आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात कहर:औरंगाबादच्या 79 रुग्णांसह 2 दिवसांत मराठवाड्यात वाढले तब्बल 141 रुग्ण

औरंगाबाद2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • नांदेडमध्ये एकाच दिवसात 20 पॉझिटिव्ह, हिंगोलीचा आकडा 52 वर

मराठवाड्यात कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत चालला आहे. औरंगाबादनंतर हिंगोली व नांदेड हे हॉटस्पॉट ठरत आहेत. विभागात दोन दिवसांत तब्बल १४१ नवीन रुग्ण आढळले आहेत. शनिवारी नांदेडमध्ये २० संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्हा रेड झोनमध्ये गेला आहे. हिंगोलीत २ दिवसांत तब्बल ३२ नवे रुग्ण आढळल्याने येथील बाधितांची संख्या ५२ झाली आहे. यात एकट्या राज्य राखीव दलाच्या जवानांची संख्या ४७ आहे.

जालन्यात शुक्रवारी ५, लातूरच्या उदगीरमध्ये १ रुग्ण आढळल्याने अौरंगाबाद वगळता मराठवाड्यातील रुग्णांचा आकडा ९३ वर गेला आहे. यामुळे ग्रीन होत जाणारा मराठवाडा आता परत रेड झोनच्या मार्गावर आहे. बीड आणि परभणीत अद्याप एकही रुग्ण नसला तरी प्रशासन सतर्क झाले आहे.

उस्मानाबाद : ३ रुग्ण बरे झाल्यानंतर एकही रुग्ण नसतानाच सोलापूरमध्ये तैनात एका पोलिसाला कोरोना झाल्याने उस्मानाबाद प्रशासनावरील ताण वाढला आहे. हा कर्मचारी उस्मानाबाद तालुक्यातील चिखलीचा असून २४ तारखेला तो गावी येऊन गेला होता. प्रशासनाने त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना क्वॉरंटाइन केले आहे.

नांदेड जिल्ह्यामध्ये आजवर दोघांचा मृत्यू

शनिवारी गुरुद्वारा लंगरसाहिबमध्ये कार्यरत २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. एकूण रुग्णांची संख्या आता २६ झाली. २ जणांचा मृत्यू झाला आहे. लंगरसाहिब परिसरात कार्यरत ९७ जणांचे स्वॅब गुरुवारी व शुक्रवारी घेतले होते. त्याचा अहवाल शनिवारी सकाळी आला. २० जण बाधित आढळले.

नांदेडच्या गुरुद्वाराहून पंजाबमध्ये परतलेले २१५ भाविक पॉझिटिव्ह, संसर्गावरून वाद

चंदिगड/ मुंबई |कोरोनावरून पंजाब आणि महाराष्ट्रात वाद विकोपाला गेला आहे. नांदेडच्या गुरुद्वारासाहिबहून पंजाबमध्ये परतलेल्या ३,५०० शीख भाविकांपैकी ९१ नव्या रुग्णांसह आतापर्यंत २१५ भाविकांना काेरोना संसर्ग झाला आहे.

महाराष्ट्र : सर्वांचीच तपासणी केली होती

महाराष्ट्रातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हे आरोप फेटाळत सांगितले की, येथे प्रत्येक भाविकाची तपासणी केली होती. सर्वांमध्ये लक्षणे दिसत नव्हती. त्यांना रस्त्यात कोरोना संसर्ग झाला असावा. कारण, ते रस्त्याच्या मार्गाने अनेक हॉटस्पॉटमधून गेले होते.

पंजाबचा आरोप : भाविक चाचण्यांविना पाठवले

आरोग्यमंत्री बलबीरसिंह सिद्धू यांनी आरोप केला की, ‘महाराष्ट्रातून भाविकांना पाठवण्याआधी त्यांच्या चाचण्या न करता केवळ स्क्रीनिंग करून पंजाबला पाठवण्यात आले. सरकारने आम्हाला यासंदर्भात सांगितले असते तर आम्ही परत आणण्यापूर्वी वैद्यकीय पथक पाठवून चाचण्या घेतल्या असत्या.’

लातूर : उदगिरात आणखी एक रुग्ण

लातूर जिल्ह्यातल्या उदगीर येथे शुक्रवारी आणखी एकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे उदगीरमधील पूर्वीचे ७ आणि नवा एक असे आता ८ कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. सर्वच रुग्ण मागील शनिवारी कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबातील आहेत.

जालना : ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

जिल्हा रुग्णालयात ३० एप्रिलला भरती झालेल्या ५ जणांचा अहवाल शुक्रवारी रात्री पॉझिटिव्ह आला. यात एसआरपीएफचे ४ जवान, तर परतूर तालुक्यातील सातोन्यातील एका कामगाराचा समावेश आहे. सध्या हे पाच जण व पारधच्या एका १७ वर्षीय युवतीवर उपचार सुरू आहेत.

हिंगोली : दोन दिवसांत ३२ रुग्ण

हिंगोली येथील एसआरपीएफच्या आणखी २६ जवानांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णसंख्या ५२ वर गेली आहे. दरम्यान, शनिवारी पाच जवान व जांभरूण राेडगे येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. उच्च रक्तदाब असलेल्या ४ जवानांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठवले आहे

बातम्या आणखी आहेत...