आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती शिवाजी महाराज यांच्या युद्धनीतीची दखल जगाने घेतली. शिवकालीन इतिहासातील लढाईचा थरार पडद्यावर पाहताना आपणही शिवरायांचे मावळे व्हायला हवे होते, असे आपाेआप वाटून जाते. गनिमी कावा, ढाल-तलवार, दांडपट्टा आदी शस्त्रांचा सरदार व मावळे कसा चपळाईने वापर करायचे याची अनुभव घेण्याची व्हर्च्युअल संधी आता नाशिकच्या वैभव महाजन या सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणाने उपलब्ध केली आहे. ‘तान्हाजी : द लायन मराठा वॉरियर’ या गेमिंग ॲपच्या माध्यमातून १३ लेव्हलमध्ये कोंढाणा जिंकण्याची कामगिरी सर्वांनाच पार पाडता येऊ शकते. गेमिंगचा आनंद घेण्यासह शिवरायांच्या युद्धनीतीचा अभ्यासही याद्वारे होईल.
पब्जीसारख्या परदेशी गेममधून मुलांचे मनोरंजन तर होते पण शिकण्यासारखे काही नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वात प्रसंगी प्राणाची बाजी लावून लढणाऱ्या मावळ्यांचे शौर्य आणि मराठा समाजाचा इतिहास या गेमिंग ॲपच्या माध्यमातून कळण्यास मदत होत आहे. अल्पावधीतच ५० हजारांच्या जवळपास हे ॲप डाऊनलोड केले गेले. शेवटच्या श्वासापर्यंत लढून तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला जिंकला. तो जिंकण्यासाठी काय अडथळे आले व शत्रूशी त्यांनी व मावळ्यांनी कसे दोन हात केले हे गेमच्या माध्यमातून सर्वांना जाणता येणार आहे.
असे आहे गेमिंग ॲप
‘आबरा का डाबरा’ सॉफ्टवेअर सोल्युशन्स प्रा. लि. स्टार्टअपच्या माध्यमातून हे गेमिंग अॅप विकसित केले गेले आहे. लढाई सुरू करण्यापासून कोंढाणा जिंकण्यापर्यंत १३ लेव्हलमध्ये हा गेम विभागण्यात आला आहे. यात डोंगरावर चढाई करताना कपारीतून किंवा कुठूनही श्वापदं वा शत्रूचे सैन्य हल्ला करू शकतात, अशा वेळी ढाल, तलवार आदी शिवकालीन शस्त्रांचा वापर करून शत्रूचा खात्मा करत कोंढाणा जिंकण्याची कामगिरी पार पाडण्याचे टास्क देण्यात आले आहे.
गनिमी कावा, प्रामाणिकपणा, सचोटी शिकवणारा गेम
पब्जीसारख्या गेममधून परदेशी युद्धनीतीकडे भारतीय तरुणाई वळताना दिसून येते. अशा वेळी शिवरायांच्या युद्धनीतीचा जगाने अभ्यास करून शत्रूंवर मात केली. शिवरायांची हीच युद्धनीती तरुणाईला समजावी यासाठी हा गेम बनवल्याचे वैभव यांनी सांगितले. लॉकडाऊनच्या काळात गेल्या वर्षभरात वैभव महाजन व त्यांच्या २० ते २५ लोकांच्या टीमने मिळून हा गेम बनवला. पब्जी बॅन झाल्यानंतर याला भारतीय पर्याय नव्हता त्यामुळे शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीवर गेम बनवण्याचा प्रयत्न यशस्वी केला गेल्याचे ते म्हणाले.
शिवकालीन अभ्यास, किल्ल्यांची भटकंती करून गेम तयार कोंढाणाच्या लढाईवर गेम बनवणे सोपे नव्हते. वैभव यांनी शिवकालीन इतिहास वाचन केल्याने याबद्दल माहिती होती. गेममध्ये कुठल्या लेव्हल असायला हव्यात हे ठरवण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील ५० वर किल्ल्यांची भटकंती केली आणि त्याप्रमाणे त्यात अडथळे व शत्रूवर मात करताना तानाजी व मावळ्यांना येणारे अनुभव गेममध्ये समाविष्ट केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.