आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंडे पॉझिटिव्ह:प्राणवायूबाबतीत मराठवाडा आत्मनिर्भर; 324 केएल ऑक्सिजनची उपलब्धता

औरंगाबाद / प्रवीण ब्रह्मपूरकरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यात औरंगाबादमध्ये १५ मार्च राेजी पहिला काेराेना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर एकच खळबळ माजली हाेती. त्यानंतर काहीच दिवसांत ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली. नांदेडमध्ये तर आॅक्सिजन, व्हेंटिलेटरअभावी प्राण गमावल्याची घटनाही घडली. यातून धडा घेऊन गतीने उपाययाेजना केल्या गेल्या आणि वर्षभरात मराठवाडा ऑक्सिजनच्या बाबतीत आत्मनिर्भर झाला. मराठवाड्यात सध्या ३१ टँकच्या माध्यमातून ३२४ किलाेलिटर (केएल) ऑक्सिजन उपलब्ध असून त्यासाठी २६ टँक बसवण्यात आले आहेत. आणखी ५ आॅक्सिजन टँकचे काम सुरू आहे.

ऑक्सिजन नसल्याने ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात रुग्णांना त्रास सहन करावा लागला. घाटीत ऑक्सिजन टँकर उशिरा आल्याने प्रशासनाची धावपळ झाली. पण आता घाटीत सर्वाधिक २३ केएलचे ६ टँक तसेच १० केएलचा एक टँक असे ३३ केएलचे ऑक्सिजन टँक बसवले. आणखी एका १० केएल ऑक्सिजन टँक बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे. मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्येदेखील १० केएलचे दोन टँक बसवले जात आहेत. जिल्हा रुग्णालयात १३ केएलचा टँक बसवण्यात येईल. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक ८६ केएलचे टँक बसवण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.

विभागीय आयुक्तांनी केला पाठपुरावा
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत ऑक्सिजन टँक बसवण्यासाठी पाठपुरावा केला. त्यासाठी वीणा सुपेकर (उपायुक्त) यांनीही प्रयत्न केले. परभणीतही ऑक्सिजन टँकची व्यवस्था उभी केल्याने ऐनवेळी होणारी धावपळ थांबल्याची माहिती परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली. बीडसारख्या ग्रामीण भागात ऑक्सिजन टँकची व्यवस्था झाल्यामुळे कायमची समस्या सुटल्याचे अंबाजोगाई येथील अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी म्हटले.

बीड, लातूर, जालना, परभणी, हिंगोलीत उभारले टँक
- लातूरमध्ये वैद्यकीय महाविद्यालयात १० केएल, नांदेडमध्ये जिल्हा रुग्णालयात १३ केएल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १० केएल, बीड जिल्हा रुग्णालयात १० केएलचा एक, अंबाजोगाई शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व लोखंडी सावरगाव येथे प्रत्येकी एक १० केएलचे टँक बसवले आहे.
- उस्मानाबादमध्ये १० केएलचा एक, परभणी जिल्हा रुग्णालयत २० केएल, जिल्हा परिषद १० केएल आणि परभणी आयटीआयमध्ये २० केएलचा एक टँक बसवण्यात आला आहे.
- हिंगोली जिल्ह्यात हिंगोलीत १३ केएल, वसमत १० केएल, कळमनुरी १३ केएल, डीसीएच हिंगोली येथे १३ केएलचा टँक बसवण्यात आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात १० केएल, घाटी १० केएल, मेल्ट्रॉन येथे १० केएलचे २ टँक, औरंगाबाद जिल्हा रुग्णालयात १३ केएलचा टँक बसवणे बाकी आहे.

बातम्या आणखी आहेत...