आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षण:उद्याचा मोर्चा सरकारच्या चूका दाखवणारा आणि वाभाडे काढणारा हा मोर्चा असेल- विनायक मेटे

बीड16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भोसले समितीत मराठाद्वेषी सदस्य- नरेंद्र पाटील

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, बीडमधील मराठा क्रांती संघर्ष मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळत असल्यामुळे काही जणांच्या पोटात पोट सूळ उठला आहे. बीडचा संबंध नसताना इथे येऊन विरोध केला जातोय, असे ते म्हणाले. मेटेंसोबत यावेळी मराठा नेते नरेंद्र पाटील यांची उपस्थिती होती.

काँग्रेसने अण्णासाहेब पाटलांचा खून केला
पुढे बोलताना मेटे म्हणाले की, मराठा समाजाचे नाव काढले तरी काँग्रेसच्या पोटात दुखते. त्यांची ही भूमिका पूर्वीचीच आहे. मराठा समाजाचे नेते कै. अण्णासाहेब पाटील यांनी 1982मध्ये मराठा आरक्षणासाठी मंत्रालयावर मोर्चा काढला होता. पण काँग्रेसने त्यांच्या मागण्यांचा साधा विचारही केला नाही. काँग्रेस सरकारने त्यांची हत्या केली. मराठा आरक्षणा संदर्भात असे अनेक खून काँग्रेस केले, असा गंभीर आरोपही मेटींनी यावेळी केला. तसेच, या मोर्चा संदर्भात अनेक लोक गरळ ओकत आहेत. पण, त्यांनी त्यांचे काम करावे आम्ही आमचे काम करू, असेही ते म्हणाले.

उद्याचा मोर्चा निघणारच
मेटे पुढे म्हणाले की, उद्याचा मोर्चा हा 100 टक्के निघणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाला आम्ही धडक देणार आहोत. उद्याचा मोर्चा हा मुका मोर्चा नसेल तर तो बोलका असेल. सरकारच्या चूका दाखवणारा, सरकारचे वाभाडे काढणारा हा मोर्चा असेल, असे ते म्हणाले.

उद्या 5 जून रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकूल येथून मराठा क्रांती संघर्ष मोर्चा निघेल. या मोर्चाला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. नरेंद्र पाटील या मोर्चासाठी कालपासून तयारी करत आहेत, असेही ते म्हणाले.

काँग्रेसच्या पोटात दुखतंय

मेटे पुढे म्हणाले की, बीड जिल्ह्याचा संबंध नसताना काही उपटसुंभ लोक इथे येऊन बोलत आहेत. काही लोकांना हाताशी धरून काँग्रेसचा हा विरोध सुरू आहे. महाराष्ट्राचं नावं काढलं की काँग्रेसच्या पोटात दुखतं. मराठा समाजाचं नाव घेतलं की काँग्रेसचे वांदे व्हायला लागतात, असे मेटे म्हणाले. तसेच, उद्या मोर्चाला येताना कोणी अडवले तर त्यांना आम्ही परत मोर्चात आणण्याचे काम करणार. कोणीही घाबरण्याचे कारण नाही. मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हा. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा आणि कोणीही कायदा हातात घेऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.

भोसले समितीत मराठाद्वेषी सदस्य- नरेंद्र पाटील
यावेळी नरेंद्र पाटील यांनीही सरकारवर जोरदार टीका केली. मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा अभ्यास करण्यासाठी माजी न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत मरााठा द्वेषी सदस्यांचा समावेश आहे, असा आरोप माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केला आहे.

पाटील पुढे म्हणाले की, माझे वडील काँग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार होते. त्यांनी आर्थिक निकषावर मराठ्यांना आरक्षण देण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यावर काहीच निर्णय घेतला गेला नाही. मराठा आरक्षणासाठी 1982 साली काँग्रेसने कोणतीच समिती स्थापन केली नाही आणि म्हणून वडिलांनी आत्महत्या केली, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

काहीही झाले तरी मोर्चा निघणारच
मराठा समाजासाठी विनायक मेटे, खासदार संभाजी छत्रपती, खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे चांगले काम करत आहेत. काही लोक सत्तेसाठी लाचारी करत आहेत. त्यांनी लाचारी सोडावी आणि मराठा आरक्षणासाठी एकत्र यावे. काहीही झाले तरी उद्याचा मोर्चा निघणारच, असेही नरेंद्र पाटील यावेळी म्हणाले.

इनपुट-रोहित देशपांडे

बातम्या आणखी आहेत...