आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्रेक द चेन:​​​​​​​बॅरिकेड्स लावून रस्ते बंद अन् शेतमाल खरेदी-विक्री थांबवली; आजपासून आणखी कडक निर्बंध लागू होणार

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठवाड्यात कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई

राज्यात काेराेनाचा उद्रेक झाला अाहे. त्यामुळे राज्य सरकारने २२ एप्रिलपासून कडक लाॅकडाऊन घाेषित केला. कायदा- सुव्यवस्थेच्या दृष्टीने मराठवाड्यात पूर्ण तयारी करण्यात आली. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना रोखण्यासाठी व त्यांच्यावर कारवाई करण्याच्या दृष्टीने प्रशासन सज्ज झाले आहे. बळाचा वापर करण्याच्या सूचना असल्या तरी नियम मोडणाऱ्यांच्या वाहनांचे फोटो काढून मोबाइलवर दंडाची पावती पाठवली जाईल. काही जिल्ह्यांत शेतमाल खरेदी-विक्री बंदचे आदेश काढण्यात आले आहेत. नांदेडमध्ये तर बॅरिकेड्स लावून रस्ते बंद करण्यात आले आहेत.

लातूर : जनतेसाठी हेल्पलाइन नंबर
मुख्य रस्त्यावर जागोजागी बॅरिकेड्स लावलेले आहेत. तसेच तेथे काही ठिकाणी तैनात पोलिस प्रत्येक वाहनधारकाची चौकशी करत आहेत. लातूर शहरातील गंजगोलाई, नंदी स्टाॅप, शिवाजी चौक, गांधी चौक, पीव्हीआर चौक, राजीव गांधी चौक, गरुड चौक, अहिल्याबाई होळकर चौक, मिनी मार्केट आदी ठिकाणी पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासन स्तरावर मोबाइल पथक पाहणी करीत आहेत. आरोग्य यंत्रणा व्यवस्थित कार्य करीत आहेत काय, यासाठी पथकामार्फत पाहणी केली जात आहे. जनतेची गैरसोय होऊ नये यासाठी ९१५८६३२३३३, १८००२३३१३८८, (०२३८२)-२५५५८५ हे हेल्पलाइन नंबर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

परभणी शहरात कडेकोट बंदोबस्त
परभणी शहरासह जिल्हाभरात गुरुवारी सर्वच दुकाने कडकडीत बंद होती. राज्य शासनाने भाजीपाला, किराणा दुकान, बेकरी यांना बंदमधून काही काळासाठी सूट दिली असली तरी परभणी जिल्ह्यात मात्र संपूर्ण दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काढले आहेत. दुकाने बंद ठेवण्याची मुदत आज संपणार असली तरी ही मुदत रविवारपर्यंत (दि.२५) वाढवण्यात आली आहे. शहरात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रस्त्यावरून विनाकारण फिरणाऱ्या वाहनांचे छायाचित्र काढून त्यांच्या मोबाइलवर दंडाची पावती पाठवली जात आहे. त्यामुळे रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची गर्दीही कमी झाली आहे.

हिंगोली : कारवाईनंतर भाजी बाजार बंद
हिंगोली शहरासह जिल्हाभरात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजेनंतर सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद झाली होती. भाजीपाला बाजारात पालिकेच्या पथकाने कारवाई सुरू केल्याने भाजीबाजार बंद झाला होता. शहरातील गजबजणारे रस्ते सकाळी अकरानंतरच निर्मनुष्य झाले होते. ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोंढ्यात सध्या हळद खरेदी-विक्रीसाठी मोठी गर्दी होत असल्याने बाजार समितीनेही पुढील आदेशापर्यंत शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

नांदेड : विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई
कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गुरुवारी रात्री ८ वाजतापासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून त्याच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवरील चौकाचौकात बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी लाकडी बांबू लावून वाहतूक वळवण्यात आली आहे. मनपाचे अधिकारी, कर्मचारी व पोलिस कर्मचारी विनाकारण घराबाहेर, रस्त्यांवर येणाऱ्या नागरिकांवर करडी नजर ठेवून असणार आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागांत रुग्णसंख्या जास्त असल्याने याठिकाणीही कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.

जालना : उद्योगांना जिल्ह्यात दिली सूट
जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कडक करण्यात आले. उद्योगांना यातून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे जालना येथील स्टील उद्योगही सुरू आहे. विशेष म्हणजे कारखान्यापासून जवळच मजुरांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या तरी एकही मजूर जालना सोडून गेलेला नाही, असा दावा स्टील उद्योजक करीत आहेत. जालना येथील स्टील कारखाने सध्या ४० टक्के क्षमतेने सुरू आहेत. जालना येथील स्टील उद्योगात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जवळपास २५ ते ३० हजार कामगार कार्यरत आहेत.

बातम्या आणखी आहेत...