आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठा समाजाचा गावागावात दबदबा आहे. राज्यातील ८०% शेतजमिनीवर ताबा आहे. विधिमंडळ, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार आदी सत्तेत सर्वाधिक वाटा आहे. म्हणजेच मनी, मसल आणि पॉलिटिकल पॉवर असलेल्या या समाजाला सामाजिक आरक्षणाची गरजच काय आहे? तुरळक गरिबांचे आर्थिक दारिद्र्य नष्ट करण्यासाठी आरक्षणाचा गैरवापर कदापि करता येणार नाही, असे परखड मत ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केले.
अॅड. सदावर्ते व अॅड. जयश्री पाटील यांनी मराठा अारक्षणाविराेधात सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल केली हाेती. बुधवारी न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद मान्य करत मराठा अारक्षणाचा कायदा रद्द केला. या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत अॅड. सदावर्ते यांनी अापले मुद्दे मांडले. ‘शंभर कोटी रुपयांच्या लाचखोरीविरोधात अॅड. जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यात अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे मला व माझ्या पत्नीला बदनाम करण्यात आले. आमचे हितसंबंध भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी आहेत. त्यांच्या इशाऱ्यावरून आम्ही याचिका लढलो असे अाराेप झाले. पण मी तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कट्टर विरोधात आहे. फडणवीस संघाचे आहेत, तर मी बुद्धाच्या संघाचा आहे. त्यामुळे आमचे लागेबांधे असण्याचा प्रश्नच नाही. पण शरद पवार आणि त्यांची टीम अशीच बदनामी करत आले आहेत, असेही अॅड. सदावर्ते म्हणाले.
बाबासाहेबांच्या विचारांचा गैरवापर थांबवणार
आई भारती आणि वडील निवृत्ती यांना गुणरत्न आणि राजरत्न अशी दोन मुले आहेत. राजरत्न धाकटे असून ते फुप्फुसांचे तज्ञ डॉक्टर आहेत. मुंबई मनपाच्या सर्वात मोठ्या कोविड हॉस्पिटलचे राजरत्न प्रमुख डॉक्टर आहेत. वडील नांदेड पालिकेत ३० वर्षे नगरसेवक होते. संपूर्ण कुटुंबीय मूळत: तेलंगणा येथील आहे. पण नांदेड येथेच स्थायिक झाले. केवळ आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गुणरत्न सदावर्ते डॉक्टर झाले. ‘वडिलांची इच्छा होती की, आपण काहीतरी जगावेगळे करून दाखवावे. त्यासाठीच माझी धडपड सुरू असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा गैरवापर करणे थांबवणे, आर्थिक-सामाजिक स्वातंत्र्य, जे बाबासाहेबांना अभिप्रेत होते त्यासाठी व्यापक लढा उभारणे हा आम्हा दोघांच्याही आयुष्याचा उद्देश आहे. त्यासाठी प्राणाचे बलिदान देण्याची तयारी आहे. पण प्रजासत्ताक भारत निर्माण करण्यासाठीचा लढा सुरूच राहील,’ असे अॅड. गुणरत्न म्हणाले.
संविधानावरील पीएचडी औरंगाबादेत
सदावर्ते यांचे शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून झाले आहे. १९९४ दरम्यान त्यांनी औरंगाबादच्या शासकीय दंत महाविद्यालयात बीडीएसला प्रवेश घेतला. १९९८ मध्ये बीडीएस पूर्ण करून ते दंतचिकित्सेमधील डॉक्टर झाले. त्यानंतर नागसेनवन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातून एलएलबी केले. एमएत फुले- आंबेडकर विचारधारेत त्यांनी सुवर्णपदक पटकावले. २०१३ दरम्यान त्यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेट, सेक्युलर रिफ्लेक्टेड इन इंडियन कॉन्स्टिट्युशन’ या विषयात अाैरंगाबादेतून पीएचडी केली. सदावर्ते यांचा राज्यशास्त्र, समाजशास्त्र, विधी व न्यायशास्त्र, दंतशल्यचिकित्सा आदींंसह विविध विषयांचा अभ्यास आहे. मुंबई विद्यापीठातून त्यांनी विधीचे पदव्युत्तर शिक्षण अर्थात एलएलएम पूर्ण केले.
जयश्रीमुळेच माझे अस्तित्व
जयश्री अन् माझा प्रेमविवाह आहे. औरंगाबादच्या विद्यापीठात आम्ही सोबत शिक्षण घेतले. विद्यार्थ्यांसाठी जयश्री यांची आक्रमक आंदोलने होत असत. मीदेखील खूप आक्रमक होतो. एकदा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांच्या रूम जाळण्यात आल्या होत्या. त्या आरोपात काही आंबेडकरी चळवळीतील विद्यार्थ्यांना पोलिसांनी पकडून नेले होते. तेव्हा ठाण्यात पोलिस अधिकाऱ्यांशी जयश्री यांनी केलेला संवाद माझ्या आजही स्मरणात आहे. त्याच वेळी मी त्यांच्या प्रेमात पडलो होतो. आम्ही दोघेही समाजाच्या वेदनांवर एकत्र येऊन काम करू लागलो. त्यानंतर प्रेमविवाह केल्याची आठवण सदावर्ते यांनी सांगितली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.