आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षण:विनायक मेटेंनी मुख्यमंत्री आणि अशोक चव्हाणांविरोधात औरंगाबाद खंडपीठात दाखल केली याचिका, ईडब्ल्यूएस आरक्षण देण्याची मागणी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाच जूनला बीडमधून निघणार मोर्चा

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांच्या विरोधात औरंगाबाद न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षण लागू करा अशी मागणी मेटे यांनी केली आहे. तसेच मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले याला हे सरकार जबाबदार असल्याचे ते म्हणाले आहेत. 5 मे रोजी मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. यानंतर मराठा समाजामध्ये उद्रेक पाहायला मिळत आहे.

विनायक मेटे यांनी सांगितले की 5 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले. यामुळे मराठा समाज खुल्या प्रवर्गात आला आहे. आरक्षण रद्द झाल्यानंतर आम्ही राज्य सरकारकडे मराठा समाजाला ईडब्ल्यूएसमध्ये आरक्षण द्यावे अशी मागणी केली होती. ज्यांना कोणतेही आरक्षण मिळत नाही अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांसाठी कोणत्याही समाजाच्या लोकांसाठी 10 टक्के आरक्षण दिले आहे. यामध्ये मराठा समाजाला घेण्याची मागणी केली होती. मात्र आता 15-20 दिवस झाले यावर काहीच कार्यवाही झालेली नाही. यामुळे नाकर्तेपणाच्या विरोधात मी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केल्याचे मेटे म्हणाले.

विनायक मेटे पुढे म्हणाले की, 'आम्ही या सरकारला ईडब्ल्यूएस आरक्षण मराठा समाजाला लागू करण्याची मागणी करत आहोत. हे सरकार टाइमपास करत आहे, चालढकल करत आहे आणि वेळ काढू करत आहे. पण न्याय द्यायचं काम करत नाही. म्हणून औरंगबाद खंडपीठात मी स्वतः उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण आणि मुख्य सचिवांविरोधात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत आम्ही कोर्टाला विनंती केली की, ताबडतोब नोटीसा काढा, आदेश द्या आणि आम्हाला न्याय द्या. कारण हे सरकार न्याय देईल यावर आम्हाला विश्वास नाही.'

पाच जूनला काढणार मोर्चा
विनायक मेटेंनी सांगितले की, 'पाच जूनला या सरकारविरोधातील असंतोष व्यक्त करण्यासाठी बीड येथून आंदोलनाची सुरुवात करण्यात येईल. मराठा काँग्रेस संघर्ष मोर्चा, लढा आरक्षणाचा या नावाने हे आंदोलन करण्यात येईल. या मोर्चाला परवानगी आहे की नाही यावर बोलताना मेटे म्हणाले की, शासनाने आम्हाला परवानगी द्यावी अशी आमची विनंती आहे. शासनाने आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर त्यांना वाईट परीणाम भोगावे लागतील.

आम्ही 16 ला मोर्चा काढण्याचे नियोजन केले होते. मात्र आता कोरोनामुळे आम्ही 5 जूनला मोर्चा काढण्याचे ठरवले आहे. या मोर्चामध्ये येणाऱ्या प्रत्येकाला मास्क, सॅनिटाझरची बॉटल आणि सोशल डिस्टेसिंगचे पालन करणे अनिवार्य असणार आहे. पण या व्यतिरिक्त हे आम्ही पाळतोय. पण शासन कुठे पाळत आहे. शासन तर दररोज कुठेतरी निवडणूक लावत आहे. तुम्ही गोकूळ आणि पंढरपूरची निवडणूक कोरोनाचा कहर असताना घेतली. तुम्ही आता कारखान्याचे इलेक्शनही घेत आहात.

बातम्या आणखी आहेत...