आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Marathvada Water Grid Project Updates: In The First Phase, Aurangabad, Beed, Osmanabad, Latur Districts; Final Decision At The Cabinet Meeting; News And Live Updates

मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्प:पहिल्या टप्प्यात औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्हे; अंतिम निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वीलेखक: प्रवीण ब्रह्मपूरकर
  • कॉपी लिंक
  • फडणवीसांच्या काळात इस्रायलच्या मदतीने बनला होता डीपीआर

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील मराठवाडा वॉटरग्रीड योजनेला लावलेला अडसर काढण्याची तयारी उद्धव ठाकरे सरकारने सुरू केली आहे. त्यात पहिल्या टप्प्यात औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्हे असतील. याविषयी मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम निर्णय होईल. दरम्यान, या संभाव्य निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा माजी पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकरांनी दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी मुंबईत आढावा बैठक झाली. त्यात सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या सरकारच्या काळात निविदा काढण्यापर्यंत हालचाली झाल्या. इस्रायलच्या मदतीने डीपीआरही तयार झाला. मात्र महाविकास आघाडीचे सरकार आले आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी योजनेसाठी इतकी वीज कुठून आणायची, असे म्हणत ग्रीडला अडगळीत टाकले.

कोकणातून पाणी आणा : जलसंपदाचा अहवाल
याप्रकरणी जलसंपदा विभागाच्या अहवालात म्हटले होते की, स्रोत बळकटीसाठी कोकणातून, वैतरणासह अन्य प्रकल्पांतील पाणी आणून जायकवाडी धरण दरवर्षी शंभर टक्के भरण्याचे नियोजन करावे. उजनीतूनही पाणी मिळावे. असे केले नाही तर जिल्हा- जिल्ह्यांमध्ये वाद होतील, असे म्हटले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी झालेल्या बैठकीत औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर, पैठण तालुक्यांना तसेच बीड, लातूर जिल्ह्यांना जायकवाडीतून, उस्मानाबाद जिल्ह्यासाठी उजनीतून ग्रीड प्रस्तावित करणे शक्य आहे, याविषयी सकारात्मक चर्चा झाली. २०४० मध्ये पैठण तालुक्याची लोकसंख्या ५ लाख ६६ हजार ५७९ गृहीत धरून ४२ किमीच्या जलवाहिनीतून दररोज २९.६६ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करणे प्रस्तावित आहे.

वैजापूर, गंगापूरची लोकसंख्या २०४० मध्ये ११ लाख २७ हजार ४९९ गृहीत धरून १३३ किमी जलवाहिनीतून दररोज ६८.४० दशलक्ष लिटर पाणी देणे प्रस्तावित आहे. आष्टी, पाटोदा, शिरूर कासार (जि. बीड) या टंचाईग्रस्त तालुक्यांसाठी स्वतंत्र उद्भव, २५२ किमी जलवाहिनी घेण्याचेही योजनेत म्हटले आहे. या तालुक्यांची २०४०मधील लोकसंख्या ७ लाख ४२ हजार ७४४ गृहीत धरून दररोज ४७.९४ दशलक्ष लिटर पाणी लागेल. जायकवाडीत पाणी नसेल तर लातूर, बीडसाठी माजलगाव, मांजरा, ऊर्ध्व मानार इथून पाणी उचलणे अपेक्षित आहे. बीड, लातूर जिल्ह्याच्या संभाव्य ७१ लाख ८१ हजार ९९९ लोकसंख्येस ६७९ दशलक्ष लिटर पाणी लागेल. उस्मानाबादच्या संभाव्य २२ लाख ६७ हजार ९७७ लोकसंख्येस लागणारे २१० दशलक्ष लिटर पाणी उजनी, सीना कोळेगाव, निम्न तेरणातून उचलावे लागेल. उस्मानाबाद शहरासाठी ५० दललि उजनी धरणातून घ्यावे लागेल.

किमान पिण्याच्या पाण्याची हमी
या योजनेतून मराठवाड्याला किमान पिण्याच्या पाण्याची हमी मिळेल. त्यामुळे ती रद्द करू नये. योजनेत नाशिक जिल्ह्यातील मराठवाड्याच्या हक्काची चार धरणे जोडली पाहिजेत, तरच पाणी उपलब्ध होईल. - शंकरराव नागरे, जलतज्ज्ञ

केवळ चर्चा, बैठकांचे ढोंग
या सरकारला कुठलेही टप्पे पूर्ण करायचे नाहीत. केवळ चर्चा, बैठकांचे ढोंग आहे. मंत्र्यांच्या मतदारसंघातील गावांच्या योजना करण्याचा यांचा प्रयत्न आहे. योजनेवर एक रुपयाचाही खर्च केला नाही. याविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. - बबनराव लोणीकर, माजी पाणीपुरवठामंत्री

काय आहे योजना
१०,५९५ कोटी रुपये खर्चून ११ धरणांतील २२ टीएमसी पाणी १३३० किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीने जोडून सिंचन, पिण्यासाठी वापरायचे, अशी ही योजना आहे. यात जायकवाडी, येलदरी, सिद्धेश्वर, दुधना, माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा, मानार, विष्णुपुरी, सीना कोळेगाव, इसापूर, उजनी धरणाचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...