आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी भाषा दिन विशेष:मॉरिशसमध्ये जपली मराठी संस्कृती, मूळ मराठी लोकं 60 हजार, 3 लाखांवर दुर्मिळ मराठी पुस्तकांचा ठेवा

नितीन पोटलाशेरू | औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मातृभाषा क्रिओल अन् फ्रेंच, पण प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्येही शिकवली जाते मराठी
  • व. पु. काळे, पु. ल. देशपांडे, वि. वा. शिरवाडकर यांच्या पुस्तकांना अधिक पसंती

मॉरिशसमधील महात्मा गांधी इन्स्टिट्यूटच्या लायब्ररीत ३ लाखांच्या वर मराठी भाषेची चरित्र, कथा, कविता, संत वाङ्मय व संशोधनावर आधारित नानाविध प्रकारची दुर्मिळ पुस्तके आहेत. विशेष म्हणजे दरवर्षी ५० हजार रुपयांच्या पुस्तकांची भर यात पडते. पुस्तकांची मागणी करण्यात तरुणाईच पुढे आहे. याशिवाय महाराष्ट्रात जाणारी मंडळी आवर्जून पुस्तके आणतातच.

मॉरिशसमधील तरुण पिढीचा मराठीकडे सर्वाधिक ओढा आहे. मॉरिशसमध्ये १९६९ नंतर गजानन पुरुषोत्तम जोशी यांनी विविध उपक्रमांद्वारे येथील लोकांत मराठीविषयीची गोडी वाढवली. १९८४ नंतर प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये मराठी विषय शिकवण्यास सुरुवात झाल्यानंतर येथील विद्यार्थी, तरुणांमध्ये मराठीविषयी आकर्षण निर्माण झाले आणि ज्येष्ठांपासून तरुण पिढीपर्यंत मराठी प्रमाण भाषा म्हणून वापरली जाऊ लागली. याच पिढीचे प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे पूर्वशा सांतराम सखू. एकीकडे परकीय भाषांचा बाेलबाला असताना २१ वर्षीय पूर्वशाला मात्र मराठीची शिक्षिका व्हायचंय. मातृभाषा क्रिओल अन् फ्रेंच असताना तिने मराठीत पदवी शिक्षण घेतले. एमए व पीएचडी करत स्वत:ची भाषा तिला समृद्ध करायची आहे. विशेष म्हणजे मॉरिशसमध्ये ती शालेय मुलांना अ,आ, इ, ई...चे धडे देत मराठी संस्कृतीशी असलेली नाळ अधिक घट्ट करत आहे.

मराठीचा वारसा जपणारी पूर्वशा एकटी नव्हे, तर तिच्यासारख्या शेकडो तरुण-तरुणींचे पालक आपल्या पाल्यांना मराठी भाषेचे ज्ञान देण्यास प्राेत्साहन देत आहेत. मॉरिशस सरकारकडून शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर पूर्वशा कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठांतर्गत महावीर महाविद्यालयात मराठी तरुणाईच्या बरोबरीने बीए तृतीय वर्षात शिकत आहे.

मागील ४० वर्षांपेक्षा अधिक काळ मॉरिशसमध्ये मराठीची जपवणूक व संवर्धनासाठी प्रयत्न करणारे तेथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूटमध्ये मराठीचे प्राध्यापक असलेले डॉ. होमराजन गोवरिया मराठीबद्दल बोलताना म्हणाले की, आमचे पूर्वज पूर्वापार कोकण, पश्चिम महाराष्ट्रातून मॉरिशसला आले. पण मराठी संस्कृती, भाषेचा धागा इतका पक्का होता की, शेकडो वर्षांनंतरही आमचे मराठीवरील प्रेम तसूभरही कमी झालेले नाही. उलट ते वृद्धिंगत होत आहे. तरुण पिढीही अगदी आवडीने मराठी भाषा शिकून यात करिअर करण्यासाठी उत्सुक आहे. यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात.

डॉ. होमराजन यांनी स्वत: औरंगाबादच्या स.भु. महाविद्यालयात बीए प्रथम वर्ष आणि मुंबई विद्यापीठातून मराठीतून पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून पीएचडी केली. आज विविध संस्थांच्या माध्यमातून मराठी भाषेचे काम ते करत आहेत.

मराठी बांधवांप्रमाणे आम्हीही पिढ्या-दरपिढ्या ही भाषा टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. म्हणूनच गणेश चतुर्थीसह गुढीपाडवा अन् अगदी १ मे रोजीचा महाराष्ट्र दिनही मॉरिशसमध्ये उत्साह अन् जल्लोषात साजरा केला जातो. आजवर अनेक विद्यार्थी औरंगाबाद, पुणे, मुंबई व कोल्हापूर येथून मराठी शिकून मायदेशी परतल्याचेही डॉ. होमराजन सांगतात.

मंडळ-संस्थांद्वारे मराठीचे संवर्धन, इतर भाषांनाही महत्त्व
येथे भारतातून विविध भाषिक राज्यांतील लोक स्थायिक झाले. त्यामुळे मराठीच नव्हे तर तेलगू, गुजराती, तामिळ व उर्दू आदी भाषा व ती संस्कृती जपली जाते. मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन, मराठी स्पीकिंग युनियन, मराठी सांस्कृतिक केंद्र, मराठी साहित्य परिषद, मराठा मंदिर या संस्थांच्या माध्यमातून मराठीसाठी कार्य केले जाते.

भाषा म्हणून मराठीलाही दर्जा, शिकण्यासाठी सरकारकडून मिळते अनुदान

मॉरिशसमध्ये भाषा म्हणून मराठीला विशिष्ट दर्जा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे मॉरिशस सरकारकडून यासाठी अनुदान दिले जाते. देशात जवळपास ६० हजारांवर मराठी मूळ असलेले लोक आहेत. मॉरिशसच्या मेळरोज, आर्ययेता, वाकवा, शामौनी, तमारीन, मोका, लोरोजा, न्यू ग्रोव्ह, बेल एअर, रोस बेल, काशी, ब्रिटननीय, कटररेबोर्न, मर्दालबेर, प्रोविडेंस, दागोटियर, आलमा आदी भागांत मूळ मराठी नागरिक स्थायिक झाले आहेत. म्हणून मराठी गौरव भाषा दिनाचा कार्यक्रमही येथे केला जातो. वि.वा. शिरवाडकर, व. पु. काळे, पु.ल. देशपांडे आदी साहित्यिकांचे साहित्य आवडीने वाचले जाते. नवसाहित्यिकांच्या पुस्तकांचे वाचन करणारी पिढीही येथे आहे.

मराठी गुणवंतांना शिष्यवृत्ती
प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्येही ऐच्छिक विषय म्हणून मॉरिशसमध्ये मराठी शिकवली जात आहे. बारावीपर्यंत मराठीत अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या गुणवंतांना मॉरिशस सरकार शिष्यवृत्तीच्या माध्यमातून महाराष्ट्रात मराठी शिकायला पाठवते. १९९० नंतर तर मराठी भाषा शिकणाऱ्यांचे प्रमाण मॉरिशसमध्ये प्रचंड वाढले आहे. मराठी शिकवणे आणि टिकवणे ही त्यांची जबाबदारी असते.

बातम्या आणखी आहेत...