आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी लक्षवेधी:दुसरी लाट ओसरतेय, मराठवाड्यातील 6 जिल्ह्यांत 25 हजारांवर बेड रिकामे

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दीड महिन्याआधी मिळत नव्हते बेड, आता सर्वत्र उपलब्धता
  • अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही वेगाने घटली; पॉझिटिव्हच्या तुलनेत डिस्चार्ज अधिक

मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हचा आकडा सातत्याने कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र निर्माण होत आहे. मार्च ते मेदरम्यान विभागात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला. पण आता हळूहळू कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याच्या मार्गावर आहे. अगदी दीड महिन्याआधी ऑक्सिजन बेड मिळवण्यासाठी सर्वत्र धावपळ सुरू होती. पण सद्य:स्थितीत आठही जिल्ह्यांमध्ये बेडही रिकामे राहत आहेत. ऑक्सिजन व साधारण बेड मिळून आजघडीला मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांमध्ये तब्बल २५ हजार ८४२ बेड रिकामे आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मराठवाड्यालाही मोठ्या प्रमाणात फटका बसला. दरदिवशी पॉझिटिव्ह आढळणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने बेड मिळवण्यासाठी रुग्णांची धावपळ सुरू होती. परंतु या महिन्यात मात्र काही प्रमाणात दिलासा मिळालेला दिसतो. रुग्ण डिस्चार्ज होण्याचे प्रमाण अधिक असल्याने रिकाम्या बेडची संख्या सर्वच जिल्ह्यात अधिक आहे. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता गाफील न राहता प्रशासन व शासनाच्या स्तरावर योग्य त्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. मागील महिन्याचा विचार करता बीड जिल्ह्यात साधारण व ऑक्सिजनचे बेड फुल्ल होते. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात बेडची संख्या वाढवावी लागली होती.

आता या महिन्यात मात्र तब्बल पाचपटीने रुग्णसंख्या कमी आहे. परभणी जिल्ह्यात ३ जून रोजी २६०१ साधारण व ५०५ ऑक्सिजन बेड रिकामे होते. हिंगोलीतही मागील महिन्यात सर्वच बेड भरलेले होते. नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यातही आता रिकाम्या बेडची संख्या अधिक आहे. ४ मेच्या तुलनेत जालन्यात ४ जूनला रुग्णसंख्या २२९ ने कमी झाली. म्हणजेच एक महिन्याआधी ३०६ कोरोनाबाधित आढळले होते. या महिन्यात हा आकडा ७७ पर्यंत खाली आला आहे.

त्रिसूत्रीमुळे कोरोना आला नियंत्रणात
ट्रेसिंग, टेस्टिंग व ट्रीटमेंट या त्रिसूत्रीची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे रुग्णांवर तातडीने उपचार करता आले. परिणामी रुग्ण बरे होण्यास मदत झाली. जिल्ह्याबरोबरच तालुका स्तरावरही कोविड केअर सेंटर सुरू करून ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली. आवश्यक तज्ज्ञ मनुष्यबळ भरती करून त्या-त्या ठिकाणी नियुक्त्या दिल्या व उपचार सुरू केले. यासोबतच कोरोनाबाबत जागृती झाल्यामुळे नागरिकांनीही नियमांचे पालन केले व सध्याही करत आहेत. याचा एकत्रित परिणाम म्हणून कोरोनाचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर १.५३ टक्के, रिकव्हरी दर ९६.५३ टक्के तर मृत्युदरही १.६९ टक्क्यापर्यंत आला. यापुढेही नागरिकांनी अशीच दक्षता घ्यावी, कोरोना नक्कीच हरेल. डॉ. अर्चना भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक, जालना

बातम्या आणखी आहेत...