आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोल्हापूर येथे पहिले विश्वात्मक संत साहित्य संमेलन १४, १५ व १६ जानेवारी २०२२ रोजी आयोजित करण्यात आले आहे. या वर्षी औरंगाबादेतील विवेकानंद महाविद्यालय या संस्थेचे सुवर्णमहोत्सवी स्थापना वर्ष आहे. त्यामुळे विवेकानंद महाविद्यालय हे सहआयोजकाच्या भूमिकेत असल्याचे संस्थेचे सचिव श्रीमंतराव शिसोदे पाटील यांनी सांगितले.
संमेलनाचे अध्यक्ष मदन महाराज गोसावी हे दूरदृश्यप्रणालीद्वारे या पत्रकार परिषदेमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी सांगितले की, संत ज्ञानेश्वरांचा ७२५ वा समाधी सोहळा व संत नामदेवांची ७५१ वी जयंती यांचे औचित्य साधून अखिल विश्वातील सर्वधर्मसंप्रदायाचे अभ्यासक व उपासकांचे विचार या साहित्य संमेलनात ऐकण्यास मिळणार आहेत. या पत्रकार परिषदेसाठी विवेकानंद शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रभाकर मोरे, भाषा साहित्य संशोधन परिषदेचे अध्यक्ष डॉ. सर्जेराव जिगे, ‘तिफण’चे संपादक डॉ. शिवाजी हुसे, डॉ. ऋषीबाबा शिंदे, डॉ. अशोक देशमाने, डॉ. प्रमोद कुमावत, प्राचार्य डॉ. रामदास वनारे आदींची उपस्थिती होती.
गोदावरीताई मुंडे यांचे भजन
१४ जानेवारी रोजी संत बाळूमामा देवस्थान, आदमापूर जिल्हा कोल्हापूर येथे बाळूमामांच्या समाधीची विधिवत महापूजा, दुपारी गोदावरीताई मुंडे यांचे भजन व लोककलावंतांचे सादरीकरण होईल. छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी कोल्हापूर येथे हे साहित्य संमेलन १५ व १६ जानेवारी रोजी पार पडणार आहे. १५ जानेवारी रोजी सकाळी सहा वाजता संमेलनाध्यक्ष मदन महाराज गोसावी यांच्या हस्ते महालक्ष्मी मंदिरात विधिवत पूजा होईल. सकाळी ८ वाजता छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळापासून ग्रंथदिंडी निघणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना उद्घाटनासाठी निमंत्रण देण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.