आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षण:लॉकडाऊननंतर मराठा समाजाचा पहिला मोर्चा बीडमध्ये, शनिवारी निदर्शने करणार; पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याची तयारी

औरंगाबाद2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सातारा : गृह राज्यमंत्री शंभूराज देसाईंच्या घरासमोर पेटवल्या गोवऱ्या

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिल्यानंतर राज्यभरात दुसऱ्या दिवशीही तीव्र पडसाद उमटले. लॉकडाऊननंतर मराठा समाजाचा पहिला मोर्चा बीडमध्ये काढण्यात येणार असल्याची घोषणा शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी केली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन पातळीवरही लढाई पुढे सुरू ठेवली जाणार असल्याचा निर्धार आरक्षण हस्तक्षेप याचिकाकर्ते ‌िवनोद पाटील यांनी केला आहे.

बीडमध्ये बैठक : गुरुवारी शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांच्या उपस्थितीत बीडला मराठा संघटनांची बैठक झाली. शुक्रवारी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शनिवार,८ मे रोजी निदर्शने केली जाणार आहेत. त्याचबरोबर लॉकडाऊन संपल्यानंतर बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठा समाज पहिला मोर्चा काढणार आहे. बीडनंतर राज्यभरात माेर्चे काढले जातील, असे मेटे यांनी सांगितले.

पुन्हा काही मुद्दे निदर्शनास आणून देणार : विनोद पाटील
मराठा अारक्षणासंदर्भात काही मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले तर हा कायदा नक्कीच टिकेल, म्हणूनच ३० दिवसांच्या आत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करणार असल्याचे हस्तक्षेप याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. ईडब्ल्यूएस आरक्षण, महाराष्ट्रातील ५२ टक्के आरक्षण व इतर राज्यांत ५० टक्यांंपेक्षा अधिक असलेले आरक्षण यावरून देशात ५०% आरक्षणाची मर्यादा कधीच ओलांडली गेली आहे, हे स्पष्ट होते. मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील अर्ध्यापेक्षा जास्त आकडेवारी ही शासकीय आहे. आयोगाच्या अधिकाराप्रमाणे त्यांनी नोंदी केल्या आहेत. आरक्षणाचा अधिकार हा राज्याचा आहे, असे अॅटर्नी जनरल व केंद्रीय कायदामंत्र्यांनीही लेखी स्पष्टीकरण दिले अाहे. या सर्व मुद्द्यांबाबत स्पष्टता यावी म्हणून पुनर्विलोकन याचिका दाखल करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

सातारा : गृह राज्यमंत्री शंभूराज देसाईंच्या घरासमोर पेटवल्या गोवऱ्या
मराठा आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ राज्याचे गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांच्या पोवई नाक्यावरील ‘कोयना दौलत’ बंगल्यासमोर काही युवकांनी गुरुवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास गोवऱ्या जाळून घोषणाबाजी केली, तर सातारा जिल्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयांवर दगडफेक केली. यात दोन्ही कार्यालयांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बातम्या आणखी आहेत...