आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानऊवारी साडी, नाकात नथ, दागदागिने... आणि श्रावण महिन्यात मंगळगौरीची थाट... हे दृश्य तसं अगदी सर्वसामान्य आपल्या पाहण्यातील आहे. पण आज आम्ही तुम्हाला जे दाखवत आहोत, ते थोडं खास आहे. कारण आम्ही तुम्हाला घेऊन जातोय ते महाराष्ट्रातून थेट अमेरिकेत... होय परदेशी राहून आपली भारतीय संस्कृती जपणारी ही आहे मराठमोळी अंकिता ओंमकार ऋषी. मुळची औंरगाबाची पण आता अमेरिकेतील चार्ल्सटन शहरात स्थायिक झालेल्या अंकिताने लग्नाच्या पाच वर्षांनी परदेशी राहून आपल्या मंगळगौरीच्या सणाचे उद्यापन केले आहे. औरंगाबाद माहेर आणि पुणे सासर असलेली अंकिता आता परदेशी राहूनही आपली भारतीय संस्कृती सण-सोहळे मुळीच विसरलेली नाही.
आता मंगळागौरीचा सण म्हटला आणि त्यात जर मंगळागौरीचे खेळ आले नाही तर मग हा सण पूर्णच होणार नाही. आता जग डिजिटल झाले आहे आणि या डिजिटल युगात अशक्य असे काहीच नाही. मग काय थेट झूमवरुन हा गौराई मंगळागौर ग्रुप अंकिताशी जोडला गेला. अंकिताची आई गौराई मंगळागौर ग्रुपशी संलग्न आहे. अंकिताच्या आईच्या डोक्यात कल्पना आली आणि त्यांनी आपल्या मुलीचे थोड्या हटक्या पद्धतीने मंगळागौरीचे उद्यापन करण्याचे ठरवले.
याबद्दल बोलताना अंकिताच्या आई सीमा कुलकर्णी सांगतात, "अंकिता लग्नाच्या पहिल्या वर्षी अमेरिकेत असल्याने मंगळागौर करणे शक्य झाले नव्हते, पण लग्नाच्या दुस-या वर्षी ती भारतात आली होती, तेव्हा आम्ही थाटात तिची मंगळागौर केली होती. आता पाचव्या वर्षी तिला भारतात येणे शक्य नव्हते पण तिला तिच्या कामातून तिकडे वेळ काढणे शक्य होते. मग आम्ही ऑनलाइन झूमवरुन तिची मंगळगौर करायचे ठरवले आणि तिनेही त्यासाठी होकार दिला आणि मग हे सगळं जुळून आले. मी आमच्या गौराई मंगळागौरला अंकिताच्या मंगळागौरमध्ये सहभागी होण्याविषयी विचारणा केली, त्यांनीही यासाठी होकार दिला आणि आम्ही डिजीटली तिच्याशी जोडले गेलो अंकिताने अमेरिकेतील तिच्या घरी पूजा केली आणि आम्ही औरंगाबादेत खेळ खेळलो आणि मुलीच्या मंगळागौरीचे उद्यापन केले," याचा खूप आनंद वाटतोय, असे सीमा कुलकर्णी सांगतात.
तर अंकितासुद्धा तिच्या या आगळ्या वेगळ्या उद्यापनाविषयी खूप आनंदी आहे. ती सांगते, "अमेरिकेत मला उद्यापनासाठी सगळे साहित्य उपलब्ध होऊ शकले नाही, पण जे साहित्य उपलब्ध झाले, त्यातून मी माझे उद्यापन पूर्ण केले. मला पूजासुद्धा गुरुजींनी ऑनलाइन सांगितली. टेक्नॉलॉजीचा खूप चांगला वापर आजच्या युगात आपल्या सगळ्यांना करता येऊ शकतो. औरंगाबादेत माझ्या आईसह सगळ्या सखींनी माझ्यासाठी मंगळागौरीचे खेळ खेळले त्याचा मला खूप आनंद झालाय. आम्ही अमेरिकेत राहून आपले गणपती, होळी, दिवाळी सगळे भारतीय सण साजरे करत असतो," असे अंकिता म्हणाली.
गणेश स्तवनाने मंगळागौरीच्या खेळाला सुरुवात झाली. मग फेरा घेत या सर्व महिलांनी फेर, ताकाचा डेरा, झुकु लूकू लूकू, सई बाईचा कोंबडा, आगोटा पागोटा, सामाजिक बोध नाटुकलं आई मी येऊ का, खडक झिम्मा, भोवर भिंडी, जावा जावाचं भांडण, दिंड्या, ढोम्य ऋषींचा झिम्मा, तिखट मीठ मसाला, गोफ, चढू बाई चढू, सोमू गोमू, झिम्मा, काच किरडा, लाट्या, होडी, पिंगा, सुपारी, अडवळ घूम, पाणी लाटा, तवा कमळ, गाठोडं, घो़डा असे एकापेक्षा एक मंगळागौरीचे खेळ सादर करत अंकिताच्या मंगळागौरीला चारचाँद लावले. इतकेच नाही तर या पारंपरिक खेळांना या सर्व महिलांनी थोडा मॉर्डन टच देत त्यात चित्रपटाचील गाण्यांचाही समावेश केलाय. या मंगळागौरीच्या खेळात सुनिता बडवे, सीमा कुलकर्णी, प्रगती कुलकर्णी, निलीमा भालेराव, मनिषा मैराळ, आश्लेषा मोताळे, स्वाती पांडव, मीना चौहान, रुपाली शेंडे, वैशाली दंडे, मधुरा मोकाशे, मोहिणी जोशी, पल्लवी पालोदकर या सर्व सखी सहभागी झाल्या होत्या.
मंगळागौरीचे हे व्रत कष्टाचे आणि दमायचे नसून चपलता देणारे, चैतन्य आणणारे आणि एकजुटीचा आनंद देणारे आहे असे म्हटले जाते. पण हे व्रत नेमके का साजरे केले जाते या मागील महत्त्व काय आहे तेही आपण खास ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात -
ग्राफीक्स - सचिन बिरादार
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.