आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआधी ३०० कोटी रुपये भरा. मगच घरोघरी पाइपलाइनने गॅस पुरवठ्याची योजना राबवा, असे फर्मान औरंगाबाद महापालिकेने भारत पेट्रोलियम कंपनीला बजावले आहे. या कामासाठी मनपाने सहा महिन्यांपूर्वी २० कोटी रुपये घेतले. त्यावर समाधान झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर काही वसाहतींमध्ये घरांजवळ पाइप टाकण्यात आले. डिसेंबरमध्ये कनेक्शनची प्रक्रिया सुरू होईल, असेही सांगितले जात होते. पण ३०० कोटींच्या मागणीवरून योजना किमान सहा महिने रखडण्याची चिन्हे आहेत. भाजप-शिवसेनेच्या श्रेयवादावरून हजारो औरंगाबादकरांचे नुकसान होणार आहे.
१९९५ मध्ये राज्यात शिवसेना-भाजपची सत्ता असताना त्या वेळच्या मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी औरंगाबादेत थेट घरापर्यंत स्वयंपाकाचा गॅस पुरवण्याची योजना जाहीर केली होती. ती प्रत्यक्षात आलीच नाही. लोकांना त्याचा विसर पडला. पण केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या स्मरणात ती योजना होती. त्यांनी पुढाकार घेऊन किमान एक लाख घरांना पहिल्या टप्प्यात गॅस मिळेल, असे प्रयत्न सुरू केले.
केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यावर त्यांच्या प्रयत्नांना अधिक यश मिळाले. २५०० कोटी रुपये खर्चून श्रीगोंदा (अहमदनगर) येथून औरंगाबादेत गॅस आणण्यासाठी ११७ किलोमीटर मार्गावर २४ इंच व्यासाचे पाइप टाकण्याचे काम वेगात सुरू झाले. सुमारे ५० टक्के काम झाल्यावर शिवाजीनगर, बन्सीलालनगर, उल्कानगरी, ज्योतीनगर येथे रस्ते खोदण्याचे ठरले. पाइप टाकल्यावर रस्ते दुरुस्तीसाठी किती रुपये हवे, अशी विचारणा भारतीय पेट्रोलियम कंपनीने मनपाकडे केली आणि मागणीनुसार २० कोटी रुपये दिले. मग काही भागात रस्ते खोदून पाइप टाकण्यात आले. डॉ. कराड आणि भाजपच्या मंडळींनी योजनेचे भूमिपूजन केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीप पुरी यांच्या हस्ते करण्याचे ठरवले.
वाढीव रक्कम मागितल्याचे कळाले : डॉ. भागवत कराड या संदर्भात डॉ. भागवत कराड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, नेमका आकडा माहिती नाही. पण महापालिकेने वाढीव रक्कम मागितल्याचे मला कळाले आहे. मनपाच्याच म्हणण्यानुसार एकदा २० कोटी रुपये भरल्यावर पुन्हा नवी मागणी करणे चुकीचे आहे. यात काही महिने योजना रेंगाळून औरंगाबादकरांचेच नुकसान होणार आहे.
पुण्यात जे दर दिले तेच औरंगाबादसाठी मागितले शहर अभियंता सखाराम पानझडे म्हणाले, पुण्यात गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी प्रति चौरस मीटर १२ हजार रुपये असा दर दिला आहे. याची माहिती काही दिवसांपूर्वी मिळाल्यामुळे वाढीव रकमेसाठी पत्र दिले आहे. भारत पेट्रोलियम कंपनीने सर्व शहरांसाठी एक दर निश्चित केला पाहिजे.
देसाईंच्या सूचनेवरून दिले पत्र मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर २ मार्च रोजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, डॉ. कराड यांच्या प्रत्यक्ष आणि हरदीप पुरी यांच्या ऑनलाइन उपस्थितीत जोरदार भूमिपूजन सोहळा झाला. त्याला निमंत्रण असूनही शिवसेनेचे कोणी उपस्थित राहिले नाही. या सोहळ्यात डॉ. कराड यांनी ‘माजी खासदारांना (चंद्रकांत खैरे) २० वर्षांत ५५ किलोमीटरवरून औरंगाबादेत पाणी आणता आले नाही. मी ११७ किलोमीटरवरून गॅस आणला’ असे वक्तव्य केले. त्यामुळे शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी संतप्त झाले. त्यांनी पालकमंत्री सुभाष देसाईंकडे तक्रार केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देसाई यांच्या सूचनेवरूनच महापालिकेने ३०० कोटी रुपयांची मागणी करणारे नवे पत्र दिले आहे. एवढी रक्कम देणे शक्य असले तरी मानापमान, कायदेशीर कार्यवाहीचा मुद्दा करून डॉ. कराड त्याला विरोध करतील आणि योजना रखडेल, असा कयास करून हे पत्र दिल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.