आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:शहरामधील छोट्या व्यावसायिकांच्या गळ्याभोवती ‘नंबर’ सावकारीचा फास, दरमहा 2 कोटींची उलाढाल

औरंगाबाद / नामदेव खेडकर | ९९२२८९३३५८13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
सावकार मंडळींकडून अशा प्रकारच्या डायऱ्या कर्जदारांच्या गाड्यांवर ठेवल्या जातात. दररोज पैसे जमा केल्याच्या नोंदी त्यामध्ये घेतल्या जातात. - Divya Marathi
सावकार मंडळींकडून अशा प्रकारच्या डायऱ्या कर्जदारांच्या गाड्यांवर ठेवल्या जातात. दररोज पैसे जमा केल्याच्या नोंदी त्यामध्ये घेतल्या जातात.

शहरात छोटे व्यावसायिक अवैध खासगी सावकरीच्या जाळ्यात ओढले जात आहेत. फळविक्रेते, हातगाडीवर कपडे विकणारे, पानटपरीचालक आणि इतर छोट्या व्यापाऱ्यांच्या गळ्याला हा सावकारीचा फास लागला आहे. नंबर पद्धतीने चालणाऱ्या या सावकारीमध्ये व्याजदरही भरभक्कम आहे. मुद्दल ७० हजार रुपये देऊन १०० दिवसांत रोज एक हजार रुपये याप्रमाणे सावकार मंडळी तब्बल १ लाख रुपये वसूल करत आहेत. विशेष म्हणजे ज्यांची ओळख नाही अशा लोकांना कर्ज देताना तारण म्हणून सोने, मोटारसायकलची इसारपावती, चेक आदी घेतले जाते.

औरंगाबाद शहरात या पद्धतीच्या सावकारीतून दरमहा २ कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती आहे. ही सावकारी पूर्णपणे नंबर पद्धतीवर चालते. ‘मला ५ नंबर पाहिजे’ असे एखादा व्यावसायिक म्हणाला की त्याला ३५ हजार रुपये देऊन १०० दिवसांत रोज पाचशे याप्रमाणे ५० हजार रुपये वसूल करायचे. ५ नंबर म्हणजे रोजचे पाचशे आणि १०० दिवसांनी ५० हजार रुपये, असे हे गणित आहे. कोडवर्ड म्हणून “नंबर’ हा शब्द वापरला जातो.

सात हजार घेतले, १० हजार दिले
अशोक नावाचा तरुण कोरोनाच्या आधी औरंगाबाद शहरात अंडा ऑम्लेटचा गाडा लावत होता. कोरोनामुळे त्याचा व्यवसाय ठप्प झाला. घर चालवण्यापुरतेही पैसे राहिले नाही. त्यामुळे ऑक्टोबर २०२० मध्ये त्याने मध्यस्थाच्या मदतीने एका सावकाराकडून ‘नंबर’ पद्धतीचे कर्ज घेतले. कर्ज घेताना हा सावकार थेट ओळखीचा नव्हता. त्यामुळे त्याने ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी गहाण ठेवली. ‘एक नंबर’ घेताना त्याला सावकाराने सात हजार रुपये दिले. १०० दिवसांत त्या सात हजाराचे रोज शंभर रुपये याप्रमाणे १० हजार रुपये परत केले. सर्व पैसे परत केल्यानंतर सोन्याची अंगठी त्याला परत मिळाली.

लॉकडाऊनमध्ये धंदे बसले, मध्यस्थ बुडाला
नारळीबाग भागातील रमेश सुरुवातीला स्वतः व्याजाने पैसे घ्यायचा आणि हातगाडीवर कपडे विकून पैशांची परतफेड करायचा. सावकारासोबत चांगली ओळख झाली. नेहमी ऊठबस सुरू होती. सावकाराने त्याला ‘मध्यस्थ’ होण्याचा सल्ला दिला. सावकाराकडून १ नंबर म्हणजे १० हजार रुपये परतफेडीच्या बोलीवर ८ हजार घ्यायचे आणि प्रत्यक्ष कर्ज घेणाऱ्याला त्या आठ हजारांतील सात हजार कर्जाऊ देऊन १०० दिवसांत १० हजार वसूल करायचे, अशी ही पद्धत होती. म्हणजे त्याला एक नंबरच्या एका व्यवहाराला एक हजार रुपये कमिशन मिळू लागले. हळूहळू छोट्या व्यावसायिकांत त्याचे चांगले नाव झाले. त्याने कोरोनाच्या आधी जवळपास पाच लाख रुपये वाटप केले आणि लॉकडाऊन लागला. त्या वेळी कर्ज घेतलेले काही जण गावी निघून गेले. काहींचा तपासच लागला नाही. या व्यवहारात रमेश तीन लाख रुपयांनी बुडाला. कर्जदार पळून गेले तरी त्याला स्वतःच्या खिशातून तीन लाख रुपये सावकाराकडे जमा करावे लागले. आता रमेशने हा व्यवसाय सोडून दिला.

पैसे नसतील तर ५० % दंड
या व्यवहारात रोज पैसे परतफेड करावेच लागतात. समजा १०० रुपये रोजचा हप्ता असेल आणि एखाद्या वेळी पैसे नसतील तर ५० रुपये दंड द्यावा लागतो. हा दंड व्याजात किंवा मुद्दलमध्ये गणला जात नाही. ज्या दिवशी दंड भरला त्यादिवशीचा पूर्ण हप्ता दुसऱ्या दिवशी भरवाच लागतो.

कोण आहेत हे सावकार?
छोट्या व्यवसायातून हाताशी पैसा आलेले आणि राजकीय पक्षांशी निगडित गुंड प्रवृत्तीचे लोक अशा प्रकारे सावकारीचा व्यवसाय करत आहेत. गुलमंडी, नारळीबाग, शिवाजीनगर, राजाबाजार, शहागंज, गांधीनगर, पैठण गेट, अंगुरीबाग, कुंभारवाडा, औरंगपुरा, खडकेश्वर या भागात सावकार आणि माध्यस्थांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

अशी चालते वसुली
हातगाडीवर व्यवसाय करणारे एक किंवा दोन नंबर घेतात. एक नंबरला सात हजार रुपये तर दोन नंबरला १४ हजार रुपये सावकार देतो. २ नंबर घेतलेला असेल तर रोज दोनशे रुपये याप्रमाणे १०० दिवसांत २० हजार रुपये सावकाराकडे परत करावे लागतात. वसुलीसाठी प्रत्येकाची खास माणसे आहेत. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वसुली करणारी मुले गाड्यावर जातात. गाडी मालकाकडे एक साधी डायरी ठेवलेली असते. पैसे घेऊन त्या डायरीत तारीख, नंबर लिहून समोर सही करून निघून जातात.

बातम्या आणखी आहेत...