आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उच्च शिक्षण:मराठवाडा - दर्जेदार उच्च शिक्षणाचे नवे हब

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कला, वाणिज्य आणि विधी शाखांतील दर्जेदार शिक्षणाचे नवे हब म्हणून मराठवाड्याची ओळख बनली आहे. कॉमर्समध्येही फायनान्शियल टेक्नॉलॉजी, आंत्रप्रिन्युअरशिप हे बहुशाखीय विषय आले. विधीमध्ये बौद्धिक संपदा व तंत्रज्ञानाशी संबंधित शिक्षण नव्याने अंतर्भूत झाले. आता पदवी अभ्यासक्रम ४ वर्षांचे असायला हवेत. त्यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना सुरुवातीपासून जागतिक स्तरावरील विद्यापीठांत शिकण्याची संधी मिळेल.

मराठवाडा ही विचार, बुद्धिमत्ता आणि प्रतिभावंतांची खाण आहे. आर्थिकदृष्ट्या मागासलेपणाचे बिरूद मराठवाड्याच्या पाठीशी पूर्वापार चिकटलेले असले तरी बौद्धिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मराठवाडा प्रकर्षाने प्रगतिपथावर आहे. देश-विदेशातील अनेक नामवंत संस्था, कंपनी, सरकारी कार्यालयांमध्ये उच्च पदांवर कार्यरत व्यक्ती असोत की विविध कल्पक, उपयुक्त उत्पादनांचे निर्माते उद्योजक असोत, हे सर्व कुशाग्र मनुष्यबळ मराठवाड्याने निर्माण केले आहे. निजामाच्या राजवटीतून मुक्त झाल्यानंतरच प्रामुख्याने मराठवाड्यातील शैक्षणिक प्रवास अधिक सुलभ झाला. मात्र, तेव्हा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणावरच अधिक भर दिला गेला. त्यातही सुरुवातीच्या काळात उर्दूतून शिक्षण मिळायचे. त्यामुळे भाषिक क्षेत्राव्यतिरिक्त असणाऱ्या संधींमध्ये मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना अधिक स्थान मिळू शकले नाही. १९५८ मध्ये मराठवाड्यात पहिले विद्यापीठ स्थापन झाले. तरीही उच्च शिक्षणात अनेक समस्या होत्याच. १९९० नंतरच मराठवाड्यात अधिक जागरूकता दिसून येते. मात्र, मराठवाड्यात उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांची संख्या अत्यल्प असल्यामुळे, तसेच पुण्या-मुंबईकडील शिक्षणाचे आकर्षण असल्यामुळे येथील विद्यार्थी हा कायमच बाहेरून शिक्षण घेणारा ठरला. मराठवाड्यात सध्याच्या घडीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड ही दोन सार्वजनिक विद्यापीठे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि एमजीएम विद्यापीठ, औरंगाबाद ही विद्यापीठे आहेत. याशिवाय महात्मा गांधी मिशन, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ, एमआयटी, सरस्वती भुवनसारख्या काही संस्था दर्जेदार शिक्षण देत आहेत.

ऑनलाइन, दूरस्थ शिक्षण
काळानुरूप शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले आहेत. काही बदल प्रत्यक्ष शिक्षण पद्धतीत, काही इंडस्ट्रीच्या मागणीनुरूप तर काही कौशल्यांच्या आधारे झाले आहेत. अर्थातच या बदलांचा सामाजिक, आर्थिक आणि अन्य दृष्टिकोनातून उत्तम परिणाम आणि प्रभाव मराठवाड्यावर काळानुरूप झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. मराठवाड्यात सध्या ऑनलाइन शिक्षण तसेच दूरस्थ शिक्षणाची संकल्पना वेगवान झाली. अर्थात हे दूरस्थ शिक्षण तंत्रज्ञानाने सोपे केले. शिक्षण क्षेत्रातील समस्यांवर या काळात मोठे संशोधन, उपाययोजना झाल्या. उच्च शिक्षणाच्या बाबतीत अत्यंत प्रभावी संशोधन झाले आहे.

आर्ट‌्स : अन्य शाखांशी सुसंगत
आता व्हर्च्युअल लॅबोरेटरी किंवा सिम्युलेटर)तसेच मॉडेलिंग तंत्रज्ञानाचा संशोधनासाठी मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. यामुळे संशोधनाची व्याप्ती व गती वाढली. प्रामुख्याने डेटा अॅनालिसिस, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सुरू झाला आहे. आता नव्या शिक्षणानुसार मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना आर्ट‌्स हा केवळ कलाशाखेचा विषय म्हणून पारंपरिक पद्धतीने शिकण्यापुरता राहिला नाही. तर, अन्य विद्याशाखांशी सुसंगत बी.ए. अभ्यासक्रम उच्च शिक्षणात उपलब्ध आहेत. कॉम्प्युटर सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, फायनान्स, डिजिटल मीडिया आदींना याच कलाशाखेच्या पदवी शिक्षणाचा भाग बनवता येऊ शकते. याचा अर्थ आता उच्च शिक्षणात आर्ट‌्स हा विषय अप्लाइड आर्ट‌्सच्या रूपात समोर येत आहे.

कॉमर्समध्येही बहुशाखीय विषय
कॉमर्समध्येही फायनान्शियल टेक्नॉलॉजी, आंत्रप्रिन्युअरशिप हे बहुशाखीय विषय आले आहेत. विधीमध्ये बौद्धिक संपदा आणि तंत्रज्ञानाशी संबंधित शिक्षण नव्याने अंतर्भूत झाले आहेत. एकंदरीतच या सर्व विद्याशाखांमध्ये पुरोगामी विचारांचे, भिन्न स्वरूपाचे अभ्यासक्रम असायला हवेत. आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचे असायला हवेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुरुवातीपासून जागतिक स्तरावरील विद्यापीठांमध्ये शिकण्याची संधी मिळू शकते. आता केवळ विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनीच इनोव्हेशन किंवा रिसर्च करावे असे नाही, तर कला, वाणिज्य किंवा विधी शाखेतील विद्यार्थीही या क्षेत्रात प्रयत्न करू शकतात. अशा शिक्षणाची संधी एमजीएम विद्यापीठासारख्या शैक्षणिक संस्थेत उपलब्ध आहे. मराठवाड्यातील उच्च शिक्षण आता लोकलपासून ग्लोबलपर्यंत पोहोचणारे झाले आहे.

आधुनिक शिक्षण
कला, वाणिज्य किंवा विधीसारख्या विद्याशाखा मराठवाड्यात प्रकर्षाने समृद्ध होताना दिसत आहेत. कारण मराठवाड्यात साहित्य, संस्कृती, भाषा, व्यापार तसेच अन्य पूरक बाबींचा अंतर्भाव आहे. त्यामुळे या शाखांमध्ये येथील विद्यार्थ्यांना प्रगती करण्याची संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मराठवाड्यात कार्यरत असलेल्या सर्व सरकारी, निमसरकारी तसेच खासगी शैक्षणिक संस्थांची आहे. एमजीएम विद्यापीठाने मधल्या काळात विविध अभ्यासक्रमांच्या अनुषंगाने ई-शॉपिंग, ई-बँकिंग, ई-फायनान्स, ई-गव्हर्नन्स अशा एक ना अनेक बाबी उच्च शिक्षणात झालेल्या संशोधनातून अत्यंत प्रभावीपणे अभ्यासक्रमात समाविष्ट केल्या आहेत. याचा थेट लाभ विद्यार्थ्यांना तर होतोच, शिवाय येथील भौगोलिक, सामाजिक तसेच राष्ट्रीय विकासातही होऊ शकतो. मराठवाड्यातील शिक्षण संस्था उच्च शिक्षणात आधीपासून अस्तित्वात असलेल्या संशोधनात्मक बाबी आणि काळाने त्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या संधीची सांगड घालून नवे प्रतिमान उभे करत आहेत. नवे शैक्षणिक धोरण प्रामुख्याने संशोधन, कौशल्य विकासावर भर देणारे आहे.

सर्वसमावेशक प्रयत्न अपेक्षित
उच्च शिक्षणातील विद्यार्थी केवळ पदव्या मिळवण्यापुरता मर्यादित राहू नये तर त्या पदवीसोबत त्यात स्वविकासात्मक, रोजगाराभिमुख कौशल्ये विकसित व्हावी, हा या धोरणाचा हेतू आहे. त्यासाठी सरकार, शैक्षणिक संस्था, प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालक या सर्वच घटकांकडून सर्वसमावेशक प्रयत्न अपेक्षित आहेत. मराठवाड्याला अधिक समृद्ध बनवण्यासाठी उच्च शिक्षणातील नवे प्रयोग आणि संधी अधिक प्रगल्भ व्हाव्या लागतील आणि त्यासाठी सर्वांचेच प्रयत्न गरजेचे आहेत.

उच्च शिक्षण : लोकल ते ग्लोबल मराठवाड्यातील उच्च शिक्षण आता ग्लोबलपर्यंत पोहोचणारे झाले आहे. एमजीएम विद्यापीठाने मधल्या काळात विविध अभ्यासक्रमांच्या अनुषंगाने ई-शॉपिंग, ई-बँकिंग, ई-फायनान्स, ई-गव्हर्नन्स अशा एक ना अनेक बाबी उच्च शिक्षणात झालेल्या संशोधनातून अत्यंत प्रभावीपणे अभ्यासक्रमात समाविष्ट केल्यात. याचा थेट लाभ विद्यार्थ्यांना तर होतोच, शिवाय येथील भौगोलिक, सामाजिक तसेच राष्ट्रीय विकासातही होऊ शकतो. नवे शैक्षणिक धोरणही प्रामुख्याने संशोधन आणि कौशल्य विकासावर भर देणारे आहे.

डॉ. विलास सपकाळ कुलगुरू, एमजीएम विद्यापीठ, औरंगाबाद

बातम्या आणखी आहेत...