आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Maratha Reservation | Aurangabad | Thousands Of Maratha Workers To Go To Mumbai; There Will Be A Fast In Front Of Kranti Chowk And District Collector's Office, Decision In The Meeting

मराठा आरक्षण:हजारो मराठा सेवक मुंबईला जाणार; क्रांती चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणासही बसणार, बैठकीत निर्णय

संतोष देशमुख । औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठवाड्यातील मराठ्यांच्या प्रश्नांचा समावेश करावा, केंद्र सरकार विरोधातही आवाज उठवण्याची मागणी
  • खासदार संभाजीराजेंनी सर्वसमावेश प्रश्नांसाठी अन्नत्याग आंदोलन केले तर सक्रीय त्यांच्या सोबत राहू अन्यथा शिवरायांच्या गादीला मान देऊ

सकल मराठा समाजाचे प्रश्न केंद्र व राज्य सरकारने सोडवावेत. पण दोन्ही सरकार अक्षम्य दुर्लक्ष करत आहेत. यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. त्याचा उद्रेक होण्यापूर्वी खासदार संभाजीराजे भोसले यांनी प्रमुख सहा प्रश्न घेऊन २६ फेब्रुवारीपासून आझाद मैदानावर अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाला मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने प्रा. चंद्रकांत भराट यांनी मंगळवारी पाठींबा जाहीर केला. पण आम्ही शिवरायांच्या गादीला मान देऊन अन्नत्याग आंदोलनात सहभागी होत आहोत. संभाजीराजेंनी मराठा आरक्षणासाठी केंद्राविरोधात दिल्ली स्वारी पण करावी, मराठवाड्यातील मराठ्यांना ओबीसी जात प्रमाणपत्र मिळावे, यासाठी आवाज उठवावा, तेव्हा अधिक ताकदीने आम्ही त्यांच्या सोबत राहू, अशी भूमिका देखील अनेक मराठा सेवकांनी स्पष्ट केली.

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द झाल्याने मराठा समाजाचे विविध प्रश्नांकडे तातडीने लक्ष देऊन ते सोडवावे, यासाठी खासदार संभाजीराजे यांनी आंदोलनाचे अस्र उगारले होते. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वपूर्ण बैठक घेऊन एका महिन्यात सर्व प्रश्न सोडवण्याच ग्वाही त्यांना दिली होती. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी सरकाने केली नाही. या विरोधात पुन्हा संभाजीराजेंनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. मुंबईपर्यंत मोर्चा काढण्याचेही ठरले होते. पण कोरोनाची लाट पुन्हा सक्रीय झाल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले होते. या कालावधीतही सरकारने उक्ती प्रमाणे कृती केलीच नाही. सर्व मागण्या जैसे थे असून महाविकास आघाडी सरकार कान असून बहिऱ्याची भूमिका घेत असल्याने महाराष्ट्रभर संतापाची लाट पसरली आहे.

संभाजीराजे या वेळी आंदोलनाचे नेतृत्व करणार असल्याने सर्वांचेच लक्ष त्यांच्याकडे लागले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी औरंगाबादेत क्रांती मोर्चाची गुलाब विश्व हॉलमध्ये महत्त्वपूर्ण बैठक झाली. बैठकीत सर्वांनी आपआपली मते मांडली. तसेच राज्य व केंद्र सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. तसेच संभाजीराजेंनी केवळ सहा प्रश्नच का घेतलीत? राज्य सरकार विरोधातच आंदोलन का? असे लक्षवेधी प्रश्नही उपस्थित करून मराठवाड्यातील मराठ्यांना ओबीसी जातीचे प्रमाणपत्र मिळावे, आईच्या जातीचा दाखला ग्राह्य धरला जावा, केंद्र सरकारने घटना दुरूस्ती करून आरक्षणाची मर्यादा वाढवावी, यासह विविध प्रश्नांसाठीही अन्नत्याग आंदोलनात आवाज उठावला जावा, अशी भूमिका जाहीर करून संभाजीराजेंच्या अन्नत्याग आंदोलनात सहभागी व्हावी अशी एकमुखी भूमिका मांडली.

तर सर्वांच्या वतीने प्रा. भराट यांनी पत्रकार परिषदेत संभाजीराजेंच्या अन्नत्याग आंदोलनास पाठींबा जाहीर केला. बैठकीला अभिजीत देशमुख, प्रदीप सोळुंके, किशोर चव्हाण, राजेंद्र दाते पाटील, सुरेश वाकडे पाटील, सतीश वेताळ पाटील, रवींद्र काळे, आप्पासाहेब कुढेकर, सुनील कोटकर, निलेश डव्हळे पाटील, सुकन्या भोसले, रेखा वाहटुळे, अॅड. स्वाती नकाते, अनिकेत चव्हाण, गणेश उगले, यांच्यासह शेकडो मराठा तरुण सहभागी झाले होते.

या मागण्यांसाठी अन्नत्याग
१) सारथी संस्थेच्या सबलीकरणासाठी १ हजार कोटींचा निधी द्यावा. यासाठी आराखडा तयार करून टप्प्याटप्प्याने हा निधी वर्ग करावा.
२) अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाकडून व्याज परतावा योजनेतून १० लाखऐवजी २५ लाख रुपये मिळावे. व्याज परतावा महिन्याच्या महिन्याला मिळावे.
३) वस्तीगृह तातडीने उभारावेत.
४) कोपर्डी घटनेतील नराधमांना झालेल्या फाशीच्या शिक्षेची तातडीने अंमलबजावणी व्हावी.
५) ४२ मराठा विद्यार्थ्यांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिले त्यांच्या कुटुंबियांना १० लाखांचे अर्थसाह्य व एकास नोकरी द्यावी,
६) ईडब्ल्यूएस, इएसबीसी, एसइबीसीतील गोंधळ संपवा, नियुक्ती झालेल्यांना नोकरीत सामवून घ्यावे.

मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्या
वरील मागण्यांबरोबरच केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करून आरक्षणाची मर्यादा वाढवावी व मराठा आरक्षणाचा प्रश्न त्वरीत सोडवावा. सर्व पक्षांच्या खासदारांनी पुढाकार घ्यावा, यासाठी संभाजीराजेंनी राज्या प्रमाणेच दिल्ली स्वारी करावी. केंद्र सरकार ऐकत नसेल तर संसदेवर मोर्चा काढावा, आम्ही त्यात सक्रीय सहभाग घेऊ, अशी भूमिका मराठा सेवकांनी मांडली. परत खासदारकीचा राजकीय लाभ घेण्यासाठी सकल मराठा समाजाला वेठीस धरू नका, अशी ठोस भूमिका देखील अनेकांनी मांडली.

विदर्भात मराठा कुणबी म्हणून जात प्रमाणपत्र मिळते. त्यांना ओबीसीमधून आरक्षणाचा लाभही मिळतो. त्याच धर्तीवर मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबीचे जात प्रमाणपत्र मिळावे व आईच्या जातप्रमाणपत्रावर पाल्यांना आरक्षणाचा लाभ मिळावा. या प्रमुख मागणींचा अन्नत्याग आंदोलनात समावेश करावा. तरच आम्ही अन्नत्याग आंदोलनात सहभागी होऊ अन्यथा शिवरायांच्या गादीला मान देण्यासाठी सहभागी होऊ अशी भूमिका ज्येष्ठ मराठा सेवक किशोर चव्हाण, रेखा वाहटुळे, सतीश वेताळ पाटील, सुरेश वाकडे पाटील यांनी मांडली आहे.

बैठीकतील महत्त्वाचे निर्णय
मराठा प्रमुख, ज्येष्ठ, कनिष्ठ समन्वयक आता कुणीच राहणार नाही. त्याऐवजी मराठा सेवक म्हणून सर्वांनी काम करावे. प्रसिद्दी पत्रकावर, सोशल मिडियावर सेवक म्हणूनच उल्लेख करावे, असा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. तसेच सुरेश वाकडे पाटील, राजेंद्र दाते पाटील, प्रा. चंद्रकांत भराट, किशोर चव्हाण यांची मार्गदर्शक कमिटी स्थापन करण्यात आली. त्यांना विचारल्याशिवाय कुणीच मराठा क्रांती मोर्चाची भूमिका जाहीर करणार नाही, प्रसिद्धी पत्रकार काढणार नाही असेही ठरले. जो नियमांचे उल्लंघन करेल त्यांना कायदेशीर उत्तर देऊ, अशी ठोस व चांगली भूमिकाही जाहीर करण्यात आली.

गोंधळामुळे दोघे निघून गेले
इतर प्रश्न घुसडवलेले चालणार नाहीत, अशी भूमिका कुढेकर यांनी पत्रकार परिषदेत घेतली. त्यामुळे बहुतांश जण नाराज झाले व त्यांनी सकल मराठा समाजाचे महत्त्वाचे प्रश्न संभाजीराजे घेणार नसले तर आम्ही गादीला मान देण्यासाठी आंदोलनात सहभागी होऊ अशी भूमिका जाहीर केली. तर अभिजीत देशमुख व प्रसिद्ध व्याख्याते प्रदीप सोळुंके या गोंधळामुळे निघून गेले. या दोघेही राष्ट्रवादीचे नेते असल्याने बैठकीत त्यांना बोलण्याची संधी देण्यात आली नाही हे ही विशेष.

भाजप प्रेरीत आंदोलन
संभाजीराजेंचे खासदरकी लवकरच संपुष्टात येत आहे. पुन्हा खासदारकी हवी असेल तर त्यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात आवाज उठवावा, यासाठी मराठा समाजाचे काही मोजकेच प्रश्न घेऊन आंदोलन करण्यासाठी भाजप नेतृत्वाकडून सांगण्यात आले. त्यानुसार आंदोलन होत असल्याचेही काही तरूणांनी प्रखर टिका केली.

बातम्या आणखी आहेत...