आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुस्लिम समाजाला अारक्षण द्यावे, वक्फ बोर्डाच्या मालमत्तांच्या संरक्षणासह विविध प्रश्नांसाठी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनतर्फे चलो मुंबईचा नारा देत ११ डिसेंबर राेजी सकाळी ७ वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे. वाहनांवर तिरंगा ध्वज लावून शहरासह राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईला जाणार आहेत. मोर्चाचे रूपांतर सभेत होणार आहे. मुंबई येथे पक्षप्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी हे सभेला संबोधित करतील, अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएमने मोर्चा काढू नये यासाठी पोलिस प्रशासनासह सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते प्रयत्न करत होते. त्यामुळे २७ नोव्हेंबर रोजी मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली. आम्हाला मैदानसुद्धा मिळू देत नव्हते, असा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला. काँग्रेस, राष्ट्रवादीला फक्त मुस्लिमांची मते हवी अाहेत. अारक्षणावर काेणीच बाेलत नाही. त्यामुळे अाम्ही माेर्चा काढण्याचे ठरवले अाहे. ११ डिसेंबरला सकाळी ७ वाजता आमखास मैदान येथून किमान ३५० वाहनांना तिरंगा झेंडा लावून कार्यकर्ते मुंबईला रवाना हाेणार आहेत, असा दावा इम्तियाज यांनी केला.मराठा आरक्षणासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या काकासाहेब शिंदे यांच्या कायगाव येथील पुतळ्याला अभिवादन करून पुढे मुंबईला जाणार असल्याचे खासदार इम्तियाज म्हणाले. राज्यातून कार्यकर्ते मुंबईला पोहोचणार अाहेत. माेर्चाला परवानगी मिळाली का, याविषयी स्पष्टीकरण दिले नाही. तसेच सभा काेठे हाेणार, याविषयी खुलासा केला नाही. या वेळी जिल्हाध्यक्ष समीर अब्दुल साजिद, शहराध्यक्ष शारेक नक्षबंदी, चंद्रभान पारखे आदींची उपस्थिती होती.
खा. सुप्रिया सुळे मुस्लिम आरक्षणाविषयी गप्प का?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या मराठा, ओबीसी आरक्षणाविषयी सभागृहात आक्रमक भूमिका घेतात. उलट मुस्लिमांना न्यायालयाने आरक्षण देण्याचे मान्य करूनही राज्य शासन ते देत नाही. त्यावर सुळे प्रश्न का उपस्थित करत नाहीत, असा सवाल इम्तियाज यांनी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.