आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंता वाढली:नांदेड-उस्मानाबादेत तिप्पट, जालन्यात दुप्पट रुग्णवाढ; औरंगाबाद जिल्ह्यात 103 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली : जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जि.प.सीईओ संजय दैने यांनी शासकीय रुग्णालयात पाहणी करून आढावा घेतला. - Divya Marathi
हिंगोली : जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जि.प.सीईओ संजय दैने यांनी शासकीय रुग्णालयात पाहणी करून आढावा घेतला.

देश व राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरुवात झाल्याची भीती व्यक्त होत असताना मराठवाड्यातही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. नवीन वर्षात गेल्या चार दिवसांमध्ये नांदेड, उस्मानाबादमध्ये तिप्पट, जालन्यात दुप्पट तर परभणी, हिंगोलीतही हळूहळू पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. त्या अनुषंगाने आरोग्य विभाग व प्रशासनाकडून उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. तपासणी वाढवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातही मंगळवारी १०३ रुग्ण आढळून आले. यात शहरात ८७ तर ग्रामीणमध्ये १६ रुग्णांची भर पडली आहे.

हिंगोली : सध्या दहा जणांवर उपचार सुरू
मागील सहा महिन्यांनंतर कोरोना रुग्णांनी दोन आकडी संख्या गाठली आहे. मंगळवारी जिल्ह्यात तीन रुग्ण आढळले. सध्या दहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील तीन दिवसांपासून कोविडचे रुग्ण वाढत असल्याने आता नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे झाले आहे. आज हिंगोलीत १ तर वसमत येथे दोन रुग्ण आढळून आले आहेत.

जालना : १२ रुग्ण वाढले, ३ डिस्चार्ज
जिल्ह्यात नवीन वर्षात रुग्णांच्या संख्येत वाढ नोंदवली जात आहे. १ जानेवारीला ५ रुग्ण होते. २ रोजी १४, ३ जानेवारीला १४ व मंगळवारी १२ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. मृत्यू मात्र एकही नाही. मंगळवारी तिघांना रुग्णालयातून सुटी मिळाली. सध्या ५४ जणांवर उपचार सुरू आहेत.

उस्मानाबाद : सहा दिवसांपासून वाढ
मागील आठवड्यापर्यंत जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ५ रुग्ण आढळत होते. गेल्या ६ दिवसांपासून यात सातत्याने वाढ होत आहे. २९ डिसेंबरला १९, ३० रोजी १६, ३१ डिसेंबरला ९ रुग्ण आढळले होते. १ जानेवारीला २१ रुग्ण होते. सोमवारी १८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. जिल्ह्यात आतापर्यंत ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या पाचवर आहे.

परभणी : १ दिवसात दुप्पट रुग्णवाढ
मंगळवारी १३ पॉझिटिव्ह आढळले. तर दोन जणांची रुग्णालयातून सुटी झाली. सध्या ६२ कोरोनाबाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात ३० डिसेंबरला ७ नवे रुग्ण आढळले होते. ३१ रोजी ६ रुग्ण होते. १ जानेवारीला हा आकडा दहावर गेला. २ रोजी १०, आणि ३ जानेवारीला ६ रुग्ण आढळले. परभणीकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

बीड : दहा कोरोना रुग्णांची पडली भर
जिल्ह्यात १९ डिसेंबर ते ४ जानेवारी या १५ दिवसांत पॉझिटिव्हिटी रेट एकच्या आत आहे. १ जानेवारीला केवळ चार रुग्ण आढळले. २ राेजी ही संख्या सहावर पाेहाेचली. ३ जानेवारीला एकही बाधित आढळला नाही. ४ जानेवारीला दहा जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

नांदेड : २९ रुग्णांची जिल्ह्यात झाली वाढ
आतापर्यंत दहाच्या आत असलेली रुग्णसंख्या मंगळवारी (ता.४) अचानक वाढली. ८१२ चाचण्यांमध्ये २९ पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे चिंता वाढली आहे. यापूर्वी ओमायक्रॉनचे तीन रुग्ण आढळूनही नागरिक विनामास्क बिनधास्त फिरत आहेत. दुसऱ्या लाटेत नांदेडमध्ये प्रचंड रुग्णसंख्या होती. अनेकांना जीवही गमवावा लागला. एकीकडे ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असताना कोरोना रुग्ण आढळत असल्याने भीती व्यक्त होत आहे. मंगळवारी आढळलेल्या २९ पॉझिटिव्हपैकी मनपा हद्दीतील २१ रुग्ण आहेत. जिल्ह्यात १ जानेवारीला ८ रुग्ण होते. २ रोजी ९, ३ तारखेला १० रुग्ण आढळले. पण ४ रोजी अचानक २९ रुग्णसंख्या नोंदवली गेली. आजघडीला ५९ रुग्ण उपचार घेत आहेत. २ बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. रुग्णवाढ होत असल्याने प्रशासनाकडून सर्व सोयी-सुविधांचा आढावा घेतला जात आहे.

मास्क, सॅनिटायझर वापरा, लसीकरण करा
ओमायक्रॉनचे रुग्ण मराठवाड्यात आढळत आहेत. अशातच पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही वाढत आहे. पहिल्या, दुसऱ्या लाटेत आपणाला मोठी किंमत मोजावी लागली. पण मास्क, सॅनिटायझरचा वापर करून कोरोनापासून वाचू शकतो. शिवाय ज्यांनी लस घेतली नसेल त्यांनी ती आवर्जून घ्यावी.

बातम्या आणखी आहेत...