स्पष्ट होत नव्हते. मात्र, मृत रवी वाठ यांचा राजू वाठ याच्यासोबत विहिरीच्या पाण्यावरून वाद सुरू होता याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी संशयितांची चौकशी सुरू केली.
पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, अपर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, औंढ्याचे निरीक्षक वैजनाथ मुंडे, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या पथकाने अधिक तपास सुरू केला. त्यानंतर पोलिसांनी राजू वाठ याचा शोध घेतला असता तो विदर्भातील लोणार येथे असल्याचे स्पष्ट झाले. तर, पोलिसांना संशय येऊ नये म्हणून राजू वाठ याची दोन्ही मुले गणेश राजू वाठ, आदिनाथ राजू वाठ हे दोघेही घटनास्थळी मृत रवी वाठ यांचा मृतदेह काढण्यासाठी सोबतच होते. मात्र, त्यांच्या हालचालींवर पोलिसांचे लक्ष होते. पोलिसांनी मृत रवी वाठ यांचा मृतदेह विहिरीतून काढल्यानंतर गणेश वाठ व आदिनाथ वाठ या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. तर लोणार येथून हिंगोलीकडे येणाऱ्या बसमध्ये प्रवास करीत असलेल्या राजू वाठ यास हिंगोली शहराजवळच बस थांबवून ताब्यात घेतले. दरम्यान, या तिघांनाही अटक करून त्यांची चौकशी सुरू केल्यानंतर त्यांनी खुनाची कबुली दिली आहे. पोलिसांनी खुनासाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाड विहिरीच्या परिसरातून जप्त केली आहे. याप्रकरणी शिवकन्या रवी वाठ यांच्या तक्रारीवरून राजू रुख्माजी वाठ, गणेश राजू वाठ, आदिनाथ राजू वाठ यांच्याविरुद्ध औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
दोन दिवसांपूर्वी रचला गेला खुनाचा कट
मृत रवी वाठ यांचा खून करण्याचा कट दोन दिवसांपूर्वीच रचला होता. राजू वाठ याने लोणार येथे जायचे अन् दोन्ही मुलांनी कुऱ्हाडीने खून करण्याचे ठरले होते. त्यानुसार रवी वाठ हे १९ नोव्हेंबरला रात्री अकरा वाजता शेतात येताच त्यांचा खून केला अन् मृतदेह विहिरीत टाकून दिला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.