आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा उद्रेक:मराठवाड्यात कोरोनाचे तब्बल 19 बळी, बाधितांची संख्या आता 15 हजारांच्या दिशेने

औरंगाबाद2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लातुरात रुग्णांचे 8 वे शतक पूर्ण, जालन्यातील संचारबंदी वाढवली

मराठवाड्यात बुधवारी काेराेनाने आणखी १९ बळी घेतल्याने मृत रुग्णांची संख्या ५४२ तर एकूण बाधितांची संख्या १३५०८ इतकी झाले आहे. बुधवारी जालना जिल्ह्यात ४, नांदेड जिल्ह्यात ३, उस्मानाबाद जिल्हा ३, औरंगाबाद जिल्हा ६ तर लातूर जिल्ह्यात ३ रुग्णांचा बळी गेला अाहे. परभणी जिल्ह्यात १२, उस्मानाबाद १३, औरंगाबाद ३७९, नांदेड ४२, बीड १९ आणि जालन्यात ३ नवीन रुग्ण सापडले आहेत.

नांदेड : तीन रुग्णांचा मृत्यू, ४२ नवे रुग्ण

नांदेड जिल्ह्यात कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून संचारबंदी लावण्यात आली. परंतु कोरोनावर या संचारबंदीचा कोणताही परिणाम झाल्याचे दिसत नाही. बुधवारी जिल्ह्यात कोरोनामुळे ३ जणांचा मृत्यू झाला तर नव्याने ४२ रुग्ण आढळून आले. शहरातील एका वृत्तपत्राच्या दोन प्रतिनिधींनाही कोरोनाने बाधित केले आहे.

बिलोली तालुक्यातील कासराळी येथील ६२ वर्षीय महिलेचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला. देगलूर येथील ५८ वर्षीय पुरुष व कंधार येथील ४६ वर्षीय महिलेचा बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या रुग्णांना उच्च रक्तदाब, मधुमेह, श्वसनाचे आजार होते. या तीन मृत्यूमुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ३९ झाली. जिल्ह्यात कोरोनाचे नवे ४२ रुग्ण आढळून आले. या रुग्णांत ११ महिलांचा समावेश आहे. सध्या जिल्ह्यात २८१ रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातील १२ महिला व १२ पुरुष अशा २४ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. बुधवारी पंजाब भवन, मुखेड कोविड केअर सेंटर, मेडिकल काॅलेज व औरंगाबाद येथील दाेघांसह २२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना मुक्त रुग्णांची संख्या ४१२ झाली.

दोन पत्रकारही बाधित : बुधवारी शहरातील एका वृत्तपत्राच्या दोन प्रतिनिधींचा कोरोना अहवाल पाँझिटीव्ह आला. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार, माजी महापौर, नगरसेवक, भाजपचे जिल्हा अध्यक्ष हे कोरोनाग्रस्त झाले. आता शहरातील दोन पत्रकारही कोरोनाच्या गर्तेत आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

परभणी : संचारबंदीतही १२ रुग्णांची वाढ

गेल्या सहा दिवसांपासून संचारबंदी सुरू असतानाही जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. बुधवारी १२ रुग्ण पॉझिटिव आले. त्यामुळे रुग्णसंख्या ३०२ वर पोहोचली आहे. दरम्यान बुधवारी ११ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतल्याने बरे झालेल्या रुग्णांची संख्या १४९ इतकी आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्याची संख्या आठ असून जिल्हा रुग्णालयात व तालुक्यांच्या ठिकाणी कोरोना कक्षात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १४५ आहे. बुधवारी परभणी शहरात ७ रुग्ण बाधित आढळून आले. संसर्गापासून दूर असलेल्या पालम तालुक्याील सावंगी भुजबळ या गावात ४५ वर्षीय पुरुष कोरोनाबाधित आढळून आला.

लातूर : रुग्णसंख्या ८०० पार, ३ मृत्यू

लातूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ८०० वर पोहाेचली आहे. जिल्ह्यात सध्या ३३८ रुग्णांवर उपचार सुरू असून ४२२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर कोरोनाबाधित ४० जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री तीन रुग्णांचा मृत्यू झाला अाहे. मंगळवारी रात्री लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या लातूर शहरातील राम गल्ली भागातील ७० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर निलंगा येथील ६५ वर्षीय व्यक्तीचा णि ५२ वर्षीय महिलेचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या आता ४० वर पोहोचली आहे.

जालना : चार रुग्णांचा मृत्यू, नव्याने ३ रुग्ण वाढले

जालना जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या वाढतच असून बुधवारी पुन्हा चौघांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे कोरोना बळींचा आकडा ४९ वर गेला आहे. तर दिवसभरात तिघांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने बाधितांची संख्या ११०२ झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ५ ते १५ जुलैपर्यंत लागू केलेल्या संचारबंदीस २० जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना आणखी पाच दिवस घरातच बसावे लागणार असून यामुळे कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होईल, असा दावा जिल्हा प्रशासनाकडून केला जात आहे.

जालना शहरातील रामनगर येथील ६५ वर्षीय वृद्धास श्वसन, मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्यामुळे १२ जुलै रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना दुसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वाजता या रुग्णाचा मृत्यू झाला. तर स्वॅब नमुन्यांचा अहवाल बुधवारी कोरोना पाॅझिटिव्ह आला. भावसार गल्लीतील ३५ वर्षीय पुरुषास श्वसन, न्यूमोनियाचा त्रास होत असल्यामुळे ९ जुलै रोजी दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याचा १५ जुलै रोजी सकाळी ७.३० वाजता मृत्यू झाला. हा रुग्णही पॉझिटिव्ह आला. इंदिरानगरातील ५६ वर्षीय महिलेस श्वसन, न्यूमोनियाचा त्रास होत असल्यामुळे ११ जुलै रोजी दाखल केले होते. उपचार सुरू असताना १३ जुलै रोजी पहाटे १.४० वाजता सदर महिलेचा मृत्यू झाला. तर कोरोनाचा अहवाल १५ जुलै रोजी पॉझिटिव्ह आला. तसेच भोकरदन तालुक्यातील धावडा येथील ४८ वर्षीय पुरुष रुग्णास श्वसन, न्यूमोनिया, उच्च रक्तदाब व मधुमेहाचा त्रास होत असल्यामुळे १२ जुलै राेजी दाखल केले होते. उपचारादम्यान सदर रुग्णाचा १४ जुलै रोजी मृत्यू झाला. तर १५ जुलै रोजी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला,

बातम्या आणखी आहेत...