आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन विशेष:‘रझाकारांचा कर्दनकाळ’ ठरलेल्या क्रांतिवीर दत्तोबा भोसलेंनी निजामाच्या तावडीतून मुक्त केली होती तब्बल 274 गावे

औरंगाबाद / विजय बुवाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • असामान्य शौर्य, अद्वितीय धैर्य अन् अथक संघर्षाची कहाणी

मराठवाडा मुक्तिसंग्रामात मोठे योगदान देऊनही अनेक योद्धे, स्वातंत्र्यसेनानी अपरिचित, उपेक्षित राहिले. क्रांतिवीर दत्तोबा भोसले (मातोळकर) हे त्यापैकीच एक. त्या लढ्यात शौर्य आणि धैर्यासोबत आक्रमक नेतृत्वाचे, कुशल रणनीतीचे दर्शन घडवणाऱ्या दत्तोबांनी रझाकारांना अक्षरश: धडकी भरवली होती. उस्मानाबाद, औरंगाबाद, परभणी, नांदेडसह गुलबर्गा आणि रायचूर या जिल्ह्यांतील जवळपास २७४ गावे दत्तोबा आणि त्यांच्या साथीदारांनी निजामाच्या तावडीतून मुक्त केली. त्यांच्या या असामान्य कामगिरीमुळे संपूर्ण मुक्तिसंग्रामालाच तेजाची सोनेरी किनार लाभली.

औसा तालुक्यातील मातोळा येथे एका सामान्य शेतकरी कुटुंबात दत्तोबांचा जन्म झाला. उर्दूतून प्राथमिक शिक्षण घेतल्यावर ते हिप्परगा येथील स्वामी रामानंद तीर्थ यांच्या राष्ट्रीय शाळेत दाखल झाले. तेथून त्यांनी पुढचे शिक्षण सोलापूरच्या हरिभाई देवकरण शाळेत घेतले. या शालेय जीवनात त्यांच्यावर शिक्षणाबरोबरच व्यायाम आणि देशभक्तीचा संस्कार झाला. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते बडोद्याला गेले. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगळेपण ओळखले आणि प्रा. गजानन ताम्हणकर तथा राजरत्न माणिकराव यांच्या वाड्यात त्यांची व्यवस्था केली. राजारामबापू पाटीलही याच महाविद्यालयात शिकत होते. पुढे बापूंनी दत्तोबांना क्रांतिसिंह नाना पाटील यांची ओळख करून दिली आणि इथेच त्यांच्या पुढच्या आयुष्याची दिशा निश्चित झाली.

क्रांतिसिंहांनी दत्तोबांमधील उत्कट राष्ट्रप्रेमाला क्रांतिकारी विचारांची जोड दिली. जुलमी राजवटीविरुद्ध बंडासाठी बॉम्ब बनवण्याच्या प्रशिक्षणासह अन्य मदतही केली. रझाकारांंना नेस्तनाबूत करण्याचे ध्येय घेऊन दत्तोबा मूळ गावी परतले.

शुभ्र घोड्यावर स्वार झालेल्या दत्तोबांनी कधी उघडपणे, तर कधी गनिमी काव्याने लढत रझाकारांना सळो की पळो करुन सोडले. वेशांतर करुन, वाऱ्याच्या वेगाने येऊन विलक्षण चपळाईने हल्ला करुन जाणाऱ्या दत्तोबांची रझाकारांच्या मनात दहशतच निर्माण झाली होती. देवतळ्यातील लढ्यात दत्तोबा आणि त्यांच्या साथीदारांनी तब्बल ११५ रझाकारांना यमसदनी धाडले. नाईचाकूर पोलिस ठाण्यावर हल्ला करुन शस्त्रांची केलेली लूट असो की सेलूमधील निजामाच्या हप्त्याची लूट; दत्तोबांनी निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त करण्यासाठी रात्रंदिवस हरतऱ्हेने लढा दिला.असामान्य शौर्य आणि अद्वितीय धैर्याने अथक संघर्ष करीत दत्तोबा भोसले यांनी मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा नवा अध्याय लिहिला.

अशा वीर योद्ध्यांमुळेच १७ सप्टेंबर १९४८ हा दिवस मराठवाड्यातील जनतेसाठी स्वातंत्र्याची पहाट घेऊन उगवला. हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले. स्वातंत्र्याचे एक युद्ध संपले, पण आता समाजातील दारिद्र्य, अनिष्ट रुढी, जातीयता, निरक्षरता, अंधश्रद्धा यांविरुद्ध लढावे लागेल हे दत्तोबांनी ओळखले. अस्पृश्यता निर्मूलन, स्त्री शिक्षण आणि नव्या पिढीच्या शारीरिक, मानसिक विकासासाठी, विज्ञाननिष्ठा रुजवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. ज्यांच्यावर पोवाडे, शौर्यगीते लिहिली गेली, गावोगावी ती गायिली गेली, त्या दत्तोबांचे मुक्तिलढ्यातील कार्य मात्र नंतरच्या काळात इतिहासाच्या पटलावरुन पुसले गेले. मुक्तिसंग्राम दिन साजरा करताना त्यांच्या समर्पित योगदानाचे आर्वजून स्मरण व्हायला हवे.

मातोळा डेव्हिल ऑन हॉर्सबॅक... नावाचीच दहशत
मुक्तिसंग्रामाच्या काळात उस्मानाबादचे कलेक्टर महंमद हैदर यांनी या बंडावर ‘ऑक्टोबर कूप’ हे पुस्तक लिहिले आहे. हैदर यांनी दत्तोबांचा उल्लेख ‘मातोळा डेव्हिल ऑन हॉर्सबॅक’ असा केला आहे. दत्तोबांची किती दहशत होती, हे यातून लक्षात येते. त्यांचे सहकारी भानुदास कैकाडी, केशवराव चव्हाण, कॅ. जोशी, नाना चिंचोलीकर, वसंत देशमुख, व्यंकटराव पाटील यांचीही नोंद या निमित्ताने घ्यायला हवी. दत्तोबांचे सुपुत्र विवेक भोसले यांनी हा शौर्याचा इतिहास लेखसंग्रहाच्या रूपाने जतन केला आहे.

बातम्या आणखी आहेत...